इस्लामाबाद – पाकिस्तानातील मौरी भागात प्रचंड थंडी पडली आहे. तापमान वजा 8 अँशापर्यंत खाली घसरले आहे. तसेच या भागात तुफान बर्फवृष्टीही सुरू झाली आहे. या कडाक्याच्या थंडीत 16 जणांचा गारठून मृत्यू झाला आहे.हे सर्व जण एका कारमध्ये अडकून पडले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही घटना राजधानी इस्लामाबादेपासून 45 किलोमीटरवरच्या मौरी या हिल स्टेशनजवळ घडली. या घटनेनंतर या परिसरात मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
मरण पावणाऱ्या 16 जणांपैकी 8 जण इस्लामाबादेतील पोलीस अधिकारी नावीद इक्बाल यांच्या कुटुंबातील सदस्य होते. बर्फवृष्टीमुळे त्यांची कार बर्फात अडकून पडली होती. थंडीमुळे शरीराचे तापमान कमालीचे कमी झाल्यामुळे या सर्वांचा मृत्यू झाला असे अघिकाऱ्यांनी सांगितले.
बर्फवृष्टीमुळे शेकडो कार बर्फात अडकून पडल्या होत्या, त्यापैकी अनेक कार ओढून बाहेर काढण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही बऱ्याच कार बर्फात अडकून पडल्या आहेत, असे गृहमंत्री शेख रशिद अहमद यांनी सांगितले. या भागात काल रात्रीपासून झालेल्या बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवर 4 फूट बर्फ साचले आहे.