ऑ० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान २ सप्टेंबर रोजी आमनेसामने असणार आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार म्हटलं की क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगत असते.
अशातच भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबद्दल भाष्य केले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांवर समान दबाव असला तरी, भारतातील प्रत्येक सामना प्रत्येक खेळाडूसाठी समान महत्त्वाचा असतो, असे जड्डूने सांगितले.
स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत जडेजा म्हणाला की, जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होतो तेव्हा विजयाच्या खूप अपेक्षा असतात, पण आमच्यासाठी भारताचा समावेश असलेला कोणताही सामना भारत-पाकिस्तान सामन्याइतकाच महत्त्वाचा असतो. होय, हे खरं आहे की, भारत-पाकिस्तान हा सामना अधिक लक्ष वेधतो. पण, आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो.
“आमची कामगिरी सुधारणे आणि शक्य तितके चांगले खेळणे हे आमचे ध्येय”
तसेच आमचे ध्येय शक्य तितके चांगले प्रदर्शन करणे आणि खेळणे हे आहे, परंतु काहीवेळा गोष्टी योजनेनुसार होत नाहीत. हा एक खेळ आहे आणि दोन्ही बाजूंचे खेळाडू आपापल्या देशांचे प्रतिनिधित्व करत आहेत. माझ्या मते, दोन्ही संघ जिंकण्यासाठी सामना खेळतात. काहीवेळा तुम्ही योग्य लक्ष केंद्रित केले आणि मैदानावर तुमचे १००% दिले तरीदेखील सामना जिंकण्याची शाश्वती नसते, असेही जड्डूने नमूद केले.
आयसीसीने या आठवड्यात वन डे विश्वचषक स्पर्धेचे नवीन वेळापत्रक जाहीर केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १५ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्याची तारीख बदलून १४ ऑक्टोबर करण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरपासून हिंदू सण नवरात्रीला सुरूवात होत असल्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तारीख बदलण्यात आली.
विश्वचषकातील भारताचे सामने –
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ८ ऑक्टोबर, चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान – ११ ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान – १४ ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश – १९ ऑक्टोबर, पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड – २२ ऑक्टोबर, धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड – २९ ऑक्टोबर, लखनौ
भारत विरुद्ध श्रीलंका – २ नोव्हेंबर, मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – ५ नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध नेदरलँड्स – १२ नोव्हेंबर, बंगळुरू