ताज्या बातम्या

रायगड जिल्ह्याची संपूर्ण माहिती


छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पुनित पावन झालेला रायगड जिल्हा!

शिवराज्याभिषेकाच्या दिवशी उधळलेला गुलाल आजही जेथील आसमंताला गुलाबी करतोय. इथल्या मातीचा कण न् कण आजही शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य तेजाची महिमा गातोय

असा रायगड जिल्हा!युगपुरूषाचे निधन रायगडावर झाल्यानंतर खुद्द रायगड देखील धायमोकलुन रडला असा दुःखद प्रसंग घडला… पृथ्वीकंप झाला… अष्टदिशा आकांत करत्या झाल्या….. रयतेचा कैवारी निर्वतला तो ही याच… रायगड जिल्हयात…..

मराठयांचा बाणा… लढा… त्याग… शत्रुला परतवुन लावतांना धारातीर्थी पडलेले वीर … रायगड जिल्हयाने जवळुन पाहिले अनुभवले त्यांना आपल्या कुशीत सामावुन घेतले या रायगडने… मराठयांच्या इतिहासाचे आणि रायगड जिल्हयाचे अतुट असे नाते आहे.

यवनांना पराभुत करून राजाने रायगडाला राजधानी केले आणि जनतेच्या ईच्छा पुरवुन जगाच्या ईतिहासात अतुल्य यश मिळवते झाले.

रायगड जिल्हयाचे पुर्वीचे नाव कुलाबा असे होते…. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला या जिल्हयात असल्याने 1981 साली 1 जानेवारीला या जिल्हयाचे नाव बदलुन रायगड असे करण्यात आले. या जिल्हयाच्या पश्चिमेकडे अथांग असा अरबी समुद्र आपल्याला दिसतो, पुर्वेला सहयाद्री पर्वत रांगा आणि पुणे जिल्हा असुन दक्षिणेला रत्नागिरी (आग्नेय दिशेला पाहिल्यास सातारा जिल्हा) उत्तरेला ठाणे जिल्हा आहे.

