ताज्या बातम्या

शिरीष कुमार स्मारक माहिती


आपल्या देशासाठी, देशातील नागरिकांसाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली आहे. त्याच स्वातंत्र्यवीरांमुळे आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत, म्हणूनच देशासाठी लढणाऱ्या आणि आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. इतिहासाची पाने उलगडून पाहिली असता अनेक शूरवीरांचं देशप्रेम आणि त्यांचे समर्पण आपल्याला दिसून येते. ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीतून आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांचा सहभाग मोलाचा राहिला आहे. यातलंच एक नाव म्हणजे शहीद शिरीषकुमार.

भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत महात्मा गांधींनी १९४२ मध्ये ब्रिटिशांविरूद्ध ‘भारत छोडो’ आंदोलन सुरू केले. त्यावेळी त्यात लहानथोरांपासून अनेकांचा समावेश होता. नंदुरबारमधील १५ वर्षीय बालक्रांतिकारक ‘शिरीषकुमार मेहता’ यांना देखील या चळवळीत हौताम्य आलं. त्यामुळेच त्यांच्या हौतात्म्याच्या स्मृती जागवणारा ‘शहीद शिरीषकुमार’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिरीषकुमार यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून नंदुरबार येथील ‘शहीद शिरीषकुमार स्मारक’ येथे नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

नंदुरबारमध्ये ९ सप्टेंबर १९४२ रोजी इंग्रजांना ‘चले जाव’चा आदेश देणारी प्रभात फेरी निघाली होती. या फेरीत शिरीषकुमार मेहता आणि त्यांच्या मित्रांनी सहभाग घेतला होता. या फेरीत १५ वर्षीय ‘शिरीषकुमार मेहता’ सरकारच्या विरोधात मोर्चाचे नेतृत्व करत होते. पोलिसांच्या विरोधाला न जुमानता देशभक्तीने भारावलेल्या शिरीषकुमार यांनी ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’ सारख्या घोषणा चालूच ठेवल्या. शेवटी पोलिसांनी गोळीबार सुरु केला. या गोळीबारात शिरीषकुमार जागेवरच कोसळले, मात्र हातातला झेंडा त्यांनी अखेरपर्यंत सोडला नाही. त्यांच्यासोबत घनश्याम दास, शशिधर केतकर, लालदास शहा हे त्यांचे चारही मित्र शहीद झाले.

या चित्रपटाचं दिग्दर्शन भावेश पाटील करत असून निर्मिती माधुरी वडाळकर करत आहेत. आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या या देशभक्ताच्या समर्पणाची आठवण आजच्या पिढीला करून देण्यासाठी ‘शहीद शिरीषकुमार’ चित्रपटाची धुरा हाती घेतल्याचे दिग्दर्शक भावेश पाटील यांनी सांगितलं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *