रत्नागिरीमध्ये तरुणाने मामाीची हत्या करून तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील इंदवटी येथे ही घटना घडली.
तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे रत्नागिरीमध्ये खळबळ उडाली आहे.
तरुणाने मामीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वतः विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. राखी पलाश मोंडळ असं मृत महिलेचं नाव आहे. तर तिचा भाचा निताई संजय मंडल याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी बळीराम हरिमोहन कबीराज यांनी तक्रार दिली आहे. बळीराम कबीराज हे मुकादम असून, त्यांच्याकडे राखी मोंडल आणि निताई मंडल दोघे काम करत होते.
पश्चिम बंगाल येथून सहा महिन्यांपूर्वी निताई आपल्या मामीला घेऊन पळून मुंबईत आला. तिथे ते पडेल ते काम करत होते. त्यानंतर सव्वा महिन्यांपूर्वी हे दोघ लांज्यात आले होते. आम्ही नवरा-बायको असल्याचे खोटे सांगून हे दोघ राहत होते. जेथे काम होते तिथेच ते झोपडी करुन राहत होते. त्यामुळे कुणाला त्यांच्या नात्याबद्दल संशय देखील आला नाही.
कोर्ले येथील काम संपवून ते इंदवटी येथे रस्त्याची संरक्षण भिंत बांधण्यासाठी आले होते. दोघे कामावर न आल्याने ठेकेदाराच्या मुलाने झोपडीत जाऊन पाहिले असता निताई तडफडत होता. तर राखी मोंडल याचा मृतदेह दिसून आला. निताई ने राखी मोंडल यांचा गळा दाबून खून केला होता. तर स्वत: विष प्राशन केले होते. या हत्येनंतर त्यांच्यातील नात्याचा भांडाफोड झाला. मात्र, निताईने मामीची हत्या का केली यामागचे कारण अस्पष्ट आहे. पश्चिम बंगाल येथून त्यांचे नातेवाइक लांजा येथे आल्यानंतरच हत्येचा उलगडा होण्याची शक्यता आहे.