“गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या”, सुळेंच्या मागणीवर अजित पवार गट आक्रमक,गृहमंत्र्यांना दिवसातून १०० वेळा राजीनामा द्यावा लागेल
भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या दिशेने गोळीबार केला.
याप्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. जमिनीचा वाद आणि आपसांतील वैमनस्य यातून हा प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्कळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. यावरून अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.
“सुप्रिया सुळे या देशाच्या खासदार आहेत. कधीतरी देशाच्या प्रश्नावर बोलत चला”, असं उमेश पाटील म्हणाले. “या घटनेमध्ये गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्न कुठे येतो? गृहमंत्र्यांनी आमदाराला गोळीबार करायला सांगितला होता का? घटनेची चौकशी होईल, कारवाई होईल पण गृहमंत्री जबाबदार कसे?” असा प्रश्नही उमेश पाटील यांनी विचारला.
“संबंधित आमदाराने व्यक्तिगत कारणाकरता काही केलं असेल. गोळीबार झालेला आपण पाहिलेला नाही. यामध्ये चौकशी होईल. त्यामुळे गृहमंत्र्यांचा राजीनामा देण्याचा संबंध येत नाही. राज्यात अनेक ठिकाणी वेगवगेळ्या घटना घडतात. त्यामुळे गृहमंत्र्यांना दिवसातून १०० वेळा राजीनामा द्यावा लागेल. कायदा आणि सुव्यवस्था राखणं नक्कीच गृहमंत्री यांची जबाबदारी आहे, ते योग्य पद्धतीने काम करतायत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात क्राईम रेट कमी झाला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी या घटनेच्या चौकशीची मागणी करावी. पण उठसुठ राजीनामा देण्याची, सरकार बरखास्त करण्याची मागणी केली जाते”, अशी टीकाही त्यांनी केली.
“देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घेऊन तुम्हाला गृहमंत्री करायचे का? मग हे सगळं थांबणार का? सुप्रिया सुळेंना गृहमंत्री केल्यावर राज्यातील गुन्हे थांबणार आहेत का? एकही अपराध घडणार नाही का?”, असे प्रश्न त्यांनी विचारले.