मुंबई : राज्याच्या राजकारणात यंदाच्या ५ वर्षात मोठी उलथापालथ महाराष्ट्राने पाहिली. त्यातच, नुकतेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाला धक्का दिलाय.
अजित पवार अनेक आमदारांसह भाजपासोबत आले आहेत, पण शरद पवारांनी या पाठिंब्याला विरोध दर्शवला असून आपण महाविकास आघाडीतच असल्याचे स्पष्ट केले आहे. तर, दुसरीकडे देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या बैठकीलाही त्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे, दिल्लीतील भाजपचे वरिष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दलच आग्रही असल्याची माहिती आहे. शरद पवारांना ऑफरही देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीत अजित पवारांना मानणारे आमदार त्यांच्यासोबत सत्तेत गेले. मात्र, काही आमदार शरद पवारांसोबत कायम राहिले. आता या आमदारांमध्येही २ मतप्रवाह तयार झाल्याची माहिती आहे. सत्तेत राहून लोकांची कामे करता येतील आणि पक्षही मजबूत करता येईल असं मत काही आमदारांनी मांडले आहे. या आमदारांकडून शरद पवारांना सत्तेत सहभागी होण्यासाठी गळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. अलीकडेच अजित पवारांसह राष्ट्रवादी नेत्यांनीही शरद पवारांची वाय.बी सेंटरला जात एकदा नव्हे तर दोनदा भेट घेतली. या भेटीतही पवारांनी आपल्यासोबत यावे. पक्ष मजबूत ठेवावा, पक्षात फूट पडू नये अशी विनवणी केली होती. आता, दिल्लीतील भाजपचे वरिष्ठ नेतेही शरद पवार यांनी सोबत येण्यासाठी आग्रही असल्याचे वृत्त द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सध्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रीपदाची मागणी मान्य केली आहे. पण, शरद पवार यांनी भाजपासोबत आल्यास त्यांचा सन्मान केला जाईल. केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान आणि मोठं खातं शरद पवारांना ऑफर करण्यात आल्याचेही एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटले आहे. लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपच्या सर्व्हेमध्ये महायुतीला कमी जागा दिसून येतात. त्यातच, राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्तेत सोबत आला, पण मतदारांची भावनिक साथ शरद पवारांनाच आहे. त्यामुळे, शरद पवारांनी भाजपासोबत यावे, ही मोदींसह वरिष्ठांची इच्छा आहे. त्यामुळे, पवारांनी विरोधकांच्या आघाडीला सोडून भाजपच्या आघाडीत यावे, अशी ऑफरच देण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, पुढील लोकसभा निवडणुकांसाठी केंद्रीय भाजपाकडून महाराष्ट्रावर विशेष लक्ष्य केंद्रीत आहे. त्यामुळेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वासात घेत, अजित पवार, शरद पवार यांची सोबत घेण्यासाठी भाजपची अद्यापही चर्चा सुरूच असल्याचे समजते.