ताज्या बातम्या

वॉकर’ भावना जाट निलंबित; जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेपूर्वी भारताला आणखी एक धक्का


बुडापेस्ट : बुडापेस्ट (हंगेरी) येथे जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेला सुरुवात होण्यास दोन दिवसांचा अवधी शिल्लक असताना भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे. ठावठिकाणा मुद्यावरून राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीतील ऑलिंपियन भावना जाट हिला निलंबित केले आहे.त्यामुळे तिला स्पर्धेत भाग घेता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

 

टोकियो ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेली भावना सध्या बुडापेस्टमध्ये भारतीय संघासोबत असली तरी तिला भारतात परत पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या १२ महिन्यांत तिने तीनदा आपला ठावठिकाणा योग्य पद्धतीने ‘नाडा’च्या अधिकाऱ्यांना सांगितला नाही किंवा तीनदा ठराविक वेळी व ठराविक ठिकाणी ती चाचणीसाठी उपस्थित नव्हती.

 

याच मुद्यावरून तिला निलंबित करण्यात आल्याचे ‘नाडा’ने म्हटले आहे. तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे, अशी नोटीस ‘नाडा’ने भावनाला १० ऑगस्ट रोजी पाठवली होती. यावर स्थगिती देऊन सुनावणी घ्यावी, अशी विनंती भावनाने केली होती.

 

मात्र, तिची ही विनंती फेटाळण्यात आली होती. तिला निलंबित करण्यात आल्याने आता महिलांच्या २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत एकही भारतीय सहभागी होणार नाही. कारण प्रियांका गोस्वामीने आशियाई क्रीडा स्पर्धेवर लक्ष केंद्रित करायचे असल्याचे कारण देत माघार घेतली होती.

 

गोळाफेकीतील आशियाई विजेता ताजिंदर सिंग तूरने दुखापतीमुळे, भालाफेकपटू रोहित यादवने दुखापतीमुळे, ८०० मीटरची धावपटू के. एम. चंदा, उंच उडीतील राष्ट्रीय विक्रमवीर तेजस्विन शंकरने आशियाई क्रीडा स्पर्धेवर लक्ष केंद्रित करायचे असल्याचे कारण देत यापूर्वीच माघार घेतली आहे.

 

किशोर जेनाला संधी

 

यंदाच्या स्पर्धेत भारताचे चार भालाफेकपटू पात्र ठरले होते. त्यात नीरज चोप्राला डायमंड लीग विजेता म्हणून वाईल्ड कार्ड प्रवेश मिळाला, तर रोहित यादव, डी. पी. मनू, किशोर जेना यांनी जागतिक रँकिंगच्या माध्यमातून पात्रता गाठली. त्यापैकी रोहितने दुखापतीमुळे यापूर्वीच माघार घेतली होती. त्यामुळे तिघे सहभागी होतील अशी अपेक्षा होती.

 

मात्र, ओडिशाचा असलेल्या किशोर जेनाचा एक महिन्यासाठी असलेला व्हिसा दिल्लीतील हंगेरीच्या उच्चायुक्त कार्यालयाने रद्द केला होता. त्यानंतर त्याला व्हिसा मिळावा यासाठी भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने प्रयत्न सुरू केले होते. त्यात त्यांना यश आले असून किशोरला शुक्रवारी सकाळी नऊ वाजता हंगेरीच्या उच्चायुक्त कार्यालयात व्हिसा प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. निर्धारित कार्यक्रमानुसार तो २० तारखेला रवाना होणार होता. त्याला व्हिसा मिळाला तर नीरज, मनू आणि किशोर हे तिघेही भालाफेकीत सहभागी होतील.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *