ताज्या बातम्या

शेल माहिती


शेल : सामान्यपणे व विस्तृतपणे आढळणारा गाळाचा खडक. भूकवचातील एकूण गाळाच्या खडकांपैकी १/२ ते २/३ खडक शेल असतात. ०.०२५ मिमी.पेक्षा कमी आकारमानाचे कण असणारा हा खडक पत्रित किंवा स्तरभिदुर असतो. पंकाश्म, गाळवटी खडक व मृत्तिकाश्म ही याची उदाहरणे आहेत.

 

जमिनीवर वातावरणक्रिया व झीज होऊन गाळवट व मृत्तिका तयार होतात. हे सूक्ष्मकण पाण्याच्या प्रवाहांत निलंबित रूपात वाहून नेले जातात. गुरूत्वाकर्षणाने, पाणी वाफेच्या रूपात उडून गेल्याने वा जमिनीत त्याचा निचरा झाल्याने असे सूक्ष्मकण खाली बसतात. त्यांचे पुंज बनल्यास ते जलदपणे खाली जातात. पुष्कळदा त्यांचे १० मिमी.पेक्षा पातळ थर पत्रण रूपात साचतात. गुरूत्वाकर्षणाने मृत्तिकेचे व कमजोर प्रवाहांनी गाळवटीचे थर एकाआड एक साचू शकतात. खोल सागरी तळ, समुद्राच्या उथळ द्रोणी व नदयांच्या पूरभूमीतील सपाट भाग (प्लाया) येथे शेल तयार होतात.

 

बहुतेक शेल अनेक मीटर जाडीच्या विस्तृत चादरींच्या रूपात तर काही मसुराकार निक्षेपांत आढळतात. पुष्कळदा ते वालुकाश्मांच्या किंवा चुनखडकांच्या थरांबरोबर आढळतात. मात्र शेल मऊ असल्याने याचे नैसर्गिक रीत्या उघडे पडलेले भाग वालुकाश्म किंवा चुनखडक यांच्या तुलनेत कमी आढळतात.

मृत्तिकायुक्त चिखलाच्या थरांत बरीच छिदे असतात. या चिखलावर नंतर गाळ साचून भार पडतो. त्यामुळे चापट कणांची अधिक प्रमाणात समांतर मांडणी होऊन सच्छिद्रता कमी होते, छिद्रे लहान होतात व पाणी निघून जाते. साचल्यावर पण घट्ट होण्याआधी गाळात भौतिक व रासायनिक बदल होतात. त्यांना अनुनिक्षेपण म्हणतात. खोलवरच्या भागात उच्च तापमानामुळे शेलमधील काही खनिजांचे व कार्बनी द्रव्यांचे अधिक स्थिर अवस्थेत परिवर्तन होते. वाढते तापमान व दाब यांच्यामुळे कधीकधी शेलचे पाटीच्या दगडात रूपांतरण होते.

 

शेलमध्ये सु. ३० टक्के मृद्खनिजे, तेवढीच क्वॉर्ट्‌झ तसेच फेल्स्पारे, पायराइट, ॲपेटाइटासारखी गौण खनिजे, कार्बोनेटी संयोजक द्रव्य, ज्वाला काचेसारखे चूर्णरूप द्रव्य, लोह व ॲल्युमिनियमाची ऑक्साइडे, सिलिका व कार्बनी द्रव्ये असतात. स्मेक्टाइट, इलाइट, केओलिनाइट, माँटमोरिलोनाइट व क्लोराइट ही यातील सर्वांत सामान्य मृद्खनिजे आहेत. विपुल लोहयुक्त शेलमध्ये पायराइट, सिडेराइट व लोह सिलिकेटे तर विपुल कार्बोनेटयुक्त शेलमध्ये जीवाश्मही आढळतात.

स्रोत क्षेत्राचे खनिजविज्ञान, जलवायुमान, भूसांरचनिक स्थिती, सूक्ष्म-कण वाहून आलेले अंतर व साचण्याच्या वेळचे पर्यावरण यांनुसार शेलमधील खनिजे तयार होतात. वाहून आलेले अंतर व साचण्याची यंत्रणा यांवर कणांचे आकारमान अवलंबून असते. साचल्यावर लवकरच कार्बनी द्रव्यांचे ऑक्सिडीभवन होते. विपुल कार्बनी द्रव्ययुक्त शेल काळे वा गडद रंगाचे असतात. त्यांच्यावरून जीवांची विपुलता, जलदपणे साचले व गाडले जाण्याची क्रिया आणि ऑक्सिजनाची कमतरता या गोष्टी सूचित होतात. काही कार्बनी द्रव्यांचे हायड्रोकार्बनांत रूपांतरहोते. अशी हायड्रोकार्बने खनिज तेल व नैसर्गिक वायूच्या साठयंचा प्रमुख स्रोत असतात. विपुल कार्बनी द्रव्ययुक्त खडकांना ऑइल शेल म्हणतात. त्यांच्यात वनस्पती व प्राणी यांच्यापासून बनलेल्या घनरूप हायड्रोकार्बनांचे रासायनिक रीतीने झालेले जटिल मिश्रण म्हणजे केरोजेन पुरेशा जास्त प्रमाणात असते. तीव्र उष्णतेने अशा हायड्रोकार्बनांचे ऊर्ध्वपातनाव्दारे तेलात रूपांतर होऊ शकते. म्हणून यात तेल नसले, तरी या खडकाला ऑइल शेल म्हणतात.

