नवगण विश्लेषण

88 मुलांचा बाप असलेला तो महाराजा, एवढा प्रसिद्ध की परदेशातही त्याची चर्चा !


स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात अनेक राजघराणी अस्तित्वात होती. त्यापैकी पतियाळाचे महाराज भूपेंद्र सिंग हे अतिशय श्रीमंती थाटात राहणारे होते. त्या काळी त्यांच्या ताफ्यात 44 रोल्स रॉइस कार होत्या.

 

त्यांना अनेक पत्नी आणि उपपत्नी होत्या. त्यांच्यापासून झालेल्या 88 मुलांचे ते पिता होते.

 

स्वातंत्र्यापूर्वी देशात अनेक गर्भश्रीमंत राजघराणी होती. त्यात पतियाळा राजघराणं वरचढ होतं. या घराण्यातील भूपेंद्र सिंग महाराज हे खासगी विमान असलेले देशातील पहिले व्यक्ती होते. इंग्रजांनाही लाजवेल असं त्यांचं राहणीमान होतं. परदेशात गेल्यावर ते संपूर्ण हॉटेल भाड्यानं घेत असत. त्यांच्या ताफ्यात 44 रोल्स रॉइस कार्स होत्या. त्यापैकी 20 कार्स राज्यातल्या दररोजच्या दौऱ्यांसाठी वापरल्या जात.

 

स्वतःचं खासगी विमान

 

पतियाळा घराण्यातील महाराज भूपेंद्र सिंग यांचे अनेक किस्से सांगितले जातात. ते भारतीय क्रिकेट टीमचे कॅप्टन होते. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड सुरू केलं तेव्हा महाराजांनी त्यासाठी मोठा निधी दिला होता. तसंच चाळीसच्या दशकापर्यंत भारतीय क्रिकेट टीम जेव्हा परदेशात जात होती, तेव्हा टीमचा संपूर्ण खर्च ते करत असत. त्या बदल्यात ते टीमचे कॅप्टन बनत असत.

महाराजांकडे स्वतःचं खासगी विमान होतं. त्यांनी 1910मध्ये ते ब्रिटनमधून खरेदी केलं होतं. विमान चालवणं आणि त्याच्या देखभालीसाठी त्यांच्याकडे कर्मचारी वर्ग होता. त्या विमानासाठी पतियाळामध्येच धावपट्टी बनवण्यात आली होती. त्या विमानातून महाराज परदेश प्रवास करत असत. महाराजांना अधिकृत असलेली 88 मुलं होती. कदाचित त्यांच्या मुलांची संख्या जास्तही असू शकते.

 

महाराजांना होती 88 मुलं

 

दिवाण जर्मनी दास यांनी त्यांच्या ‘महाराजा’ या पुस्तकात पतियाळाच्या महाराजांबाबत सविस्तर लिहिलं आहे. लेपियर कॉलिन्स आणि डोमिनक लेपियरे यांच्या ‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट’ या पुस्तकातही महाराजांच्या भडक जीवनशैलीबद्दल लिहिलेलं आहे. महाराजांनी 10 लग्नं केली होती. त्याशिवाय राण्यांच्या निवासस्थानी 300 हून जास्त उपराण्या होत्या. त्यात एकापेक्षा एक सुंदर स्त्रिया होत्या. काही परदेशी महिलाही होत्या. महाराजांना 88 मुलं होती. महाराज परदेशात जात, तेव्हा त्यांच्यासोबत मोठा लवाजमा जात असे. लंडन किंवा पॅरिसमध्ये सगळ्यात महागड्या हॉटेलमधले अनेक मजले ते भाड्यानं घेत असत.

 

ताफ्यात 44 रोल्स रॉइस

 

महाराजांना कार खरेदी करण्याची हौस होती. त्यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक सुंदर कार होत्या. त्यात 44 रोल्स रॉइस कार होत्या. हिटलरनेही महाराजांना एक कार भेट म्हणून दिली होती. 1935मध्ये बर्लिन दौऱ्यावेळी भूपेंद्र सिंग यांची हिटलर यांच्याशी भेट झाली होती. हिटलर राजांना पाहून इतका प्रभावित झाला की स्वतःची मेबॅक कार त्यानं महाराजांना भेट म्हणून दिली. हिटलर व महाराजांची मैत्री अनेक वर्षं होती.

महाराजांच्या श्रीमंती थाटाची खूप चर्चा होती. 1929मध्ये महाराजांनी मौल्यवान हिरे व दागिन्यांची एक पेटी पॅरिसच्या सराफाला पाठवली. जवळपास तीन वर्षं त्यावर काम करून एक हार तयार तयार करण्यात आला. त्याची किंमत 25 मिलियन डॉलर होती. हा हार देशातल्या सर्वांत मौल्यवान दागिन्यांपैकी एक आहे.

बीसीसीआयच्या स्थापनेमध्ये सहभाग
पतियाळाच्या महाराजांनी बीसीसीआयच्या स्थापनेवेळी आर्थिक सहकार्य केलं होतं. त्यानंतरही ते नेहमी संघटनेला मदत करत राहिले. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमचा एक भाग त्यांच्या आर्थिक योगदानातून बनला आहे. महाराज भारतीय टीमकडून तर खेळलेच, शिवाय मेरिलबोर्न क्रिकेट क्लब म्हणजे एमसीसी टीमकडूनही ते खेळले. त्यांनी सर्वांत पहिल्यांदा ब्रिटिश क्रिकेट कोचना भारतात बोलावलं. त्यांची स्वतःची क्रिकेट टीम होती. ती त्या काळी देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळायची. त्यात देशातील लोकप्रिय व प्रसिद्ध खेळाडू खेळत असत. लाला अमरनाथ हे त्यापैकीच एक होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *