अमळनेर तालुक्यातील पाडळसरे अनेक वर्षांपासून रखडलेल्या धरणासाठी ‘सुप्रमा’ घेऊन केंद्राकडून त्यासाठी निधी आणू आणि हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करू. आता अनिल पाटीलही मंत्री झाल्याने या कामाला वेग येईल, असा विश्वास खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केला.पाडळसरेसह वरखेड लोंढे व अन्य प्रकल्पांच्या आढाव्यासाठी खासदार पाटील यांनी मंगळवारी (ता. ११) दुपारी तापी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयात अभियंत्यांची बैठक घेतली. या प्रकल्पांची स्थिती जाणून घेत त्यांनी त्यासंबंधी सूचना केल्या.
बैठकीनंतर माध्यमांना माहिती देताना खासदार पाटील म्हणाले, की वरखेड लोंढे प्रकल्प तत्कालीन जलशक्ती मंत्री नितीन गडकरी व तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नामुळे बळीराजा संजीवनी योजनेत आला व त्याचे काम पूर्ण झाले. मात्र, भूसंपादन राहिल्याने कालव्याचे काम झाले नाही.
त्यामुळे सिंचन होऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे संपादनाचा विषय मार्गी लावून कालवा न करता प्रकल्पातून बंदिस्त पाईपद्वारे सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासंबंधी प्रस्ताव तयार करून त्यास मान्यता घेतली जाईल. त्यामुळे दीड हजार हक्टर जास्तीची जमीन सिंचनाखाली येईल, असे ते म्हणाले.
पाडळसरेही पूर्ण करणार
तापी नदीवरील निम्न तापी अर्थात पाडळसरे धरणावर गेल्या २५ वर्षांत केवळ ४०० कोटीच खर्च होऊ शकले आहेत. त्याची किंमत मात्र २८०० कोटींवर गेली असून, राज्यात मधल्या आघाडी सरकारच्या काळात त्यास ‘सुप्रमा’ही मिळू शकली नाही.
आता अनिल पाटीलच मंत्री झाल्यामुळे हे काम मार्गी लागेल आणि केंद्राच्या पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत त्यास मोठा निधी मिळवून देऊ. या सर्व कामांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुरू असून, त्यांनीही जलसंपदा विभागाचे सचिव दीपक कपूर, नियोजन विभागाचे विजय सौरव यांना सूचना दिल्या आहेत, असे खासदार पाटील म्हणाले.
मन्याड, जामदा, दहीगाव बंधाऱ्यांची उंची वाढणार
यासोबतच गिरणा नदीवरील मन्याड, जामदा व दहीगाव बंधाऱ्याची उंची वाढविण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार असून, त्याला मंजुरी घेऊन या बंधाऱ्यांची कामे मार्गी लावली जातील, असे खासदारांनी सांगितले.