बीड ब्रेकींग जिल्ह्यात दिवसा जमावबंदी , रात्री संचारबंदी , आनखीण काय ?
बीड : राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून, बीड जिल्ह्यातही आता कडक नियम लागू करण्यात आले आहेत. उद्या पासून बीड जिल्ह्यात (Beed District) सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधी दरम्यान 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली असून 144 कलम लागू करण्यात आले आहे.तर, रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत वैध कारणाशिवाय बाहेर फिरण्यास सक्त मनाई करण्यात आली असून संचारबंदी (Night Curfew) लागू केलीय. तर उद्यापासून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, ब्युटीपार्लर, स्पा सेंटर, मनोरंजन स्थळे, किल्ले, पर्यटन स्थळे, येणाऱ्या 15 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी (Beed Collector) राधाबिनोद शर्मा यांनी दिले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात विवाहासाठी 50 लोकांची मर्यादा तर अंत्यविधीसाठी 20 लोकांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. शासकीय कार्यालयात नागरिकांना संबंधित कार्यालय प्रमुखाचे लेखी परवानगी शिवाय प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर खासगी कार्यालयात केवळ 50 टक्के उपस्थित मर्यादा ठेवण्याचे आदेश (order) दिले आहेत. त्याचबरोबर सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमासाठी देखील केवळ 50 लोकांची मर्यादा असणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाची काहीशी कडक नियमावली जारी होत असल्याने, सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळित होण्याची शक्यता आहे.