नाशिक छ संभाजीनगर रस्त्यावर असलेल्या विंचूर उपबाजार समितीच्या आवारात आपण पोहोचतो, तेव्हा सकाळचे ११ वाजून गेलेले असतात. पावसाचा पत्ता नसलेले थोडेसे ढगाळ वातावरण असते … प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन-तीन पोलिसांची लगबग सुरू असते, तर पुढे पन्नास साठ टेंपो आवारात उभे असतात.बाजार समितीच्या कार्यालयाजवळ असलेल्या खिडकीशी कांदा लिलावाची पट्टी घेऊन काही शेतकऱ्यांची पेमेंटसाठी लगबग चाललेली असते. तर काही जवळच्या बाकड्यावर आपल्या नंबरची वाट पाहत बसलेले असतात. कार्यालयात दैनंदिन कामं सुरू असतात. इथंही तीन चार पोलिस कर्मचारी व एक अधिकारी बाहेर उभे राहिलेले दिसतात. आपण चौकशी केल्यावर समजते की स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून काही वेळात रास्ता रोको आहे. त्यामुळे हा बंदोबस्त. पायरीजवळच बाजार समितीचे सहसचिव अशोक गायकवाड फोनवर कांद्याची किती आवक झाली ते सांगत असतात. नमस्कार-चमत्कार वगैरे झाल्यानंतर कांद्याच्या आवकेची माहिती लिहिलेला एक कागदच ते समोर ठेवतात.
खरं तर केंद्र सरकारने शनिवारी म्हणजेच १९ ऑगस्ट रोजी कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लावल्याने व्यापाऱ्यांनी लासलगावचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, पण बाजार समित्या सुरू राहिल्या. पण सोशल मीडियातून व्यापाऱ्यांच्या बंदची इतकी चर्चा झाली की अनेक शेतकरी बाजार समित्यांकडे फिरकले नाहीत. तरीही काही शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्रीस आणलेला दिसत होता.
‘व्यापाऱ्यांनी बंद पुकारला,पण आम्हाला बाजार समिती बंद थोडीच ठेवता येते, सकाळपासून १०२ नगाची (गाड्यांची) आवक झाली बघा, शिवाय पिपळगावला ७०० नग, सायखेड्याला २०० नग आवक झाली.” श्री गायकवाड माहिती पुरवतात. विंचूरला आज कांदा लिलावात शेतकऱ्यांना किमान दर ८०० ते कमाल दर २४९० असा मिळालेला असतो. सरासरी २१०० रुपयांचा दर मिळतो. पिंपळगांवला १५००-२६५६-२१५०, तर सायखेडा येथे ८००-२३००-२०५० असा दर मिळालेला असतो. थोडक्यात शनिवारी जो दर होता त्यात आणि आजच्या दरात विशेष फरक दिसत नाही, कारण आवकही कमी झालेली असते. आमचं बोलणं सुरू असतानाच बाजारसमितीचे क्लर्क तिथे येतात. आणखी ७ गाड्या आल्या असून त्यांचा लिलाव सुरू करायचा का? अशी विचारणा ते सहसचिवांकडे करतात. त्यांनी मानेनेच परवानगी दिल्यावर लगेचच लिलाव सुरू होऊन संपतातही.
येथून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळस येथून शेतकरी विश्वनाथ भदाणे हे आपला कांदा घेऊन आलेले असतात. त्यांना लिलावात १७०० रुपयांचा भाव मिळतो. सुमारे ५ ते ७ क्विंटल कांदा असतो. ”माझ्याकडचा हा शेवटचा कांदा होता, आता काहीच शिल्लक नाही”, हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी असते. तुम्हाला मिळालेल्या भावात तुम्ही समाधानी आहे का? या प्रश्नावर ते नकारार्थी मान हलवतात. ”अहो येवढ्यात तर खर्चही निघत नाही लागवडीचा… किमान ३ हजाराच्या पुढं भाव पाहिजे होते.” चेहऱ्यावर अजीजी आणत ते सांगत असतात. ‘तुम्ही कांद्याजवळ उभे राहा, म्हणजे तुमचा फोटो काढता येईल,’ आपण हे त्यांना सांगतो, तेव्हा बाजूलाच उभे असलेले काही तरुण शेतकरी आपल्याला टोला लगावतात. ‘हा हा, काढा फोटो आणि उद्या त्याच्या खाली लिहा या शेतकऱ्याला ३ हजार रुपये भाव मिळाला म्हणून..’ त्यावर आपण कसेनुसे हसतो. पण त्यांच्या मनातली बाजार भावांची खदखद काही केल्या आपल्या डोक्यातून जात नांही.
