मुंबई : ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ असलेल्या आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे मने जिंकली. या चित्रपटाला मिळालेल्या उत्स्फुर्त प्रतिसादानंतर आता धर्मवीर २ ची घोषणा करण्यात आली आहे.
चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी पोस्टरचे अनावरण केले. धर्मवीर २ च्या घोषणेनंतर मुंबई तरुण भारतशी बोलताना चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई म्हणाले की, धर्मवीर २ या चित्रपटाची संपूर्ण टीम ही तीच असणार आहे. प्रसाद ओक दिघेंच्या भूमिकेत असणार असून क्षितीज दातेच एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणार आहेत,’ अशी माहिती देसाई यांनी दिली.
दरम्यान, ‘धर्मवीर २’ चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर चित्रिकरण कधी सुरु होणार अशी चर्चा सुरु असताना निर्माते मंगेश देसाई यांनी नोव्हेंबर महिन्यात चित्रिकरणाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली आहे. इतकेच नव्हे तर ते म्हणाले की, ‘मला ‘धर्मवीर २’ हा चित्रपट पुढच्या वर्षी १३ मे २०२४ लाच प्रदर्शित व्हावा अशी इच्छा आहे. कारण, त्याच तारखेला म्हणजेच १३ मे २०२२ रोजी ‘धर्मवीर’ प्रदर्शित झाला होता. परंतु, १३ मे २०२४ हा वार शुक्रवार नसल्यामुळे त्या तारखेच्या जवळपासच हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा माझा मानस आहे’. त्यामुळे मंगेश देसाईंनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या वर्षी ‘धर्मवीर २’ चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होणार हे मात्र नक्की झाले आहे.
‘धर्मवीर २’ मध्ये उलगडणार साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट