बीड : राज्यात एकेकाळी कोरोना रुग्णसंख्येच्या आकडेवारीत आघाडीवर असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये सोमवारी एकाही कोरोना रुग्णांची नोंद झाली नाही. सोमवारी आरोग्य विभागाला 523 संशयितांचा अहवाल प्राप्त झाला.त्यामधील सर्वच्या सर्वच 523 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यासाठी ही बातमी सकारात्मक आहे.
कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा संभाव्य धोका ओळखून बीड प्रशासन सतर्क झालं आहे. ऑक्सिजन, बेड, डॉक्टरांची जमजमवी वेगात सुरू असताना बीडचा कोरोना मात्र शुन्यावर गेला आहे. सध्या बीड जिल्ह्यात एकूण 42 अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातच आज आलेल्या कोरोना रुग्णांच्या अहवालात एकही संशयित कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. तरीही प्रशासनाकडून कोरोनाच्या संदर्भात सगळ्या प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवण्याचे आवाहन करण्यात येत आहेत.
दरम्यान, राज्यात दैनंदिन रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालायने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 11 हजार 877 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 50 नव्या ओमायक्रॉनबाधित रुग्णाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.
आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना लसीकरणाला सुरूवात झाली आहे. जालन्यामधील आरोग्य केंद्रामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थित लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. 15 ते 18 वयोगटातील राज्यात जवळपास 70 ते 80 लाख मुले आहेत. त्या सर्वांना लस देण्याचा आमचा प्रयत्न असेल असे राजेश टोपे म्हणाले. सुरक्षिततेचा विचार करुन लसीकरणाच्या बाबतीत आवश्यक ते बदल केले जातील असे टोपेंनी यावेळी सांगितले.