पुणे : पुण्यात आल्यावर बोलायला खूप टेंशन येते. कारण इथे सर्वजण हुशार आहेत. प्रज्ञावंत आहेत. त्यामुळेच या सभागृहात सर्वांना चष्मे लागलेले आहेत. देशात कुठे जर सर्वात सुशिक्षित लोकं असतील, तर ते पुण्यात आहेत.
इथल्या सभागृहातील सर्वजण पुण्यभूषणाचे मानकरी आहेत. आज मोहन आगाशे यांना दिलेला हा पुरस्कार केवळ पुण्याचा नाही, तर देशाचा होऊ शकतो. त्यामुळे त्यांना भारतभूषण असेही म्हणता येईल, असे गौरवोदगार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी काढले.
निमित्त होते, त्रिदल पुणे, पुण्यभूषण फाउंडेशन आणि पुणेकरांच्या वतीने देण्यात येणाऱ्या ३५ व्या पुण्यभूषण पुरस्काराचे! ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना आज बालगंधर्व रंगमंदिरात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री पद्मभूषण शर्मिला टागोर आणि पद्मभूषण अनुपम खेर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. सोन्याच्या नांगराने भूमी नांगरणारे बाल शिवाजी यांचे शिल्प असणारे पुण्यभूषण सन्मानचिन्ह, पुणेरी पगडी, शाल आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या प्रसंगी व्यासपीठावर पुण्यभूषण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, पदमश्री प्रतापराव पवार, पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, गजेंद्र पवार उपस्थित होते.
अनुपम खेर म्हणाले की, आयुष्यात लोकप्रिय होणे सोपे असते, पण जीवनात आदर प्राप्त करायचा तर मोहन आगाशे यांच्यासारखे आयुष्य जगणे आवश्यक आहे. मोहन आगाशे यांच्या छोट्याशा कार्यालयात मी काल काही वेळ घालवला. त्यांच्याशी बोलताना लक्षात आले की ती ४५ मिनिटे मला जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहोत याची जाणीव करून देणारी होती.