तेथून आपण बाहेर पडतो, तोपर्यंत रस्ता अडलेला असतो. बाजारसमिती समोरचा रस्ता आता पोलिसांनी वेढलेला असतो. माध्यमांचे कॅमेरे आणि प्रतिनिधींची तेथे गर्दी झालेली असते. बाजूलाच निफाडहून विंचूरला जाणारी वाहने खोळंबलेली असतात. कारण स्वाभीमानी संघटनेचा रास्ता रोको सुरू झालेला असतो. निर्यातीवर शुल्क लागू करण्याचा निर्णय हा शेतकरी हिताचा नाही, त्यामुळं भाव पडतील. हे शेतकरी विरोधी आहे, असे त्यातील सहभागींचे म्हणणे असते. ‘शेतकरी आता चिडलेत, ते ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. प्रत्येक वेळेस महागाई वाढते, तेव्हा शेतकऱ्यांनाच का वेठीला धरता’, एक शेतकरी कार्यकर्ता आपला रोष व्यक्त करत असतो.
आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणजे लासलगाव. येथील कांद्याची रोजची उलाढाल काही कोटींची आहे. केवळ कांद्यामुळे हे लासलगाव शहरात समृद्धी आलीय. इथं मोठमोठ्या बँकांची कार्यालये आहेत, मोटरसायकलपासून ते कारपर्यंत आणि ट्रॅक्टरपासून ते विविध अवजारांपर्यंतची मोठमोठी शो-रूम्स, दुकाने इथं आहेत. एटीएम्स आहेत, ब्रँडेड कपड्यांची आणि वस्तूंची शोरूम्स आहेत, चांगली हॉटेल्स आहेत. एकूण कांद्याच्या उलाढालीमुळे आणि येथे येणाऱ्या शेतकरी ग्राहक वर्गामुळे लासलगाव समृद्ध होत चाललेय, त्याचा पसाराही वाढतोय. त्यामुळे लासलगावच्या बाजारपेठेत लोकांची आणि रस्त्यांवर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. पण आज व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवल्याचा निर्णय घेतल्याचे समजल्यामुळे शेतकरी फिरकलेच नाहीत. त्यामुळे बाजारपेठेत चैतन्य कमीच दिसले, तर प्रत्यक्ष बाजारसमितीत शुकशुकाट होता.
व्यापाऱ्यांच्या गाळ्यांवर आणि कांदा साठवणुकीच्या चाळींमध्येही वर्दळ दिसत नव्हती. मार्केटवर आधारित अनेक व्यवसाय आहेत, जसे की बारदानाचे पॅकींग करणारे, गोण्यांची विक्री करणारे, सुतळी-तोड्यांची विक्री करणारे, चहावाले, नाष्टा विकणारे आज सर्वजण एकमेकांकडे पाहत बसून राहिलेले दिसले. ‘क्या करेंगे आज लिलाव बंद है, तो हमारा माल भी नही बिकेंगा…’ कांदा पॅकींगासाठी बारदान व गोण्या विकणारे एक व्यापारी आपली तक्रार सांगत होते. बाजार समितीमुळे अनेकांना रोजगार मिळतो. आज ही मंडळीही रिकामीच फिरताना दिसली. बाजार समितीच्या कार्यालयात मात्र थोडी वर्दळ होती. बाहेरच सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांची गाडी लावलेली दिसली. बाजार समितीचे सचिव श्री.वाढवणे हेही आपल्या कार्यालयात कामात व्यग्र होते. ‘होय आज लिलाव झाले नाहीत इथं, पण विंचूरला झालेत काही…’ त्यांनी माहिती पुरवली. संपाबद्दल त्यांना फोन सुरूच होते. काही शेतकरी विचारत होते की कधी माल आणायचा? त्यावर ते आज नका आणू असं सांगत होते.
सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्या कार्यालयात दोन-तीन शेतकरी बसलेले दिसले. काही कामासाठी ते आलेले होते. त्यांच्याशी बोलतानाच ते संपाबद्दल माहिती सांगू लागले, ‘व्यापाऱ्यांनी लिलाव बंद करण्याचा निर्णय घेतला, पण अधिकृत असे काहीही पत्र बाजारसमितीला दिलेले नाही, पण म्हणून आम्हाला बाजारसमितीचे कामकाज थोडीच बंद ठेवून चालेल. आमचे काम सुरू आहे. लवकरच संपावरही तोडगा निघेल आणि लिलाव सुरू होतीलही. पण निर्यातीवर ४० टक्के टॅक्स लावल्याने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बाजारभावावर परिणाम होणार हे नक्की.. तुम्ही हवं तर ग्राहकांना कांदा रेशनच्या माध्यमातून स्वस्तात विका, पण शेतकऱ्याला का उगाच भाव कमी देता… ‘ जराशा तावातावानेच तो बोलत होते. ‘अहो आता कुठे शेतकऱ्याच्या कांद्याला बरे भाव मिळू लागले होते, आणि तशात हा निर्णय आला….’ श्री क्षीरसागर यांनी परिस्थितीवर भाष्य केले.
लासलगावचे कांदा लिलाव नवीन बाजारसमितीच्या प्रशस्त आवारात होतात. जुन्या बाजारसमितीपासून हे अंतर सुमारे दोनेक किलोमीटर आहे. तिथे राखीव पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात दिसला. शेतकऱ्यांनी अचानक आंदोलन केले किंवा संताप व्यक्त केला तर.. यासाठी ही घेतलेली काळजी. तिथे बाजारसमितीचे काही कर्मचारी व काही व्यापारी गेटजवळच खुर्च्या टाकून बसलेले दिसतात. त्यातील काही मोबाईलवर लासलगाव संदर्भात युट्यूबवर काय बातमी आलीय हे ऐकण्यात-पाहण्यात गर्क असतात. कांदा लिलावाचे काही एकरात पसरलेले भले मोठे आवार मात्र एकदम सुनेसुने झालेले दिसते.
” रोज इथे इतक्या गाड्या आणि माणसं असतात की पाय ठेवायला जागा राहत नाही. सगळीकडे कांद्याचे ढीग लागलेले असतात, आज मात्र बघा आवारात एक कांदा दिसणार नाही…” खुर्चीवर बसलेल्यांपैकी एकजण माहिती पुरवतो.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना २०१९-२० सालात जरा बरे भाव मिळत होते, पण नंतर अचानक उदभवलेल्या कोरोना साथीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यात लॉकडाऊन संपून पुन्हा चांगले बाजारभाव मिळणार ही अपेक्षा शेतकऱ्याला होती, पण सरकारने निर्यात बंदी आणि नंतर साठवणुकीवर मर्यादा घातल्या. परिणामी भाव पुन्हा कोसळले आणि कांद्यासाठी झालेला उत्पादन खर्चही निघेनासा झाला. हे सर्व तीन वर्ष चालले. त्यानंतर आता कुठे २०२३च्या सुरूवातीला भाव सुधारू लागले होते, पण अवकाळी पाऊस आला आणि साठवलेल्या कांद्याचे नुकसान करून गेला. त्यामुळे भाव पुन्हा कोसळले. एप्रिल-मे मध्ये साठवणुकीचा कांदा अवकाळी पावसाने खराब झाला, त्यामुळे तो तातडीने विक्रीसाठी काढावा लागला, काहींना तीही संधी मिळाली, नाही. मात्र आता कुठे कांद्याला मागच्या आठ -पंधरा दिवसात बरे दिवस आले होते, पण एक्सपोर्टवरील टॅक्सच्या निर्णयामुळे आता तेही गडगडण्याची भीती आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याची कोंडी होण्याचीच शक्यता जास्त आहे. लासलगाव बाजारसमितीत साप्ताहिक सुटी व स्वातंत्र्य दिनाची सुटी वगळता १ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट या काळात ३ लाख ३४ हजार ३३६ क्विंटल आवक झाली, त्यासाठी सरासरी दर होता १९०२ रुपये प्रति क्विंटल, तर लासलगावचे उपबाजार असलेल्या निफाड आणि विंचूर येथील आवक यात मिळवल्यास एकूण ७ लाख ५१ हजार, ३५४ क्विंटल आवक झाल्याची नोंद कृषी उत्पन्न बाजारसमित्याच्या सचिव कार्यालयात पाहायला मिळते. इतकी आवक होऊनही भाव मात्र बऱ्यापैकी स्थिर राहिले, पण वाढण्याची शक्यता कमी असतानाच केंद्राचा निर्णय आला.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांनाच नाही, तर व्यापाऱ्यांनाही फटका बसणार आहे. त्यामुळे येथील व्यापारीही कालपासून तणावात आहेत. भाव नियंत्रणात राहण्यासाठी एक्सपोर्ट बंदी, त्यानंतर व्यापाऱ्यांवर आयकराच्या धाडी या प्रकारांमुळे येथील निर्यातदार व्यापाऱ्यांमध्ये आधीच घबराट आहे, त्यात निर्यातीसाठी सर्व सोपस्कार पूर्ण झालेला कांदा कंटेनरमध्ये बंदरे आणि विमानतळावर, तर काही नेपाळ, बांगलादेशाच्या सीमांवर उभा आहे. आता त्या कांद्यावरही वाढीव शुल्क भरावे लागणार असल्याने व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. याशिवाय बांगलादेश, नेपाळ, आखाती देशांमध्ये कांदा दर वाढण्याची भीतीही त्या देशांना वाटते आहे, त्यामुळे निर्यातीची विश्वासार्हता गमावली जाण्याची शक्यता असल्याने भविष्यात हे देश दुसरीकडून कांदा आयात करू शकतात. त्यातून पुन्हा उत्पादन चांगले झाले, तर देशातील भाव पडू शकतात अशीही शक्यता व्यापारी वर्तवू लागले आहेत.
लासलगावला जुन्या बाजारसमितीच्या एका गाळ्यातच जैन कंपनीचे कार्यालय आहे. तिचे मालक मनोज जैन हे जुने जाणते कांदा व्यापारी आहेत, शिवाय येथील कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. कार्यालयात ते हताश बसलेले दिसले. ‘आगामी काळात सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याचे भाव कमी होऊ शकतात, म्हणून शेतकरी बांधवांना पाठींबा देण्यासाठी आम्ही बेमुदत संप पुकारलाय. आम्ही काही शेतकरी बांधवांचे शत्रू नाही आहोत शेवटी ते आहेत, म्हणून आम्ही आहोत…’ श्री. जैन सांगत असतात, ‘खरं तर आपल्या देशात नोव्हेंबरपर्यंत पुरेल इतका कांदा होता, त्यात नाफेडचा साडेतीन लाख टन कांदा मार्केटमध्ये येणार आहे, शिवाय आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा कांदा सप्टेंबरपासून बाजारात येण्यास सुरूवात होईल. त्यात आपल्याकडे यंदा उशिरा कांद्याची लागवड झाली, तोही कांदा याच काळात बाजारात आला, तर आवक वाढेल. निर्यातीवर शुल्क लागल्याने निर्यात घटेल आणि परिणामी कांद्याचे भाव कोसळतील, त्याची जबाबदारी कोण घेणार?’ श्री जैन आपल्याला प्रतिप्रश्न करत असतात.
त्यांचा हा प्रश्न डोक्यात घोळवत आपणही उदास मनाने तेथून बाहेर पडून परतीची वाट धरतो. वाटेत नैताळे गावात कांदा उत्पादक शेतकरी व पत्रकार संजय साठे भेटतात. त्यांच्याशी याच प्रश्नावर चर्चा होते. ‘शेतकरी आता इतका पिचलाय की तो आता आंदोलन आणि मोर्चाच्या पलीकडे गेलाय, तो आता फारसा बोलत नाही. नैराश्यात गेल्यासारखा शेतकरी झाला आहे. त्यामुळे आता त्याचा राग लगेच आंदोलनातून व्यक्त होणार नाही, पण मतपेटीतून तो हा राग नक्की काढेल, तुम्ही पाहा… श्री साठे आपले अनुभवी विश्लेषण मांडतात.
निफाडपासून पिंपळगावकडे जाताना कुंदेवाडी गाव ओलांडल्यानंतर राहुरी विद्यापीठाचे कृषी संशोधन केंद्र आहे. विशेषत: गव्हावर येथे संशोधन चालते. या केंद्राच्या बाहेरच ‘राहुरी विद्यापीठाचे कांदा बियाणे मिळेल’ असा बोर्ड असतो. तेथील प्रमुख शास्त्रज्ञ आपल्याला तेथे चाललेल्या विविध संशोधनाबद्दल माहिती देतात. त्यात कांद्याचाही विषय निघतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी संशोधित केलेले कांदा वाण शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. अनेकदा हे वाण घेण्यासाठी शेतकरी विद्यापीठात इतकी गर्दी करतात की पोलिस बंदोबस्त ठेवावा लागतो. तेच वाण आम्ही निफाडला विकतो असे तेथील शास्त्रज्ञ आपल्याला सांगतात. यंदा कांद्यासह इतर वाणाची एक कोटीहून अधिक रुपयांची विक्री झाली. ही तशी कौतुकाचीच गोष्ट. पण या इतक्या वाणांचे कांदे जेव्हा बाजारात येतील तेव्हा त्यांना योग्य बाजारभाव मिळेल का? असा एक आणखी प्रश्न आपल्या डोक्यात घेऊन आपण निफाड उपबाजार समितीच्या आवारात पोहोचतो, तेव्हा तेथील शुकशुकाट पाहून बाजार व्यवस्थाच नैराश्यात गेली नाही ना? असा प्रश्न आपल्या डोक्यात उभा राहतो आणि कितीतरी वेळ त्या उघड्या-बोडक्या बाजाराकडे पाहात आपण उगाचच उभे असतो, नैराश्य आल्यासारखे…