 

हेमॅटाइट व लिमोनाइट या सजल लोह ऑक्साइडांमुळे शेलला तांबूस व जांभळी तर विपुल फेरस लोहयुक्त घटकांमुळे निळसर, हिरवट, उदसर, करडसर किंवा काळसर छटा येते. कॅल्साइटयुक्त चूर्णीय शेल करडसर, पिवळसर वा पांढरे असतात.

गाडलेल्या चिखलाचे घनीकरण व पटल विभाजन होताना जे बदल होतात, त्यांवर शेलचे भौतिक व यांत्रिक गुणधर्म मोठया प्रमाणावर अवलंबून असतात. उदा., सच्छिद्रता जेवढी कमी तेवढी खडकांची घनता जास्त असते. विपुल कार्बनी द्रव्ययुक्त खडक कमी घट्ट असतो तर कार्बोनेटी संयोजक द्रव्याने तो अधिक घट्ट होतो. खडकाचे पारगम्यता व आकार्यता हे गुणधर्म मुख्यतः त्यातील कणांच्या आकारमानांवर अवलंबून असतात.सूक्ष्मकणांमुळे शेल वालुकाश्मांपेक्षा पुष्कळच कमी पार्य असतात. कारण घटत्या सच्छिद्रतेनुसार पार्यता घटते. घनीकरणांच्या प्रेरणांनी व भूसांरचनिक हालचालींनी कणभंग पावून पार्यता वाढू शकते. घट्ट शेल कमी पार्य असल्याने त्यांच्यात भूमिजल व हायड्रोकार्बने साचू शकतात. जादा पाणी असलेल्या चिखलाचे यांत्रिक बल कमी असते. मात्र घनीकरणात कणांची पुनर्मांडणी होऊन सच्छिद्रता व छिद्रांचे आकारमान कमी होतात आणि पाणी निघून गेल्याने यांत्रिक बल झपाटयाने वाढते. तथापि घनीकरणानंतरही शेलचे यांत्रिक बल बहुतेक खडकांपेक्षा कमीच असते. शेल स्तरभिदुर असतो. म्हणजे स्तरणतलाला समांतर गुळगुळीत पृष्ठाला अनुसरून याचे पातळ पत्रे सहजपणे अलग होतात.कधीकधी याची पत्रणाशी गल्ल्त होते.मात्र स्तरभिदुरता हा वातावरणीय आविष्कार असून तो पत्रणाशी निगडित असू शकतो.

 

मृत्तिकाश्म (मृत्तिका शेल) मुख्यतः मृद्खनिजांचे कण व अभकाचे सूक्ष्म तुकडे यांचे, तर पंकाश्म व गाळवटी खडक मुख्यतः सूक्ष्मकणी क्वॉर्ट्‌झचे बनलेले असतात. त्याच्यातील वाळूचे प्रमाण व कणांचे आकारमान वाढत गेल्यास त्याला वालुकाश्म म्हणतात. तसेच शेल, चूर्णीय शेल व चुनखडक यांच्यात सुस्पष्ट सीमारेषा नसते. शेलमधील कॅल्साइटाचे प्रमाण वाढले की, मार्ल किंवा चुनखडक बनतो. बीजुके व परागकणांसारखी वनस्पतिज द्रव्ये विपुल असणाऱ्या शेल खडकांना कॅनल कोल म्हणतात. तो मंदपणे जळू शकतो. कागदाच्या जाडीचे पापुद्रे असणाऱ्या खडकाला कागदी (पेपर) शेल म्हणतात. गाळवटीचे प्रमाण, पत्रणाचा प्रकार, रंग, खनिज व रासायनिक संघटन या गुणधर्मांनुसार शेलांचे वर्गीकरण करतात. साचण्याच्या वेळचे पर्यावरण आणि साचल्यावर घनीकरण व अनुनिक्षेपण यांच्यामुळे झालेले बदल हे या गुणधर्मांतील बदलांशी निगडित असतात.

शेलमधील कण वा पुंज नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत, मात्र प्रकाशकीय सूक्ष्मदर्शक व इलेक्ट्नॉन सूक्ष्मदर्शक आणि प्रयोगशाळेतील इतर सामग्रीची मदत न घेता शेलमधील गाळवट, पत्रण व त्यांचा प्रकार, कार्बोनेटी संयोजक व रंग यांचे वर्णन करता येते.हेसूक्ष्मदर्शक, क्ष-किरण चित्रण व विवर्तन, तसेच कणांच्या आकारमानांनुसार झालेल्या वाटणीचा आणि कणांची दिक्स्थिती, खनिज व रासायनिक संघटन यांचा तपशील अचूकपणे ठरविण्यासाठी करावी लागणारी रासायनिक विश्लेषणे यांच्या मदतीने शेलचे अधिक परिपूर्ण वर्णन करता येते.

 

व्यापारी दृष्ट्या शेल महत्त्वाचे खडक असून विशेषतः मृत्तिका उदयोगात विटा, कृत्रिम फरश्या (टाइल्स), मृत्पात्री इ. वस्तू बनविण्यासाठी, तसेच पोर्टलंड सिमेंटनिर्मितीमध्ये (ॲल्युमिना व कॅल्शियमयुक्त) कच्चामाल म्हणून आणि भरण व पूरण द्रव्य म्हणून शेल वापरतात. तेल मिळविण्याच्या पद्धतींमध्ये प्रगती झाल्यास ऑइल शेलपासून व्यावहारिक दृष्ट्या द्रवरूप खनिज तेल मिळू शकेल. त्याच्यापासून इंधन, मेण, टार, अम्ले व क्षारक इ. पदार्थ मिळू शकतात. म्हणून ऑइल शेलचे जगातील विस्तृत निक्षेप हे भविष्यातील महत्त्वाचे इंधनाचे स्रोत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *