‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीच्या ‘श्री क्षेत्र सागरेश्वर’ या पूरातन देवस्थानाची ख्याती संपूर्ण देशभरात आहे. श्रावणात इथं लाखो भाविक आणि पर्यटक दर्शन घेतात.
शाळा, महाविद्यालयांच्या सहलीसुद्धा याठिकाणी येतात. शेवटच्या श्रावणी सोमवारी मोठी यात्रा भरते. 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन या एकाच ठिकाणी होत असल्यानं सागरेश्वर देवस्थास ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखलं जातं.
सागरेश्वर मंदिराचे पुजारी सागर गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराला प्राचीन इतिहास लाभला आहे. मंदिराचा जिर्णोद्धार इसवी सन पूर्व काळात कुंडलीच्या सत्तेश्वर राजानं केल्याचं सांगितलं जातं. मंदिराचं पूर्ण बांधकाम हेमाडपंथी शैलीतलं आहे. मुख्य मंदिराचे एकूण 3 भाग आहेत. गर्भगृहात स्वयंभू शिवलिंग आहे. या शिवलिंगाखाली वर्षभर पाणी असल्यानं याला ‘समुद्रेश्वर’ही म्हटलं जातं. दुसऱ्या भागात उजव्या आणि डाव्या बाजूला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पुरातन मूर्ती आहे. तिसऱ्या भागात सागरेश्वराची उत्सवमूर्ती आहे.
भाविक उत्सवमूर्तीपर्यंत जाऊन पूजा करू शकतात. मुख्य शिवलिंगाची पूजा करण्यासाठी ओल्या कपड्यांनी जावं लागतं. सभामंडपात 12 ज्योतिर्लिंगांची माहिती आहे. मंदिर परिसरात जमिनीविषयी असणारे पुरातन दस्तऐवज गद्दीगाळ स्वरूपात आहेत. तसंच मोडी लिपीतील ‘शिलालेख’ आहेत. पाण्याचे 3 कुंडही आहेत. अंबिका, कार्तिकस्वामी अशी पूरातन लहान-लहान मंदिरं आणि वृक्षसुद्धा आहेत.
या देवस्थानाचं मूळ नाव समुद्रेश्वर, हळूहळू ते ‘सागरेश्वर’ झालं. इथून समुद्र खूप लांब, पश्चिमेस अगदी कोकणात. सागरेश्वराचा डोंगरही समुद्रसपाटीपासून 2762 फूट उंचावर आहे. तरीही इथल्या मुख्य पिंडीतील शाळुंकेखाली नेहमी पाणी असतं. शिवाय मंदिराशेजारी असलेल्या तीनही कुंडातील पाण्याची पातळी 12 महिने समपातळीत असते. हे पाणी अगदी स्वच्छ आणि चवदार असून त्यात कृमीनाश करण्याचा गुण असल्याचं भाविक मानतात.
डोंगराच्या कुशीत निसर्गरम्य मंदिर परिसरात ऋषिमुनींच्या तपश्चर्येच्या 15 ओवऱ्या आहेत. महादेवांच्या एकूण 108 पिंडी असून 37 मंदिरं आहेत. डोंगर कपारीत असलेली ही छोटी-छोटी मंदिरं लक्ष वेधून घेतात. पावसाळ्यात हा परिसर निसर्गसौंदर्यानं बहरतो. यासह मंदिर परिसरात असलेले पुरातन ‘गद्दीगाळ’, ‘शिलालेख’ इथलं ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करतात. सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे गावच्या हद्दीतील हे देवस्थान सांगली शहरापासून 48 किलोमीटर दूर आणि ताकारी रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर आहे.