हडपसर : शेवाळेवाडी येथील बस डेपो समोरील थेट पुणे सोलापूर महामार्गावर लोखंड व पत्र्याचा वापर करून बारा अनाधिकृत दुकाने उभारण्यात आली आहेत. डोळ्यादेखत उभ्या राहिलेल्या या अतिक्रमणाबाबत प्रशासन मात्र अनभिज्ञ असल्याचा आव आणत आहे.त्यामुळे महामार्गावरील या अतिक्रमणाला नेमका कुणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
शेवाळेवाडी येथील बस डेपो मधून शहराच्या विविध भागात बस सेवा सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवासी येत असतात. त्यामुळे काही व्यवसायिकांनी येथे पथारी थाटली आहे. तर एका व्यक्तीने नुकतीच थेट महामार्गावरच लोखंडी पत्र्यातून बारा दुकाने उभारली आहेत. त्यातील दोन-तीन दुकानांतून व्यवसायही सुरू झाला आहे.
या अतिक्रमणामुळे जी-२० च्या निमित्ताने केलेले सुशोभीकरण झाकून गेले आहे. त्यावर आताच कारवाई न झाल्यास भविष्यात परिसरातील संपूर्ण महामार्गावर अतिक्रमण होण्याचा धोका आहे. याबाबत पालिका व महामार्ग अधिकाऱ्यांना विचारले असता आपल्याला याची कल्पनाच नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. सध्या शेवाळेवाडी मांजरी परिसरात हे अतिक्रमण चर्चेचा विषय ठरले आहे. प्रशासन अशा गोष्टींकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
“या अतिक्रमणाबाबत डेपो व्यवस्थापक सुरेंद्र दांगट यांनी तक्रार केली होती. त्यानुसार अतिक्रमणाची माहिती घेतली असता ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हद्दीत येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पालिकेकडून त्यावर कारवाई होऊ शकणार नाही.
– धम्मानंद गायकवाड, मुख्य निरीक्षक, हडपसर क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण विभाग
“महामार्ग हद्दीत झालेल्या या अतिक्रमणाबाबत आम्हाला कल्पना नाही. असे अतिक्रमण झाले आहे की नाही त्याची पाहणी व चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल.’