नगर पालिकेला रस्त्यांसाठी आलेला निधी क्षीरसागरांनी वाटुन खाल्ला – विनायक मेटे
बीड : नगर पालिकेला रस्त्यांसाठी आलेला निधी क्षीरसागरांनी वाटुन खाल्ला. शहरात रस्ते धड नाहीत, आरोग्याच्या सुविधा नाहीत, राजकारण एकदम खालच्या थराला गेले आहे. चालू कामे टक्केवारीच्या वादातून बंद पाडली जातात.
क्षीरसागरच्या वैयक्तिक वादांमध्ये बीडची जनता भरडली जात असल्याचा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे (Mla Vinayak Mete) यांनी केला.
क्षीरसागर सत्तेसाठी आघाड्या काढतील, पक्ष सोडण्याचे नाटक करतील, चार-चार ठिकाणी घरातली माणसे उभी करतील आणि फक्त नगरपरिषदेची सत्ता कशी काबीज करता येईल यावरच रात्रंदिवस विचार करतील, असा टोला देखील मेटे यांनी लगावला.विशेष रस्ता अनुदान योजने अंतर्गत बार्शीनाका वडारवाडा व बीड मामला भागात सिंमेट रस्ता व नाली बांधकामाचे लोकार्पण मेटे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलतांना त्यांनी क्षीरसागरांच्या कारभारावर सडकून टिका केली.
मेटे म्हणाले, जणतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कधीच तत्परता न दाखवणारे कोणाच्या घरावर, प्लॉटवर आरक्षण टाकतील, घरे पाडण्यासाठी जेसीबी पाठवतील, कोणाला गुन्ह्यात अडकवायचं? कोणत्या नगरसेवकाची कशी बदनामी करायची आणि कोणाला कशा पद्धतीने मॅनेज करायचं, एवढंच राजकारण क्षीरसागर करतात.दहा वर्षांपासून वातानुकूलित भाजी मंडईचे आश्वासन दिलं, इमारत उभारली पण त्याची मुतारी झाली. शहरातल्या चौकांत अपघात टाळण्यासाठी बसविलेले लाखोंचे आरसेही गायब झाले. शहर वाहतूक बसचा गिअरही फसला. चौकांच्या सुशोभीकरणावर कोटींवर खर्च केला, पण, तेही अर्धवटच आहेत.
डीपी प्लॅनमधील सिमेंट रस्ते वर्षे दोन वर्षांत उखडले आहेत. भूयारी गटार व अमृत अटल योजनेबद्दल ऐकून बीडकरांचे कान पिटले आहेत. अर्धवट योजना व कामांचा सुमार दर्जा बीडकरांना नविन नाही, त्यामुळे बदल निश्चित असल्याचा दावाही मेटे यांनी केला.