बीड : माजलगाव (Majalgaon) येथील कुणाल कापूस जिनिंगला भीषण आग लागली. या आगीत जिनिंगच्या आवारात साठवून ठेवलेला 15 हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून यामध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
जिनिंगमध्ये असलेल्या मशीनमध्ये स्पार्किंग होऊन ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय. माजलगाव येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र हवेमुळे आग आटोक्यात येत नव्हती.
अग्निशामक दलाकडून शर्थीचे प्रयत्न
पाथरी आणि मानवत येथील अग्निशमन दलाच्या गाड्या आग वीजवण्यासाठी प्राचारण करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर मोठ्या शर्थीने ही आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये मात्र जिनिंगमध्ये साठवून ठेवलेला 15 हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून कोट्यावधी रुपयांचा नुकसान झाला आहे.
दिल्लीतही आगीच्या घटना
दिल्लीतील (Delhi) केमिकल गोदामांनाही आज (दि.16) भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. केमिकल गोदामांना आग लागून भीषण दुर्घटना घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले होते. या दुर्घटनेमध्ये 11 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. यासोबतच चार जण जखमी झालेत. दुर्घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्लीतल्या अलीपूरमध्ये ही घटना घडली आहे. मृतांची ओळख अद्याप पटली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
केमिकलमुळे स्फोट होऊन आग लागल्याचा अंदाज
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. रात्री 9 वाजता आग आटोक्यात आणण्यात आली. केमिकल कारखान्यात स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचे पोलिसांनी सांगितलं. आग इतकी भीषण होती की, आजूबाजूच्या काही घरांचेही नुकसान झालं आहे. कारखान्यात ठेवलेल्या केमिकलमुळे हा स्फोट झाल्याचं अधिकाऱ्यांचं मत आहे.