कझाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये सध्या अराजकता माजली आहे. हजारो आंदोलक लिक्वीफाईड पेट्रोलियम गॅस (LPG) च्या किमतीतील वाढीविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.कझाकीस्तानचे बहुतांश नागरिक कारच्या इंधनासाठी या गॅसचा वापर करतात. तसेच देशात आणीबाणी (Kazakhstan Emergency) लागू करण्यात आल्याची माहिती आहे.मंगळवारी सरकारने जाहीर केले की, किमतीत वाढ होण्यापूर्वी इंधानाचे जे भाव होते, त्यापेक्षाही भाव कमी केले जातील. तरी देखील आंदोलक आक्रमक आहेत. बुधवारी राष्ट्राध्यक्ष कॅसिम-जोमार्ट तोकायेव यांनी त्यांचं मंत्रिमंडळ बरखास्त केलं. मात्र, तरीही निषेध सुरूच आहे. कझाकिस्तान सरकारने पेट्रोलियम पदार्थ एलपीजी आणि पेट्रोलच्या किमती वाढवल्यानंतर देशभरात निषेध सुरू झाला. हा गोंधळ इतका वाढला की अनेक ठिकाणी पोलिसांनी लाठीमारीसह अश्रूधुरांचा वापर करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करावा लागला.
सीएनएनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकांना घरातच राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यानंतर, कझाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी देशाची आर्थिक राजधानी अल्माटी आणि मंग्यताऊ प्रदेशात रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू केला आहे.
अनेक दशकांनंतर होतेय निदर्शनं, जाळपोळ –
स्थानिक माध्यमांच्या अहवालानुसार, अनेक शहरांमध्ये नागरिक आणि लष्कराच्या जवानांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळातोय. या देशव्यापी अराजकतेशी संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये कझाकिस्तानचे लोक लष्कर आणि पोलिसांच्या वाहनांना थांबवून त्यांना आग लावताना दिसत आहेत.