बारामती: अंगणात कोंबड्या आल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात थेट डोक्यात कुऱ्हाडीने वार करत महिलेची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातल्या करावागज इथे घडला आहेयाप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.
गंगूबाई तात्याराम मोरे असे या घटनेत मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. या हत्येप्रकरणी आरोपी किरण दादा मोरे याला अटक करण्यात आली आहे.
या संपूर्ण घटनेबाबत तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी माहिती देताना सांगितले की, मयत महिला आणि आरोपीचे घर समोरासमोर आहे. दोन्ही कुटुंबामध्ये अंगणात कोंबड्या येण्यावरुन आणि पाच फूटांच्या जागेवरुन वारंवार वाद होत होता.
रविवारी (10 जानेवारी) दुपारी देखील याच कारणामुळे आरोपीच्या बायकोसोबत गंगुबाई यांचा वाद झाला होता. यावेळी रागाच्या भरात किरण याने थेट गंगूबाईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला. या हल्ल्यात गंगुबाई गंभीर जखमी झाल्या. त्यामुळे त्यांना तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आलं. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली. सध्या बारामती पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्याकडे तपासकार्य सोपविण्यात आलं आहे.