पालकमंत्रीपदासाठी लहान मुलांसारखी भांडणे, अजित पवार गट आणि मिंध्यांमध्ये जुंपली
मला रायगडचा पालकमंत्री करणार असं ठरलं आहे, जर तसं झालं नाही तर वेगळा विचार करायला आम्ही स्वतंत्र आहोत असा इशारा मिंधे घटाचे आमदार भरत गोगावले यांनी दिला आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत अजित पवारांचा गट सामील झाल्याने मंत्रीपद कोणाला मिळणार यावरून तीन पक्षांमध्ये संघर्ष सुरू झालाच आहे शिवाय पक्षांतर्गत संघर्षालाही सुरूवात झाली आहे.
रायगडचे पालकमंत्री पद आपल्यालाच मिळणार असे स्वप्न पाहणारे भरत गोगावले यांची झोप अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतर आणि त्यांच्यापेक्षा ‘ज्युनिअर’ असलेल्या आदिती तटकरे कॅबिनेट मंत्री झाल्यामुळे उडाली आहे.
गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, ‘ रायगडचं पालकमंत्रीपद मलाच द्यायचं ठरलंय, त्यात कोणतीही तडजोड होणार नाही असं सांगितलं आहे. असं झालं नाही तर आम्ही आमचा विचार करायला स्वतंत्र आहोत. यावर अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण यांनी म्हटलंय की, ‘ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे हेच म्हणणे आहे की आदिती तटकरेंनी पालकमंत्रीपद स्वीकारावं. कारण याआधीही त्यांनी पालकमंत्री म्हणून काम केलं असून त्यांनी उत्कृष्ट काम केलं आहे. कामाच्या गुणवत्तेवर त्यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. ‘