ताज्या बातम्या

NCP शरद पवारांचाही आणि आमचाही, अंतिम निर्णय निवडणूक आयोग देणार- वळसे पाटील


मंचर (पुणे) : भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय हा एकटे अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांचा नाही, तर बहुसंख्य आमदार व पक्षातील कार्यकर्त्यांचा आहे. या संदर्भात शरद पवार यांच्याशी दोनवेळा चर्चा झाली होती.मात्र, त्यांनी नाही म्हणून सांगितले. आपण भाजपत गेलेलो नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आपला पक्ष असून, आपण पक्षातच आहोत, असे सांगून वळसे पाटील म्हणाले, आता निर्णय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची व आपलीही आहे. अंतिम निर्णय निवडणूक आयोग देणार आहे. आपल्या पक्षाला किती पाठिंबा आहे, हे दाखवून देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र करून द्यावे.

 

आंबेगाव तालुक्यातून पाच हजार प्रतिज्ञापत्र द्यावीत, अशी सूचना त्यांनी केली. सार्वजनिक जीवनात वावरताना कुणाबद्दलही वाईट बोललो नाही. मात्र, आजकाल काही कार्यकर्ते माझ्याबद्दल काय बोलतात ते कानावर येते. अशा कार्यकर्त्यांना वाईट नाही तर सौम्य भाषेत उत्तर द्या. माझ्यासाठी आमदारकी, मंत्रिपद, मानमरतब महत्त्वाचे नाही. डिंभे धरणातून बोगदा करून माणिकडोहला पाणी नेण्याचा घाट घातला आहे. बोगद्याचा आकार एवढा आहे की, पूर्ण क्षमतेने पाणी नेले तर धरण तीन महिन्यांत रिकामे होईल. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी सोडले जाणार नाही. परिणामी चार तालुक्यांत १९७२ च्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होईल. आपले पाणी शाबूत ठेवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

 

देवदत्त निकम यांच्यावर वळसे पाटील यांनी कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले, दहा वर्षे कारखान्याचे अध्यक्षपद, बाजार समितीचे सभापतिपद सांभाळत असताना गावागावात जाऊन गट पाडणे, भांडणे लावण्याचे काम त्यांनी केले. पक्षाच्या नावाने कुंकू लावून फिरायचे व गावागावात आपल्याच पक्षाच्या लोकांत भांडणे लावून गट पाडायचे काम त्यांनी केले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत आपला एक उमेदवार पराभूत झाला. त्याचा दोष जनतेला नाही तर आपल्या पक्षातील काही लोकांनी आतून मदत केली आहे. पक्षात ज्याला राहायचे त्यांनी आनंदाने राहावे, ज्यांना नाही राहायचे त्यांनी आनंदाने जावे, असा इशारा त्यांनी दिला. आपण गाफील राहता कामा नये. जास्तीत जास्त संपर्क वाढवून प्रत्येकाने वाडी-वस्तीवर फिरावे. राज्य सरकारच्या माध्यमातून वर्षभरात राहिलेले सर्व प्रश्न सोडवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये जाण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे. भाजपत नाही तर एनडीए गठबंधनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात शरद पवार हे वेगळ्या पद्धतीचा निर्णय घेतील, असे वाटते. असे सांगून त्यांच्या अडचणी दूर होतील तेव्हा पवार आपल्यासोबत येतील, असा आशावाद व्यक्त केला. राजकीय स्थित्यंतर होऊन अजित पवार मुख्यमंत्री झाले तर तालुक्याचा विकासरथ वेगाने पुढे जाईल. सकारात्मक विचार ठेवा, जे काही घडेल ते चांगले घडेल, असे जगताप म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विष्णूकाका हिंगे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, संचालक दादाभाऊ पोखरकर, शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव, युवक अध्यक्ष अंकित जाधव, महिला अध्यक्ष सुषमा शिंदे, कैलासबुवा काळे, भगवान वाघ, सुभाष मोरमारे आदी उपस्थित होते. नीलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले तर उपसभापती सचिन पानसरे यांनी आभार मानले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *