ताज्या बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्याची माहिती


सिंधुदुर्ग जिल्हा : महाराष्ट्र राज्यातीलकोकण विभागातील एक जिल्हा. क्षेत्रफळ ५,२१९ चौ. किमी. महाराष्ट्र राज्याच्या१·७टक्के त्याचे भूक्षेत्र आहे. लोकसंख्या ८,४८,८६८ (२०११). अक्षवृत्तीय विस्तार १५ ३७’ ते१६ ४०’ उत्तरव रेखावृत्तीय विस्तार७३१९’ ते७४ १३’ रेखांशयांदरम्यान आहे. जिल्ह्याची उत्तर-दक्षिणलांबी सु. ९७ किमी. असून पूर्व-पश्चिम रुंदी (विस्तार) ६२ किमी.आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तरेला रत्नागिरी जिल्हा, पूर्वेस सह्याद्रीपर्वताच्या रांगा व कोल्हापूर जिल्हा, पश्चिमेला अरबी समुद्र आणिदक्षिणेला गोवा राज्ययांनी तो सीमित झाला आहे. सांप्रतच्या रत्नागिरी वसिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा मिळून पूर्वी रत्नागिरी हा पंधरा तालुक्यांचा एकजिल्हा होता परंतु १ मे १९८१ रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे रत्नागिरी वसिंधुदुर्ग अशा दोन जिल्ह्यांत विभाजन करण्यात आले. उत्तरेस सावित्रीनदीपासून दक्षिणेस शुक नदीपर्यंतचा रत्नागिरी जिल्हा व त्याच्या दक्षिणेकडील तेरेखोल खाडीपर्यंतचा सिंधुदुर्ग जिल्हा होय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातदेवगड,मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, दोडामार्गआणि वैभववाडी असे आठ तालुके आहेत. वैभववाडी तालुका मूळचाकोल्हापूर जिल्ह्यातील असून विभाजनाच्या वेळी त्याचा अंतर्भावसिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात आला. त्याला तळकोकण असेही म्हणतात.जिल्ह्याचे मुख्य ठिकाण प्रारंभी कुडाळ होते पण सिंधुदुर्गनगरी यानावाने ते नव्याने मुंबई – गोवा महामार्गावर (महामार्ग क. १७) ओरसया ठिकाणी वसविण्यात आले आहे. सर्वांत उत्तरेला देवगड तालुका व सर्वांत दक्षिणेला दोडामार्ग तालुका आहे. क्षेत्रफळाने सावंतवाडी तालुकासर्वांत मोठा आहे. जिल्ह्यात २०११ मध्ये एकूण ७४३ गावे, एक नगरपंचायतीसाठी गणना झालेले शहर (कुडाळ), तीन नगरपालिका(मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी) तर एक नगरपंचायत (कणकवली) होती.

भूवर्णन : प्राकृतिक दृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तीन विभागपडतात : (१) सह्याद्री, (२) वलाटी किंवा पठारी प्रदेश आणि (३)खालाटी किंवा किनारपट्टीचा प्रदेश. जिल्ह्याच्या पूर्व दिशेला सह्याद्रीच्याडोंगराळ रांगा व उंच प्रदेशाचा एकचढउतारांनी युक्त पट्टाच आहे. त्यालासह्याद्रीपट्टा किंवा वांद्रीपट्टा म्हणतात. या प्रदेशाने जिल्ह्याची बरीचभूमी व्यापली आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेत उंच व दुर्गम कडे आहेत.वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी ह्या तालुक्यांचा बराच भागह्या सह्याद्रीपट्ट्यात व त्याच्या पायथ्याच्या प्रदेशात येतो. या सह्याद्रीपट्ट्यात घनदाट जंगले आढळतात. पर्वतरांगांदरम्यानच्या भागात खोल दऱ्या आहेत. यांतून पलीकडे जाण्यासाठी काही ठिकाणी रस्ते जातात.त्यांना घाट म्हणतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोंडा, भुईबावडा व आंबोलीअसे तीन मुख्य घाट आहेत. त्यांतून मुख्यत्वे कोल्हापूर व कर्नाटकातीलबेळगाव जिल्ह्यांत जाता येते. या प्रदेशाचा उतार पूर्वेकडून पश्चिमेकडेआहे. या प्रदेशात भरपूर पाऊस पडतो.

डोंगराळ प्रदेशाच्या पायथ्याशी सह्याद्रीला लागून असलेला जोकाहीसा सपाट व पठारी भाग दिसतो, त्यालाच ‘वलाटी’ असे म्हणतात.यातही मधूनमधून डोंगर दिसतात. या पट्ट्यात नदीप्रवाहांनी आणलेलीगाळाची माती व पालापाचोळा यांनी बनलेली सुपीक काळी-तांबडीजमीन आहे. तद्वतच जांभा व बेसाल्ट प्रकारचे खडक आहेत. कणकवली,कुडाळ व सावंतवाडी या तालुक्यांचा पश्चिम भाग व सावंतवाडीचा मध्यभाग तसेच देवगड, मालवण तालुक्यांचा पूर्वभाग या मधल्या वलाटीतअंतर्भूत होतो. या पट्ट्यातील बरीचशी जमीन तांबडी आहे. नद्यांच्या काठीव सखल भागात काळी कसदार जमीनही आढळते. डोंगराच्या उतारावरपायऱ्या पायऱ्यांसारखी सोपान पद्घतीची शेते आढळतात. या पट्ट्यातकाळे बेसाल्ट खडक दिसतात. त्यांना काळेथर दगड म्हणतात. तसेचइमारतींना उपयुक्त जांभा दगडही पुष्कळ ठिकाणी सापडतो. अशा दगडांच्यासपाट जमिनीला भातळ म्हणतात. भात हे ह्या भागातील मुख्य पीक आहे.

वलाटीच्या पश्चिमेला जो किनारपट्टीचा प्रदेश आहे, त्यालाच खालाटीम्हणतात. जिल्ह्याला १२१ किमी. किनारपट्टी लाभली आहे. मालवण वदेवगड तालुक्यांचा पश्चिम भाग व संपूर्ण वेंगुर्ले तालुका या खालाटीच्यापट्ट्यात येतो. किनारपट्टीवरील जमीन रेतीमिश्रित हलकी असून कसदार वचिकण आहे. तीत प्रामुख्याने नारळ व पोफळीची लागवड केलेली आहे.सह्याद्री पट्यातून व वलाटीत पडलेल्या सर्व पावसाचे पाणी लहानमोठ्या नद्यांतून या खालाटी पट्टीत येते. समुद्राच्या भरतीच्या वेळी खारेपाणी उंची वाढल्यामुळे नदीच्या मुखातून आत जाते. नदीच्या जेवढ्या भागापर्यंत हे खारे पाणी पोहोचते, तेवढ्या भागाला खाडी म्हणतात.जिल्ह्यात तेरेखोलची खाडी, कर्लीची खाडी, कालावळीची खाडी, आचऱ्याची खाडी, देवगडची खाडी, विजयदुर्गची खाडी अशा काहीप्रसिद्घ खाड्या आहेत. खाड्यांच्या दोन्ही बाजूंस दलदलीची, चिकणमातीची जमीन आढळते, तिला खाजण म्हणतात. ती नापीक होते. अशाजमिनीला खार जमीनही म्हणतात. जिल्ह्यातील बरीचशी लोकसंख्याखालाटी याच प्रदेशात केंद्रित झालेली आहे. या प्रदेशात मधूनमधून लहान टेकड्या व घट्ट दगडाचे सपाट कातळ आढळतात. शिवायकिनाऱ्याला लागून समुद्रात काही लहान बेटे आहेत. त्या ठिकाणीसिंधुदुर्ग, विजयदुर्ग यांसारखे जलदुर्ग छ. शिवाजींनी बांधले. येथील दीपगृहेलक्षवेधक आहेत. जमिनीच्या सुपीकतेवरुन जिल्ह्यातील मृदेचे मुख्यत्वेचार प्रकार आढळतात : (१) साधारण ओलावा धरुन ठेवणारी जमीन,जिथे प्रामुख्याने भाताचे पीक घेतले जाते, त्याला वायंगण म्हणतात(२) किनाऱ्यालगतची रेताड जमीन, जिथे नारळ व सुपारी यांच्या बागाआहेत (३) डोंगर उताराची वरकस जमीन, जिथे प्रामुख्याने फणस,काजू, आंबा, रातांबा (कोकम)यांसारख्या फळांची व वरी, नाचणीयांची पिके घेतली जातात आणि (४) क्षारयुक्त खार जमीन, जीसाधारणतः नापीक असून कृषी उत्पादनासाठी अयोग्य ठरते. सावंतवाडी,कुडाळ, कणकवली व वैभववाडी या तालुक्यांत प्रामुख्याने भाताचे पीक होते. खालाटी व वलाटी या दोन्हींत भातमळे आढळतात. अलीकडेकाही भागात भुईमुग, संकरित ज्वारी, काही प्रमाणात ऊस ही पिकेपाण्याची सोय असेल तेथे घेतात. वेंगुर्ले तालुक्यात उभादांडा व दाभोलीया भागात भाजीपाला होतो. तो इतरत्र विक्रीस जातो. आडेली व वेतोरे(वेंगुर्ले तालुका) येथील कलिंगडे व चिबूड (एक प्रकारची काकडी) प्रसिद्घ आहेत. देवगड व वेंगुर्ले तालुक्यांत आंब्याचे पीक सर्वांत जास्तहोते आणि परदेशातही त्याला मागणी आहे. हापूस, पायरी व माणकूरया आंब्याच्या प्रमुख जाती होत.

जिल्ह्यात सिलिका, अभ्रक, लोखंड, मँगॅनीज, बॉक्साइट, क्रोमाइटइ. खनिज पदार्थ मिळतात. जिल्ह्यात जवळपास ४९ ठिकाणी खनिजप्रकल्प प्रस्तावित आहेत. सध्या कळणे, रेडी येथील खनिजे निर्यातहोतात. याशिवाय इमारतीचा जांभा दगड आणि सुद्‌धा नावाची रंगीतमाती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. जांभा दगडाचे मोठमोठे थरजमिनीखाली असतात. तो कापून त्याच्या चौकोनी विटा तयार करतात.त्याच्या खाणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. याशिवाय कठीण असाकाळ्या रंगाचा एक खडक असतो. त्याला कळीथर दगड म्हणतात. त्याचेओबडधोबड तुकडे निघतात. तो धरणे, पूल इत्यादींसाठी वापरतातआणि त्यापासून मोठमोठे स्तंभ व खडी तयार केली जाते. तसेच जाती,पाटे आदींसाठी तो वापरतात. कुरुंद जातीचा मऊ दगड आढळतो.त्यापासून मूर्ती बनवितात. शिवाय रांगोळीचा मऊ दगड ‘शिरगोळा’नावाने प्रसिद्घ आहे. रंगीत माती विशेष करुन केळूस, म्हापण (वेंगुर्लेतालुका) आणि पाट (कुडाळ तालुका) येथे अधिक प्रमाणात सापडते.

सिलिका दगडापासून काच तयार करतात. त्याच्या खाणी मठ,वालावल, वेतोरे, मेंडोली, कासार्डे, फोंडा, आचरे व मिठबाव या भागांतजास्त आहेत. सिलिका खाणीतून काढून तिची यंत्राने पूड करुन तीइतरत्र पाठविली जाते. विजेचे साहित्य व रंग तयार करण्यासाठीअभ्रकाचा उपयोग करतात. कुडाळ तालुक्यात कडावल येथे अभ्रकाचामोठा साठा जमिनीत आहे. कुडाळ, सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्यातलोखंड व मँगॅनीज यांचे साठे आहेत. आंबोली येथे बॉक्साइटाचे साठेआहेत. त्यापासून ॲल्युमिनियम धातू बनवितात. कणकवली तालुक्यातकणकवली, वागदे, जानवली येथे क्रोमाइट सापडते.


नद्या : जिल्ह्यातील बहुतेक सर्व नद्या सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगांत उगम पावून पश्चिमेकडील अरबी समुद्राला जाऊन मिळतात. यानद्यांची लांबी सरासरी ६३ किमी. आहे. शुक, गड, कर्ली, निलारी,तेरेखोल, जोग, जगबुडी, देवगड, आचरा या जिल्ह्यातील मोठ्यापश्चिमवाहिनी नद्या असून त्यांना मिळणाऱ्या अनेक लहान नद्या सह्याद्री पर्वतश्रेणीतच उगम पावतात. मात्र हिरण्यकेशी ही नदी पूर्ववाहिनी असूनती आंबोलीत उगम पावून पुढे कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यातून जाऊनकृष्णा नदीला विजापूरजवळ मिळते. या नद्या उंच पर्वताच्या उतारावरुनखळखळत खाली येत असल्याने त्या वेगाने वाहतात आणि आपल्याबरोबर गाळाची माती व पालापाचोळा वाहून आणतात. वलाटी व खालाटीच्या प्रदेशांत त्यांना इतर प्रवाह येऊन मिळतात आणि त्यांचाआकार हळूहळू मोठा होत जातो. पावसाळ्यात बहुतेक सर्व नद्यांना पूरयेतात मात्र उन्हाळ्यात त्यांपैकी काही शुष्क असतात. जिल्ह्यातीलबहुतेक सर्व नद्या व खाड्या भरतीचे पाणी घेणाऱ्या आहेत. जलवाहतुकीच्या दृष्टीने नद्यांचे मुखाकडील प्रवाह बऱ्याच प्रमाणात उपयुक्त ठरले आहेत. नद्यांच्या दोन्ही काठांवर सुपीक जमीन असून काही भागातभाताची दुबार पिके घेतली जातात.

हवामान : अरबी समुद्राच्या सान्निध्यामुळे येथील हवामान उष्ण,दमट व सम असते पण समुद्रापासून जितके पूर्वेकडील वलाटी वसह्याद्री पट्ट्याकडे जावे, तितकी हवा उन्हाळ्यात जास्त उष्ण व हिवाळ्यातजास्त थंड होत जाते. तसेच जास्तीत जास्त ती कोरडी होत जाते.उन्हाळ्यातील इतर महिन्यांच्या मानाने मे महिन्यात जिल्ह्याचे तापमानसर्वाधिक असते तर डिसेंबर-जानेवारी महिन्यांत किमान तापमानआढळते. जिल्ह्यात स्पष्टपणे तीन ऋतू जाणवतात. हिवाळ्यातील दैनंदिनसरासरी कमाल तापमान ३० से. व किमान तापमान २० से. तरउन्हाळ्यातील दैनंदिन सरासरी कमाल तापमान ३० ते३३ से. वकिमान तापमान २० ते२६ से. असते. जून महिन्यात पावसालासुरुवात झाल्यावर तापमानाची तीव्रता कमी होते मात्र आर्द्रताजाणवते. वर्षात केव्हाही हवेतील आर्द्रता ५५ टक्क्यांपेक्षा क्वचित कमीअसते. जून ते सप्टेंबर दरम्यान नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून प्रतिरोधप्रकारचा पाऊस पडतो. साधारणतः जुलै महिन्यात त्याचा जोर अधिक असतो. पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून सह्याद्री पर्वतरांगांकडे वाढतजाते. घाटमाथ्यावर विशेषतः आंबोलीत सर्वाधिक पर्जन्यवृष्टी होते.जिल्ह्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ३०० सेंमी. आहे.

वनस्पती व प्राणी : जिल्ह्यात घनदाट जंगल असून बहुतेकअरण्ये वनखात्याच्या अखत्यारीत आहेत. विशेषतः सावंतवाडी, दोडामार्ग,कणकवली, वैभववाडी या तालुक्यांतून जंगलांचे प्रमाण जास्त आहे.सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्ये आहेत.त्याच्या पश्चिमेला पाणझडी वृक्ष आढळतात. जंगलामध्ये प्रामुख्यानेऐन, साग, शिसव, नाणा, किंजळ, शिवण, हिरडा, खैर इ. महत्त्वाच्यावृक्षांच्या जाती आहेत. त्यांपासून लाकडांचे भरपूर उत्पन्न मिळते. याशिवायमध, मेण, डिंक, शिकेकाई, लाख, रंग, औषधी वनस्पती, कातडीकमाविण्यासाठी लागणारी साल अशी काही दुय्यम उत्पादनेही प्रस्तुतजंगलातून मिळतात. अलीकडे रबराच्या झाडांची लागवड करण्यात आलीआहे. आंबा, फणस यांच्या लाकडांचाही घरबांधणीतील दरवाजे, खिडक्या,तुळयांसाठी उपयोग केला जातो. जंगलात हत्ती, बिबट्या, लांडगा, सांबर,गवा, रानडुक्कर, ससा, कोल्हा, हरिण वगैरे प्राणी असून दोडामार्गतालुक्यात हत्तींचा उपद्रव अलीकडच्या काळात वाढला आहे.

आर्थिक स्थिती : सिंधुदुर्ग हा विकसनशील जिल्हा आहे.जिल्ह्यात नैसर्गिक संपत्ती विपुल आहे, पण जिल्ह्याची प्रगती धिम्यागतीने होत आहे. बहुसंख्य उत्पादनाची साधने निसर्गाशी निगडित आहेत.मागासलेल्या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने एकात्मिकक्षेत्र विकास हा युनिसेफ पुरस्कृत कार्यकम महाराष्ट्रात प्रारंभी केवळरत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत १९८१ पासून राबविण्यात आला.या कार्यक्रमांतर्गत माता-बाल कल्याण, सकस आहार, सामुदायिक स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार व आर्थिक विकास, प्रशिक्षण आणिसंस्था विकास या प्रमुख योजना राबविण्यात आल्या. शेती व मच्छीमारी हे या जिल्ह्यातील दोन प्रमुख व्यवसाय असून सु. ६० टक्केलोकसंख्या या व्यवसायांवर अवलंबून आहे. जिल्ह्यातील एकूण कृषिक्षेत्रापैकी आंबा २७,५६३ हे., काजू ६०,८२५ हे., नारळ१६,६०० हे., सुपारी ८९० हे. आणि भात ७४,४०० हे. या पिकांनीमुख्यत्वे व्यापले आहे. मच्छीमारी आणि फळबागा या दोन व्यवसायांनाजिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. जिल्ह्यात १७-१८ हजारमे. टन मत्स्योत्पादन होते. त्यातून रोजगार वाढला आहे व उत्पन्नहीमोठ्या प्रमाणावर मिळते. शंभर टक्के अनुदानातून फलोत्पादन यायोजनेुळे हजारो हेक्टर क्षेत्र आंबा, काजू, रातांबा आदींच्या लागवडीखाली आले आणि उत्पादनाबरोबरच जिल्ह्याच्या उत्पन्नात वाढ झाली.जिल्ह्यात काही ठिकाणी तलाव आहेत. त्यांपैकी धामापूर (मालवणतालुका) मोठा आहे. या शिवाय पाट (कुडाळ तालुका), खांबोळे,कुसूर, कोकिसर (वैभववाडी तालुका), रेडी (वेंगुर्ले तालुका) येथीलतलावही प्रसिद्घ आहेत. कर्ली नदीवर कुडाळ तालुक्यात टाळंबा गावीआणि कणकवली तालुक्यात घोणसरी येथे मातीची धरणे बांधलीआहेत. तसेच तिलारी नदीवर एक धरण आहे तथापि या तालुक्यातउन्हाळी पिकासच त्याचा फायदा होतो. बहुतेक शेती मोसमी पर्जन्यावरचअवलंबून आहे कारण विशिष्ट प्राकृतिक रचनेुळे एकूण जमिनीपैकीलागवडयोग्य क्षेत्र तुलनात्मक दृष्ट्या फार कमी आहे.


भात हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून नाचणी, वरी, तीळ, नागली,मिरी इ. पिके होतात. भाताच्या अनेक जातींचा वाण वापरला जातो.अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित भाताच्या पिकावर अलीकडे अधिकजोर दिला जातो आणि जपानी पद्घतीनेही भाताची लागवड रोपे तयारकरुन केली जाते. पंकज, वरंगल प्रकारांच्या भाताची अधिक लागवडहोते. भातापासून पोहे व चुरमुरे तयार करण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावरचालतो. चुरमुरे विशेषतः बेळगावातून करुन आणतात. कणकवली,वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यांत भाताचे दुबार पीकही घेतात.अलीकडेकडधान्यांबरोबरच मका, मिरची अशा अन्य पिकांचीहीलागवड होऊ लागली आहे. आंबा, फणस, काजू, कोकम, नारळ, सुपारी,केळी इ. जिल्ह्यातील नगदी पिके होत. देवगड व वेंगुर्ले येथील हापूसआंबा प्रसिद्घ असून त्याची परदेशात निर्यात होते. देवगडला आंब्याच्यामोठ्या बागा आहेत. तेथील विशिष्ट प्रकारची मृदा आणि हवामान यांमुळेअसा वाण इतरत्र कोकणातच नव्हे, तर देशातही फारसा कुठेच आढळतनाही. आंब्याच्या पेट्या व करंड्या बनविण्याचा उद्योग मोठा असून आंब्यापासून लोणची, मुरंबा, आंबावडी आणि त्याचा रस (पल्प) हवाबंदडब्यात भरण्याचा (कॅनिंगचा) पूरक व्यवसायही मोठ्या प्रमाणावर चालतो.हापूस शिवाय पायरी, माणकूर व रायवळ याही आंब्याच्या जाती आहेत.एकूण आंब्यावर प्रक्रिया करण्याच्या उद्योगात तरुण पिढी आढळते.नारळाच्या बहुविध वस्तू बनविण्याचे उद्योग जिल्ह्यात आढळतात.काथ्या,काथ्यापासून सुंभ, ब्रश व पायपुसणी तयार करतात. दावी वदोरखंड बनवितात. झावळ्यांपासून केरसुण्या बनवितात. किनाऱ्यावरीलबहुतेक सर्व गावांत हा व्यवसाय चालतो. वेंगुर्ले, आरोंदा, मालवण, वालावलआदी ठिकाणी हे काम यंत्राच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर चालते.तसेच खोबऱ्यापासून तेल काढण्याचे घाणे व गिरण्या खालाटीत आहेत. मठ, वजराट (वेंगुर्ले तालुका), कट्टा व सुकळवाड (मालवण तालुका)येथे हातमागावर कापड विणतात. कणकवलीचे हातमागावरील पंचेप्रसिद्घ आहेत. तांबड्या मातीपासून भांडी, मडकी, शेगड्या यांबरोबरचनक्षीदार तुळशी वृंदावने बनविण्याची खासियत येथील कुंभारांत आढळते.सावंतवाडीतील खेळणी व लाकडी फळे परदेशातही जातात. आप्पासाहेबपटवर्धन यांनी बसविलेल्या गोपुरीत हातकागद, जनावरांची कातडीकमावणे, कोकमपासून सरबत असे उद्योग चालतात. वेंगुर्ले, मालवणआदी गावांत काजूवर प्रक्रिया करण्याचे कारखाने असून हा काजूपरदेशात निर्यात होतो. अरबी समुद्रात सुरमई, बांगडा, कार्ली, रावस,पापलेट, रेणवे व विशेषतः कोळंबी मोठ्या प्रमाणावर मिळते. त्यामुळे कोळंबीवर प्रक्रिया करण्याचे उद्योग वाढले असून कोळंबीचे हवाबंद डबेपरदेशात पाठविले जातात, तसेच सुक्या मासळीपासून खत तयार करण्याचेकारखाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. देवगडचे अडकित्ते प्रसिद्घअसून मालवणला चाकू, सुऱ्या, कात्र्या बनविण्याचे कुटिरोद्योग आहेत.देवगड व मालवण येथे मोठी गलबते बांधण्याचे काम चालते. कणकवलीतालुक्यात करुळ येथे काच कारखाना आहे. कुडाळ, कणकवली वसावंतवाडी येथेही काच कारखाने आहेत. जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र फारमोठे नाही. कुडाळ, कणकवली व सावंतवाडी येथे औद्योगिक वसाहती (एम्.आय्.डी.सी.) असून कणकवली व सावंतवाडी येथील औद्योगिकवसाहती लहान (मिनी) आहेत. तिथे लहानमोठे उद्योग चालतात.कुडाळच्या औद्योगिक वसाहतीत मोटारीचे सुटे भाग (स्पेअर पार्ट्स)बनवितात. शिवाय लोखंडी ओतकामाचा एक मोठा कारखाना आहे.सावंतवाडी येथे औद्योगिक प्रशिक्षण देणारे विद्यालय आहे. तसेचमिठबाग व तारकर्ली येथे मच्छीमारीचे प्रशिक्षण देणारी विद्यालयेआहेत. सावंतवाडी, कुडाळ व वेंगुर्ले येथे कृषी उत्पादनाच्या प्रमुख बाजारपेठा आहेत. पर्यटन व्यवसायही अलीकडे वाढला असूनपर्यटकांच्या दिमतीसाठी उपहारगृहे, विश्रांतिगृहे व निवास व्यवस्था यांचीझपाट्याने वाढ होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मर्यादित लोहमार्ग असून मुंबई – गोवा हा १७  क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग कणकवली, कुडाळ – सावंतवाडीवरुन जातअसल्याने काही उद्योगधंद्यांना चालना मिळाली आहे. तसेच कोकणरेल्वेने जिल्ह्याच्या औद्योगिकीकरणास मदत होत आहे. समुद्रकिनाऱ्यानेजाणाऱ्या रेडीरेवस महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळेसर्व तालुके आणखी जवळ येतील. शिवाय प्रत्येक गावात डांबरीसडक पोहोचली आहे. वेंगुर्ले व सावंतवाडीवरुन आंबोली घाटातूनबेळगावकडे डांबरी रस्ता जातो. मालवण, कसाल, कणकवलीवरुनफोंडा घाटातून कोल्हापूरकडे डांबरी रस्त्याने रहदारी होते. देवगड,नांदगाववरुन फोंडाघाटातूनही कोल्हापूरकडे एक मार्ग आहे. कणकवली,नांदगाव, तरळे, वैभववाडीवरुन करुळ घाटातून गगनबावडामार्गेकोल्हापूरकडे एक रस्ता जातो. तसेच आचरे, कणकवलीवरुनहीकोल्हापूरकडे जाता येते. याशिवाय अनेक मार्ग आहेत. बहुतेक गावेरस्त्यांनी मोठ्या गावांना जोडली आहेत सार्वजनिक बांधकाम विभागआणि जिल्हा परिषद यांच्या अखत्यारीत ४,७८० किमी.चे रस्तेजिल्ह्यात आहेत. जवळपास गाव तिथे बससेवा आहे पण पावसाळ्यातनद्यानाल्यांना पूर आल्यानंतर काही गावांचा संपर्क तुटतो. जिल्ह्यात ३६८ डाक कार्यालये असून दूरध्वनी सेवा बहुतेक शहरांत आहे. समुद्रकिनाऱ्यावर अनेक बंदरे आहेत. त्यांत विजयदुर्ग, देवगड, आचरे, मालवण,वेंगुर्ले व रेडी ही मोठी असून त्यांतून गलबते, लहान नावा, आगबोटीयांची सु. आठ महिने वाहतूक चालते. बारमाही वाहतुकीसाठी प्रयत्नसुरु आहेत. तसेच रेडी आणि विजयदुर्ग या बंदरांचा विकास आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने खासगीकरणाच्यामाध्यमातून प्रकल्प मंजूर केला आहे. चिपी (वेंगुर्ले तालुका) येथेविमानतळ बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

