डोंबिवली : गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला असून राज्यात सर्वत्र सणाचा उत्साह पहायला मिळत आहे. गणेशोत्सवानिमित्त अनेक चाकरमान्यांची कोकणातील गावी जाण्यासाठी लगबग देखील सुरू आहे.
मात्र ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच एक दुर्दैवी घटना घडली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात डोंबिवलीतील भाविकाचा मृत्यू झाला आहे. विनोद तारले असे मृत्यूमुखी पडलेल्या इसमाचे नाव असून त्यांची पत्नी आणि मुलगा देखील जखमी झाले आहेत. एसटीला डंपरने धडक दिल्याने हा अपघात झाला असून डंपर चालवणारा ड्रायव्हर फरार झाला आहे.
ऐन सणाच्या काळात ही दुर्घटना झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत असून या अपघाताचे वृत्त समजताच डोंबिवली पश्चिम भागात शोककळा पसरली आहे.
गणेशोत्सवासाठी अनेक चाकरमानी दरवर्षी कोकणातील गावी जात असतात. ठाणे जिल्ह्यातील अनेक उपनगरातून कोकणी चाकरमानी बांधवांसाठी कोकणात जाण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून मोफत एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत. शनिवारी संध्याकाळी डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे ग्राउंड येथून हजारो प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या शेकडो एसटी बसेस कोकणाकडे रवाना झाल्या. त्यातील डोंबिवली येथून राजापूरच्या दिशेने निघालेली एक एसटी बसला (Mho14-bt 2665) डंपरने माणगावजवळ जोरात धडक दिल्याने भीषण अपघात झाला. बसमध्ये तेव्हा 38 प्रवासी होते. या धडकेमध्ये एक प्रवाशाचा मृत्यू झाला तर अन्य काही जखमी झाले.
काळाने घातला घाला
विनोद तारले असे मृत्यूमुखी पडलेल्या इसमाचे नाव असून ते डोंबिवली पश्चिम येथील रहिवासी होते. गणेशोत्सवासाठी विनोद हे त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यासह राजापूरला जात होते. मात्र त्यांचा हा बस प्रवास अखेरचा ठरला. अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांची पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऐन सणाच्या काळात झालेल्या या अपघाताचे वृत्त कळताच हळहळ व्यक्त होत असून डोंबिवली पश्चिम भागात शोककळा पसरली.