पुणे : बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतुन एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घराचे काम सुरू असताना त्याचा कचरा शेजारच्या अंगणात पडत असल्याच्या कारणावरून वाद झाला.
आणि त्यातूनच हा खुनाचा प्रकार घडला. सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शरद सीताराम पुरी (वय 35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सचिन विठ्ठल कपटकर याला बिबवेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुखसागर नगर येथील गल्ली नंबर 5 मध्ये हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पूरी आणि सचिन कपटकर यांची शेजारी शेजारी घरे आहेत. मागील काही दिवसांपासून शरद पुरी यांच्या घराला प्लास्टर करण्याचं काम सुरू होतं. त्याचा कचरा, सिमेंट सचिन कपटकर यांच्या अंगणात आणि गाडीवर पडत होता. यातूनच दोघांची भांडणं झाली.
याच वादातून सचिन कपटकर याने घरातून चाकू आणला आणि शरद पुरी यांच्या छातीत मारला. वर्मी घाव बसल्याने शरद यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.