कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या अशा दोन्ही लाटेत बीड जिल्ह्याने नियंत्रण व उपचारासाठी चांगले काम केले.बीड जिल्हा आरोग्य यंत्रणेस आवश्यकतेनुसार मनुष्यबळ व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, तसेच जिल्ह्यातील आरोग्य संदर्भातील विविध मागण्यांसाठी राज्यस्तरावर पालकमंत्री व सर्व लोकप्रतिनिधी यांची एकत्र बैठक आयोजित करू, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केले.
ना. राजेश टोपे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत बीड जिल्हा रुग्णालयात अद्ययावत कोरोना विषाणू निदान व संशोधन प्रयोगशाळेचे (RTPCR Lab) चे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, बीड जिल्ह्यात कोविड काळात जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने समर्पित भावनेने काम केले, त्यामुळे या काळात अनेकांचे जीव वाचले. कोविडची रुग्णसंख्या बीड जिल्ह्यात नगण्य आहे, तरीसुद्धा मोठ्या शहरांमध्ये वाढत असलेली रुग्णसंख्या व संभाव्य धोका लक्षात घेत बीड जिल्ह्यात आवश्यक ती सर्व पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे. या नवीन लॅबला आवश्यक तज्ञ मनुष्यबळ तसेच अन्य कर्मचारी असेल किंवा मागील देयके अदा करण्यासाठी निधी उपलब्धी असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून ते पूर्ण केले जाईल. जिल्हा स्तरावर शक्य त्या नियुक्त्या करून कंत्राटी स्वरूपात मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे; अशा सूचना त्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनास केल्या.
मुंबई-पुणे सह मोठ्या शहरांमध्ये ओमीक्रॉन या नव्या विषाणू प्रजातीचा प्रादुर्भाव वाढत असून प्रशासन पूर्वतयारी करत आहे, नागरिकांनी देखील काळजी घ्यावी व शासकीय नियमांचे पालन करावे, जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी केले. बीड जिल्ह्यात कोविडच्या पहिल्या लाटेअखेर अंबाजोगाई येथील एकमेव कोरोना निदान चाचणी प्रयोगशाळा कार्यरत होती. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोना निदान चाचणीचे अहवाल वेळेत प्राप्त व्हावेत यासाठी बीड जिल्हा रुग्णालयात ही प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. बीड जिल्हा रुग्णालयात नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या या प्रयोगशाळेत २४ तासात ५ हजार जणांची कोरोना चाचणी करण्याची क्षमता असल्याने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयावरील ताण देखील कमी होणार आहे.