रायगड जिल्हयातील तालुके –
या जिल्हयात एकुण 14 तालुके आहेत

पनवेल
अलिबाग
कर्जत
उरण
पेण
खालापुर
रोहा
सुधागड (पाली)
पोलादपुर
महाड
म्हसळे
मुरूड
श्रीवर्धन
माणगावरायगड जिल्हयाविषयी काही महत्वाच्या आणि वैशिष्टयपुर्ण गोष्टी – Raigad Zilla Chi Mahiti
लोकसंख्या 26,35,200
क्षेत्रफळ 7,152 वर्ग कि.मी.
साक्षरतेचे प्रमाण 89%
1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 955
एकुण तालुके 14
राष्ट्रीय महामार्ग क्र 4 आणि क्र. 17 या जिल्हयातुन गेले आहेत
रायगड जिल्हा सायन पनवेल एक्सप्रेस वे ने जोडला गेला आहे
रायगड जिल्हयाला 240 कि.मी. लांबीचा विस्तिर्ण समुद्रकिनारा लाभला आहे
या जिल्हयात प्राचीन ऐतिहासीक वास्तु, पर्यटकांना आकर्षीत करणारे समुद्रकिनारे, निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण, पश्चिम घाटात असलेली आकर्षक अप्रतिम ठिकाणे आपल्याला पहायला मिळतात.
घारापुरी येथील ऐतिहासीक एलिफंटा गुहा त्याकाळातील वैभवसंपन्न संस्कृतिच्या साक्षीदार म्हणुन आजही आपल्याला खुणावतात
रायगड जिल्हयात वेगवेगळया काळातील भव्य आणि चिरेबंदी किल्ले आजही आपले अस्तित्व टिकवुन आहेत… रायगड किल्ला, मुरूड.जंजिरा किल्ला, कुलाबा किल्ला, सुधागड किल्ला आजदेखील आपल्याला कुतुहलात टाकतात
या जिल्हयातील आज अस्तित्वात असलेल्या वेगवेगळया सांस्कृतिक परंपरा, भाषा, धर्म त्यामुळे येथील नागरिकांनी जिल्हयाची आपली अशी ओळख निर्माण केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ हे रायगड जिल्हयात असलेले महाराष्ट्रामधले एकमेव तंत्रज्ञान विद्यापीठ!
किना.यालगत घारापुरी, कुलाबा, जंजिरा, खांदेरी.उंदेरी, कासा, करंजा अशी बरीच लहान मोठी बेटे आहेत.
रायगड जिल्हयात पुर्वी काही ठिकाणी बेनेइस्त्रायली ज्यु लोकांनी निवास केला होता.
Raigad Jilha Mahiti
आगरी जातीचा समाज या जिल्हयात मोठया प्रमाणात वास्तव्याला आहे.
भात हे रायगड जिल्हयातील मुख्य पिक आहे लागवडीखाली असलेल्या एकंदर क्षेत्रापैकी बहुतांश म्हणजे 70 टक्के क्षेत्रात भात पिकाची लागवड होते त्याखालोखाल काही भागात नाचणी आणि वरीचे पीक घेतात, म्हसळे, मुरूड, श्रीवर्धन, अलिबाग या भागात नारळाचे उत्पादन मोठया प्रमाणात घेण्यात येते, रायगड येथील डोंगर उतारावर लाल मातीत आंब्याची लागवड केली जाते, कोकम (रातांबी) ची झाडं देखील येथे लावुन त्यांचे उत्पन्न घेतले जाते.
जिल्हयाला विस्तिर्ण समुद्रकिनारा लाभल्याने साहजिक मत्स्यव्यवसाय हा येथील मुख्य व्यवसाय आहे
रेणव्या, पेडवे, पापलेट, सुरमई, बांगडा, कर्ली, रावस, हाईद, सरंगा, या प्रकारचे मासे येथील समुद्रात मोठया प्रमाणात सापडतात.
प्रगत तंत्रज्ञान आणि यांत्रिक नौकांमुळे मत्स्यव्यवसाय पुर्वीपेक्षा सोपा आणि सुलभ झाला आहे
रायगड जिल्हयात औद्योगिक वसाहत मोठया प्रमाणात निर्माण झाली असुन औद्योगिकदृष्टया हा जिल्हा विकसीत होत आहे.
रोहे, पनवेल, कर्जत, पेण, सुधागड या तालुक्यांमधे एकुण भौगोलिक क्षेत्राच्या जवळजवळ एक चतुर्थांश वनांनी व्यापलेले आहे.
या वनांमधे वन्यप्राण्यांचा मुक्त संचार असुन येथे वाघ, सांबर, कोल्हे, रानडुक्कर यांसारखे प्राणी आढळतात.
आंबा, चिंच, ऐन, खैर, साग, सारखे वृक्ष या वनांमधे आढळुन येतात.
खोपोली येथील विद्युत केंद्र महाराष्ट्र राज्यातील पहिले जलविद्युत निर्मीतीकेंद्र म्हणुन ओळख मिळवुन आहे.
अष्टविनायकांपैकी दोन गणपतीची मंदिर (ठिकाणं) या जिल्हयात आहेत. 1) पाली येथील बल्लाळेश्वर 2) खोपोली जवळ महड येथील वरदविनायक
रायगड जिल्ह्यातील धार्मिक आणि पर्यटनस्थळं –
या जिल्हयाला ज्या ऐतिहासीक किल्ल्यामुळे नाव पडले असा रायगड किल्ला या ठिकाणी असुन या ठिकाणी भेट देणाया पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढतांना दिसते आहे.

या किल्ल्याला पुर्वी रायरी म्हणुन ओळखले जायचे खुद्द शिवाजी महाराजांनी याला रायगड असे नाव दिले. अभेद्य, विशाल, विराट रूप असलेला रायगड अजिंक्य असुन तो जिब्राल्टर म्हणुन देखील ओळखला जातो.

या किल्ल्याचे सौंदर्य, त्याचे विशाल अवाढव्य स्वरूप, हा किल्ला चोहोदिशांनी सहयाद्री पर्वतरांगांनी घेरला गेलाय अश्या अनेक कारणांमुळे आणि वडील शहाजी राजे यांच्या इच्छेस आज्ञा प्रमाण मानुन छत्रपती शिवरायांनी रायगडाला आपली राजधानी केले.

येथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जुन 1674 ला पार पडला त्यावेळी काशी चे प्रसिध्द विव्दान गागाभट्ठ यांनी महाराजांना राज्याभिषेक केला.

