नगर : अमरनाथ यात्रेसाठी गेलेले नगरचे शंभर भाविक अडकून पडले आहेत. अनंतनाग येथील लष्करी छावणीत या भाविकांचा चार दिवसांपासून मुक्काम आहे. जम्मू ते श्रीनगर महामार्गावरील पूल पाण्यात कोसळल्याने या भाविकांचा प्रवास थांबला आहे.
नगर जिल्हा प्रशासन या भाविकांच्या संपर्कात असून सर्व भाविक सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. अडकलेले सर्व भाविक हे उत्तर जिल्ह्यातील श्रीरामपूर, लोणी, कोल्हार, बेलापूर परिसरातील असल्याचे सांगण्यात आले. 30 जून रोजी भाविकांचा जथ्था अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाला होता.
अमरनाथ दर्शन करून भाविक माघारी येत होते. श्रीनगरपासून 45 किलो मी अंतरावर असताना महामार्गावरील पूल पाण्यात कोसळला. त्यामुळे हे भाविक अडकले आहेत. अंनतनाथ जिल्ह्यातील मीर बाजार बेस येथील लष्कराच्या छावणीत या भाविकांची सोय करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीर ते श्रीनगर महामार्गाने माघारी येत असताना मिलिटरीने गाड्या थांबवल्या. त्यानंतर पूल कोसळल्याचे समजले. आम्ही सुखरूप आहोत, पूल तयार झाल्यानंतर नगरकडे येवू.
– राणी साळुंके, यात्रेकरू.