लोक व समाजजीवन : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येमध्ये दर हजार पुरुषांमागे १,०३७ स्त्रिया असे प्रमाण होते (२०११).लोकसंख्या वाढीचा दर २००१ ते २०११ दरम्यान २·३ टक्के होता.समुद्रकिनाऱ्याच्या सान्निध्यातील खेडेगावांमध्ये मच्छीमारी करणाऱ्यादालदी, भंडारी, गाबीत, कोळी आदींची वस्ती आहे. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी ९·४७ टक्के लोक शहरी भागात राहतात. जिल्ह्यातीललोकसंख्येची घनता दर चौ. किमी.ला १६३ होती (२००१). खेडेगावांतील घरे उतरत्या छपरांची असून प्रत्येक घरासमोर मोठे अंगण,तुळशी वृंदावन, माड व आंब्याची झाडे असतात. बहुतेक खेड्यांचेविद्युतीकरण झाले आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय असून कुक्कुटपालनव पशुपालन हे जोड व्यवसायही केले जातात. तांदळाचा भात व माशाचेनिस्त्याक (कालवण) आणि नाचणी वा तांदळाची भाकरी हे कोकणी माणसाचे आवडते जेवण होय. ओल्या नारळाचा सर्रास वापर असतो.शिवाय जेवणाबरोबरच कोकमचे सार, सोलकढी बहुधा असतेच.उकड्या तांदळाची पेज सर्वत्र लोकप्रिय आहे. शाकाहारी जेवणातगऱ्याचे सांदण (एक गोड पदार्थ), करमळचे (एक आंबट फळ) लोणचे,कण्यांचा सांजा, अप्पे व भात आणि नाचणी वा ज्वारीचीभाकरी हे पदार्थ असतात. शेतीचे पुरेसे उत्पन्न उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील अनेकतरुण पूर्वी मुंबईत नोकरी करीत असत पण अलीकडे ही संख्या खूपकमी झाली आहे. गौरी-गणपती व शिमगा (होळी) हे प्रमुख सण असूनमुंबईहून चाकरमानी आवर्जून जिल्ह्यात येतात. गणेशोत्सवात भजने-फुगड्या यांचा कार्यकम हमखास असतो. पाच दिवस तांदळाच्यापिठाचे गुळखोबरे घातलेले मोदक आणि करंज्यायांचे जेवण करतात.दसरा हा सण मुख्यत्वे धनगर जातीतील लोक मोठ्या थाटात साजरा करतात. ढोलाच्या तालावर रात्रभर नाच करतात. दिवाळीनंतर देवळांतूनदहिकाला होतो. रात्री देवांची पालखी काढतात. त्यानंतर दशावतारी नाटकहोते. दशावतारी मंडळी एका गावाहून दुसऱ्या गावी नाटके करीत फिरत असतात. अद्यापि ही लोककला जिल्ह्याने जपून ठेवली आहे. होळीच्यासणाला पालखी नाचविण्याचा कार्यक्रम असतो, तसेच सोंगे आणतात वती घरोघरी जातात. कोळी लोक नारळी पौर्णिमेचा सण उत्साहाने साजराकरतात कारण त्यानंतर समुद्र शांत होऊन मच्छीमारीस प्रारंभ होतो.पिंगुळी गावातील (कुडाळ तालुका) ठाकर जातीतील लोक कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करतात. त्यात रामायण-महाभारत   यांतील कथादाखवितात. या उद्योगार्थ पावसाळ्यानंतर ते गावोगाव भटकतात.जिल्ह्यातील लोकांचा पोशाख प्रदेशपरत्वे भिन्न आढळतो. समुद्रातमच्छीमारी करणारा कोळी लंगोटी नेसतो व डोक्याला एक रुमालबांधतो मात्र त्यांच्या बायका नऊवारी लुगडे नेसतात. सामान्य शेतकरीसाधा पंचा नेसतो व अंगावर घोंगडी घेतो. घाम फार येतो म्हणून ते सुतीकापडाचे पातळ कपडे वापरतात मात्र सणासुदीला हे लोक चांगलापोशाख करतात. मुंबई शहराशी सतत संबंध असल्याने शहरी लोकांच्यापोशाखात व राहणीमानात फरक पडला आहे. त्यामुळे खेड्यातीललोकही त्यांचे अनुकरण करु लागले आहेत. जिल्हावासीय मराठी वकोकणी, विशेषतः मालवणी, कोकणी भाषा बोलतात. जिल्ह्यात सिंधुदुर्गसमाचार, रत्नागिरी टाइम्स   (आवृत्ती), प्रहार  ही दैनिके प्रकाशित होतात.शिवाय सकाळ, पुढारी, लोकमत, तरुण भारत, पुण्यनगरी या दैनिकांच्याआवृत्त्या निघतात. जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण समाधानकारक असूनगामीण भागात ते ७९·७० टक्के व शहरी भागात ८७·७० टक्के आहे.


महत्त्वाची स्थळे : पर्यटकांना मोहिनी घालील असे निसर्गसौंदर्यया जिल्ह्याला लाभले आहे. जिल्ह्यात अनेक रमणीय स्थळे व मंदिरेआहेत. ती पाहण्यासाठी आणि जत्रेनिमित्त अनेक पर्यटक दरवर्षीयेतात व जिल्ह्यात फेरफटका मारतात. जिल्ह्याच्या विकासाची कृषी,मत्स्योत्पादन व पर्यटन ही त्रिसूत्री मानली जाते. जिल्ह्याला १९९७ मध्येपर्यटन जिल्हा हा दर्जा देण्यात आला.

जिल्ह्यातील सावंतवाडी (लोकसंख्या २२,९०१–२०११), मालवण(१७,९९२), वेंगुर्ले (१२,२५४), कुडाळ (११,५९१) ही काहीमहत्त्वाची निमशहरे व गावे होत. सावंतवाडी तालुक्यातील आंबोलीहे गिरिस्थान (७२५ मी.) व परिसरातील हिरण्यकेशी आणि नगरतसधबधबे प्रेक्षणीय आहेत. मालवणची पुळण, सिंधुदुर्ग किल्ला, धामापूरतलाव ही प्रेक्षणीय स्थळे असून मालवणजवळील आंगणेवाडी-मसुरेयेथील भराडी देवीची यात्रा फार मोठी असते. या यात्रेला २०१२ मध्येनऊ लाख भाविक आले होते. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरातील समुद्रातस्नॉर्कलिंग नावाचा एक छंद गेली तीन वर्षे जोपासला जात आहे. यातसहभागी होणारी व्यक्ती हवानळाद्वारे (स्नॉर्केल) श्वासोच्छ्वास घेतसमुद्राच्या तळातील सृष्टी पाहण्याचा अनुभव व आनंद लुटते, तसेचमालवण, देवगड, जिवती येथे समुद्रात डॉल्फिन दर्शनाचा आनंदही घेता येतो. वेंगुर्ल्याची पुळण आणि तेथील सागरेश्वर मंदिर प्रसिद्घ असून गावातरामेश्वर (ग्रामदैवत) व सातेरीदेवी यांची सुरेख मंदिरे आहेत. याशिवायरेडी येथे नवदुर्गा, गणेश (द्विभुज), रामपुरुष, स्वयंभू शिव ही अन्य मंदिरेआहेत. आरवली-शिरोडा येथे विठोबा, सातेरीदेवी व नवलाईदेवी तरआजगाव येथे वेताळेश्वर मंदिर आहे. शिरोडे येथे १९३० मध्ये मिठाचासत्यागह झाला. जिल्ह्यात कुणकेश्वशर मंदिर परिसर (देवगड तालुका)पर्यटकांचे खास आकर्षण आहे. येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.विजयदुर्ग किल्लाही पाहण्यासारखा आहे. जिल्ह्यात श्री साटम महाराज(दनोळी), श्री राऊळ महाराज (पिंगुळी), श्री टेंबेस्वामी (माणगाव),श्री भालचंद्र महाराज (कणकवली) वगैरे संतसदृश महान विभूती झाल्या.त्यांच्या स्मरणार्थ वा त्यांनी स्थापन केलेले मठ-मंदिरे ही जिल्हावासियांची श्रद्घास्थाने आहेत. माणगावला (सावंतवाडी तालुका)श्री. टेंबेस्वामींनी दत्तात्रेयाचे मंदिर बांधले आहे. (चित्रपत्रे).


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *