आपण जेव्हा मंदिरात (Temple)जातो तेव्हा तिथे वेगवेगळ्या प्रतिकांची मांडणी केलेली असते. या माध्यमातून आपल्याला एक विशिष्ट सांस्कृतिक संदेश देण्याचा प्रयत्न प्राचीन ऋषिमुनींनी केला आहे.
असंच एक प्रतीक म्हणजे भगवान शंकराच्या मंदिरात ठेवलेला नंदी बैल आहे. हा नंदी बैल पाहून मंदिरात नेमका नंदी बैल का असतो? असा प्रश्न तुम्हालाही पडतो का? याच विषयी अधिक माहिती जाणून घेऊयात.
खरंतर, आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक देवाचं एक वाहन आहे. जसं गणपतीचं उंदीर तसंच भगवान शंकराचं वाहन हे नंदी बैल आहे. बैलाला नंदी म्हटलं जातं. नंदी म्हणजे आनंदस्वरूप. देवाला आनंदस्वरूप असणारं वाहन आवडते. देवाजवळ जाण्यास आणि त्याचे वाहन झाल्यामुळे जीवन आनंदस्वरूप होऊ शकते असा नंदिचा संदेश आहे.
भगवान शंकराचं वाहन नंदी
नंदी म्हणजे वृषभ- बैल. भगवान शंकराने बैलाला वाहन म्हणून स्विकारलं आहे. आपल्या या शेतीप्रधान देशामध्ये बैलाचेच महत्त्वाचे स्थान आहे. सामान्यतः शांत राहणाऱ्या बैलाचे चरित्र उत्तम आणि समर्पण भाव असणारे सांगण्यात आलं आहे. याच्या व्यतिरिक्त तो बल आणि शक्ती यांचं प्रतिक आहे. बैलाला मोह माया आणि भौतिक सुखांपासून अलिप्त राहणारा प्राणी देखील मानले जाते. हा साधा सज्जन प्राणी जेव्हा भडकतो तेव्हा तो सिंहाला देखील भिडतो. हीच सर्व करणे आहेत ज्यामुळे बैलाला भगवान शंकराने आपले वाहन म्हणून निवडले आहे. शंकराचे चरित्र देखील बैलाप्रमाणेच मानलं गेलं आहे.
‘ही’ आहेत शास्त्रीय कारणं…
मानवाच्या सृष्टीमध्ये अस्तित्वात असलेल्या प्राण्यांकडे अभिमानाने पाहण्याचा आणि जीवन उत्क्रांतीचा दृष्टिकोन विकसित करण्याचाही संस्कृती निर्मात्यांचा प्रयत्न आहे. हंस, मोर, गरूड, उंदीर इत्यादी देवांचे वाहन म्हणून दाखविण्यात आले. जीवनाच्या समृद्धीसाठी सृष्टीबद्दल आत्मीयता आणि आदराची भावना गरजेची आहे.
नांगराला जोडल्यामुळे धान्य उगवण्यास माणसाला मदत होते. मांसाहाराकडून त्याला शाकाहाराकडे वळविण्याच्या ऋषिमुनींच्या प्रयत्नामध्ये बैलाचा लहानसा हिस्सा आहे. हा लहानसा पण महत्त्वाचा हिस्सा घेतल्याने त्याला देवाजवळ स्थान मिळालं आहे.
नंदी म्हणजे बैल, भागवतकार महर्षि वेदव्यास यांनी भागवतमध्ये बैलाला रूपक देऊन धर्माचे महत्त्व सांगितलं आहे. बैलाला धर्माचे प्रतिक मानले आहे. म्हणजेच देवाचे स्वत:चे वाहन म्हणून धर्माला ठेवले आहे.
टीप : वरील सर्व बाबी नवगण न्युज केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.