महाराज त्यांच्या शेवटच्या काळात येथेच वास्तव्याला होते आणि त्यांचा अंत देखील याच किल्ल्यावर झाला.

शिवाजी महाराजांची समाधी देखील याच रायगडावर आहे.

या गडावर भेट दिली असता पाचाडचा जिजाबाईंचा वाडा, महादरवाजा, मशिदमोर्चा, खुबलढा बुरूज, नाना दरवाजा, चोरदिंडी, हत्ती तलाव, स्तंभ, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राजभवन, गंगासागर तलाव, शिरकाई देउळ, महाराजांची समाधी, जगदीश्वर मंदिर, वाघदरवाजा, कुशावर्त तलाव, हिरकणी टोक, टकमक टोक, वाघ्या कुत्र्याची समाधी अशी ठिकाणं आवर्जुन पहावीत अशीच……..

गडावर पोहोचण्याकरता तब्बल 1400.1500 पाय.या या ठिकाणी आपल्याला चढाव्या लागतात आता रोपवेची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली आहे.

महड येथील वरदविनायक – Varad Vinayak
अष्टविनायकापैकी दोन अष्टविनायक रायगड जिल्हयात असुन त्यांचे दर्शन घेण्याकरता येथे नित्य भाविकांची गर्दी दिसुन येते.

खोपोली गावाजवळ खालापुर तालुक्यात महड गावी वरदविनायकाचे हे मंदिर 12 ही महिने भाविकांच्या गर्दीने फुलले असते.

1725 साली पेशव्यांचे सेनापती रामजी महादेव बिवालकर यांनी या मंदिराचा जिर्णोध्दार केल्याचे येथे सांगण्यात येते.

वरदविनायकाच्या मंदिरा व्यतिरीक्त मंदिराच्या चोहोबाजुंनी पहारेकरी म्हणुन चार हत्तीच्या मुर्ती येथे आपल्याला दिसतात.

नवग्रह देवता, महादेवाचे शिवलिंग आणि मुषकाची देखील येथे मुर्ती स्थापीत आहे

माघी चतुर्थीला येथे मोठया प्रमाणात भाविकांच्या रांगा दिसतात

पालीचा बल्लाळेश्वर –
अष्टविनायकांपैकी आठवा गणपती पालीचा बल्लाळेश्वर

स्वयंभु अशी ही बल्लाळेश्वराची मुर्ती पुर्वाभिमुख असुन सुर्यनारायणाची किरणं अगदी सकाळी मुर्तीवर पडतात.

डाव्या सोंडेच्या मुर्तीचे हे रूप अतिशय मनमोहक असुन या मुर्तीच्या डोळयात खरे हिरे बसवलेले आपल्याला पहायला मिळतात.

पुर्वी हे संपुर्ण मंदीर लाकडी बांधकामात 1760 रोजी बांधले गेले होते पुढे श्री फडणीस यांनी दगडी बांधकामात या मंदिराचे पुर्ननिर्माण केले आणि नवे मंदिर आकाराला आले.

मोरेश्वर विठ्ठल सिंदकर यांनी 1640 ला या मंदिराचा जिर्णोध्दार केला असल्याचे येथे सांगण्यात येते

या मंदिरात फार प्राचीन घंटा पहावयास मिळते ती घंटा चिमाजी आप्पा यांनी सस्ती आणि वसई येथील लढाईत पोर्तुगिजांना हरवुन मिळवली आणि या मंदिरात ती बांधण्यात आली आहे.

पाली गावातील हे मंदिर रायगड जिल्हयात कर्जत पासुन साधारण 60 कि.मी. अंतरावर आहे.

अंबा नदी व सागरगड किल्ल्यापासुन हे तिर्थस्थान अगदी जवळ आहे.

अलिबागचे कनकेश्वर मंदिर, श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर मंदिर, दिवेआगर येथील सुवर्णगणेश मंदिर ही धार्मीक स्थळं देखील अवश्य भेट द्यावी अशी आहेत.

रायगड जिल्हयाला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला असल्याने येथे निसर्गाने मुक्तहस्ताने प्राकृतीक सौंदर्याची उधळण केली आहे.

तेव्हां या सृष्टीसौंदर्याची अनुभुती घेण्याकरता आणि छत्रपती शिवरायांच्या रायगडाला भेट देण्याकरता अवश्य या ! ! ! ! !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *