पेण : रायगड जिल्ह्यातील पेण येथे एका विवाहितेवर पोलिसाने तब्बल 6 वर्षांपासून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. पोलिसाने खाकी वर्दीचा गैरफायदा घेत पीडित महिलेच्या पती आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली आणि पीडितेसोबत तिच्या संमतीशिवाय 6 वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवल्याचे समोर आले आहेआरोपी दररोज शारीरिक सुखाची मागणी करू लागल्याने असह्य झालेल्या पीडितेने अखेर स्वतःवरील अत्याचारावर आवाज उठवला आणि शुक्रवारी रात्री संबंधित पोलीस हवालदाराविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर पेण शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
2015 पासून विवाहितेचे लैंगिक शोषण
आरोपी पोलीस हा अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे. तो पेणच्या रामवाडीजवळील शिवाजी नगर येथील रहिवासी आहे. त्याने पेण शहरात राहणाऱ्या विवाहितेवर लैंगिक अत्याचार केला. याचदरम्यान त्याने खाकी वर्दीचा गैरफायदा घेऊन विवाहितेच्या पती आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याने विवाहितेशी 2015 पासून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे उघडकीस आले आहे.
आरोपीचा पोलीस ठाण्यात धिंगाणा; पोलीस कर्मचाऱ्यांना केली मारहाण
पीडित विवाहित महिला पेण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेली त्यावेळी आरोपीने पोलीस ठाणे गाठून तेथे गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या महिला पोलिसांना त्याने शिवीगाळ केली. पोलिसांनी त्याला समजावून सांगितल्यावर तो आणखीनच शिवीगाळ करू लागला आणि लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली. तसेच उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाही त्याने शिवीगाळ केली. अखेर पेण पोलिसांनी त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पेण पोलिस पुढील तपास आणि कारवाई करीत आहेत.
पोलिसाच्या अतिरेकावर संतप्त प्रतिक्रिया
विवाहित महिलेवर सहा वर्षे बलात्कार करणारा, पीडितेच्या पती आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देणारा आणि नंतर पोलीस ठाण्यात धिंगाणा घालणारा हा पोलीस नेमका कायद्याचा रक्षक आहे कि कायद्याचा आणि समाजाचा भक्षक आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पीडितेच्या नातेवाईकांनी तसेच परिसरातील नागरिकांनी या आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्याची तसेच कठोरात कठोर शिक्षा सुनावण्याची मागणी केली आहे. (Married woman raped by police in Raigad for 6 years)