बीड : बीडच्या अंबाजोगाई – लातूर रोडवर बर्दापूर जवळ 9 जानेवारी सकाळी लातूर – औरंगाबाद बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली,
या अपघातात सहा जण जागीच ठार आणि चवदा जण जखमी झाल्याची माहिती आहे. हा अपघात एवढा भीषण होता की क्रेनच्या साह्याने दोन्ही वाहने बाजूला करून जखमींना बाहेर काढावे लागले. जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमका अपघात कसा झाला?
सकाळी सात वाजेच्या सुमारास बस क्रमांक एम एच 20 बी एल टी 3017 ही बस लातूर येथून औरंगाबादकडे मार्गस्थ झाली. पण सायगावच्या जवळ आंबेजोगाईकडून लातूरकडे लोखंडी पाइपची वाहतूक करणारा एका ट्रकाला बसने रॉंग साईडने येऊन प्रचंड जोरदार धडक दिली.
पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाईहून लातूरकडे जात होता. बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावरच बस आणि ट्रकचा हा अपघात झाला.
यामध्ये पाच व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या बसमध्ये एकूण 17 प्रवासी व 1 बालक प्रवास करत होते. ज्यापैकी 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातनंतर सायगाव येथील नागरिकांनी मात्र जखमींना तात्काळ मदत केली. जखमींना त्यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं.
या अपघातानंतर हा संपूर्ण रस्ता बराच वेळ जाम झाला होता. मात्र, काही वेळाने अपघातग्रस्त बस हटविण्यात आली. ज्यानंतर येथील सगळी वाहतूक ही पूर्ववत झाली.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर,उपविभागीय अधिकारी शरद झाडके, DYSP सुनील जायभाय, तहसीलदार विपीन पाटील, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्यासह अंबाजोगाईचे आगार प्रमुख नवनाथ चौरे, यांच्यासह आदींनी धाव घेतली.
सायगाव येथील नागरिकांनी प्रसंगावधान राखल्याने प्रवाश्यांना मदत मिळली असून हा अपघात धुकं आणि अरुंद असलेल्या रस्त्यामुळे झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
लातूर जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत रस्त्याला डिव्हायडर आहेत पण बीड जिल्ह्याची सीमा लागताच त्या रस्त्यावर डिव्हाईडर नाहीत. त्यामुळेच हा अपघात घडला आहे. या अगोदर त्याच ठिकाणी अनेक अपघात घडलेले आहे. सतत अपघात होत असल्याने नागरिकांचे हकनाक बळी जात आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी आमदार-खासदार पालकमंत्री व प्रशासकीय अधिकारी कधी याकडे लक्ष देणार का ? असा प्रश्न उपस्थीत होत आहे