ताज्या बातम्या

कळवा रुग्णालयात नर्सची ७२ पदे कंत्राटी स्वरुपात भरली जाणार; १८ रुग्णांच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागाला आली जाग


ठाणे : कळवा हॉस्पिटलमध्ये मागील आठवड्यात झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्यूनंतर येथील मनुष्यबळाचा विषय देखील चर्चेत आला होता. अनेक राजकीय पक्षांनी त्यावर टीकास्त्र सोडले होते. अखेर घटनेच्या अगदी काही दिवसानंतर ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता ७२ नर्सची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार येत्या २९ ऑगस्ट रोजी थेट मुलाखतीच्या माध्यमातून त्यांची निवड केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

 

कळवा रुग्णालयात मागील आठवड्यात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यु झाला होता. त्यानंतर त्यात आणखी चार रुग्णांची भर पडली होती. या दुर्देवी घटनेनंतर या ठिकाणी असलेल्या अनेक असुविधांची चर्चा झाली होती. तसेच येथील अपुºया मनुष्यबळावर देखील अनेकांनी आक्षेप घेतला होता. कळवा रुग्णालयात १२५ शिकाऊ आणि १५० च्या आसपास तज्ञ डॉक्टर आहेत. मधल्या काळात या रुग्णालयात ८८० पदे भरण्याबाबत राज्य शासनाने मंजुरी दिली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या माध्यमातून डॉक्टर व इतर महत्वाची पदे भरण्याची तयारी केली होती. परंतु कमी पगार असल्याने अनेकांनी त्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.

 

दरम्यान मागील आठवड्यात झालेल्या दुर्देवी घटनेनंतर आता पुन्हा एकदा आरोग्य विभागाने रिक्त पदे भरण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. सध्या कळवा रुग्णालयात २१० नर्सेसची पदे मंजुर आहेत. त्यातील १८० पदे भरली गेली आहेत. त्यानुसार केवळ ३० पदे रिक्त असल्याचे सांगतिले जात आहे. परंतु आता आरोग्य विभागाने ७२ पदे कंत्राटी स्वरुपात भरण्याची तयारी सुरु केली आहे. येत्या २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता थेट मुलाखतींच्या माध्यमातून ही पदे भरली जाणार आहेत. त्यातही कोवीड कालावधीत महापालिकेकडे परिचारीका म्हणून सेवा दिलेल्या उमेदवारांस प्राधान्य दिले जाईल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

 

वाढीव बेडची भरती आधीच येत्या काही महिन्यात कळवा रुग्णालयात ५०० बेड वाढविले जाणार आहेत. त्यानुसार त्या कालावधीत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार होती. परंतु मागील आठवड्यात घडलेल्या घटनेनंतर महापालिकेने ही भरती प्रक्रिया आधीच राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कळवा रुग्णालयातील वरीष्ठ सूत्रांनी दिली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *