टोल प्लाझावर बस थांबवली; पोलिसांसमोर कुख्यात गुन्हेगारांवर गोळीबार, एकाचा मृत्यू एक गंभीर
:राजस्थानच्या भरतपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कुख्यात गुन्हेगार कुलदीप जगिना आणि विजय पाल यांना न्यायालयात नेत असताना अमोली टोल प्लाझा येथे काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली आहे.जयपूरहून रोडवेजच्या बसने पोलीस आरोपींना भरतपूरला घेऊन जात होते, यादरम्यान हल्लेखोरांनी दोघांवर आठ ते दहा गोळ्या झाडल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे भाजप नेते किरपाल जगिना हत्याकांडातील आरोपी होते. हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस फोर्स घटनास्थळी दाखल झाली आणि दोघांनाही भरतपूरच्या आरबीएम रुग्णालयात रक्तबंबाळ अवस्थेत दाखल केले. एसपी मृदुल कछावाही आरबीएम हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. ही घटना बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.
कुलदीप जगिना आणि विजय पाल यांना पोलिस कोर्टात हजर करण्यासाठी घेऊन जात होते. दरम्यान, अमोली टोल प्लाझाजवळ काही हल्लेखोरांनी बसला घेराव घातला आणि गोळीबार सुरू केला. कुलदीप आणि त्याचा साथीदार विजय पाल यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. पोलिसांना काही समजेल तोपर्यंत हल्लेखोर आपले काम संपवून पळून गेले. या घटनेत कुलदीप जगिना याचा मृत्यू झाला, तर विजय पालची प्रकृती चिंताजनक आहे.