समाजशास्त्र अभ्यासणारे पहिले क्रियाशील अभ्यासक व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला अनुकूल पार्श्र्वभूमी तयार होईल असे पूरक कार्य करणारे थोर समाजसुधारक!
विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म जमखंडी (कर्नाटक) या गावी झाला. घरातील वारकरी सांप्रदायिक वातावरणाचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. त्यांना मराठी व कानडी या भाषा चांगल्या अवगत होत्या. पुढे ते संस्कृत, पाली, इंग्रजी व इतर प्राकृत भाषा शिकले. पुण्यात फर्ग्युसनमध्ये शिकत असताना त्यांना डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली. १८९८ साली ते बी. ए. झाले आणि एल्. एल्. बी. च्या पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला. पुढे बडोदे संस्थानात नोकरी करण्याच्या अटीवर सयाजीराव महाराजांनी त्यांना दरमहा २५ रुपयांची शिष्यवृत्ती सुरू केली. याच साली शिंदे प्रार्थना समाजाकडे आकृष्ट झाले. १९०१ साली ते विलायतेतील मँचेस्टर कॉलेजात गेले. तेथे त्यांनी दोन वर्षे तौलनिक धर्म, पाली भाषा आणि बौद्ध धर्म या विषयांचा अभ्यास केला. समाजाचा, समाजशास्त्राचा तसेच अस्पृश्यतेसह अनेक सामाजिक समस्यांचा त्यांनी शास्त्रशुद्ध रीतीने अभ्यास केला. असा अभ्यास करणारे ते भारतातील पहिले शास्त्रज्ञ – अभ्यासक मानले जातात. १९०३ च्या ऑक्टोबर महिन्यात ते मुंबईस परत आले. १९०५ मध्ये त्यांनी अस्पृश्यांसाठी रात्रशाळा उघडली. साधारणपणे १९०३ ते १९१० या काळात त्यांनी एकेश्र्वरवादी तत्त्वज्ञानाचा प्रचार करत प्रार्थना समाजाचे कार्य केले.
महात्मा फुले यांना शिंदे गुरुस्थानी मानीत. १८ ऑक्टोबर, १९०६ रोजी त्यांनी मुंबईत भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीची (डिप्रेस्ड क्लास मिशन) स्थापना केली. मिशनचे हेतू पुढीलप्रमाणे निश्चित केले गेले- शिक्षण प्रसार; निराश्रितांना नोकर्या मिळवून देणे; सामाजिक अडचणींचे निराकरण करणे; सार्वत्रिक धर्म, व्यक्तिगत शील, नागरिकता वगैरे गुणांचा प्रसार. मिशनतर्फे पुढील दोन वर्षे मोफत दवाखान्याचेही काम चालू होते.
१४ मार्च, १९०७ रोजी सोमवंशीय मित्र समाजाची स्थापना महर्षी शिंदे यांनी केली. अस्पृश्य लोकांकरवीच स्व-उद्धारार्थ धार्मिक व सामाजिक सुधारणा करवून घेणे हा त्यामागचा हेतू होता. १९१० पासून त्यांनी प्रार्थना समाजाशी असलेले संबंध संपवले.
१९१२ साली डिप्रेस्ड क्लास मिशनच्या एकंदर १४ ठिकाणी २३ शाळा, ५५ शिक्षक, ११०० मुले, ५ वसतिगृहे, इतर बारा संस्था व ५ प्रचारक होते. निरनिराळ्या सात प्रांतांत मिशनचे काम पसरले होते. १९१७ साली त्यांनी अखिल भारतीय निराश्रित अस्पृश्यता निवारक संघ स्थापन केला.
मुंबईला अखिल भारतीय पातळीवरील अस्पृश्यता निवारक परिषद आयोजित केली. अशा अनेक अस्पृश्यता विरोधक परिषदा आयोजित करून त्यांनी समाजसुधारणेचे प्रयत्न केले. १९२२ साली त्यांनी ‘अहिल्याश्रम’ बांधून पूर्ण केला. १९२५-२६ मध्ये ते ब्राह्मदेशाच्या दौर्यावर गेले आणि तेथील समाज व बौद्धधर्माचा अभ्यास करून परतले.
महर्षी शिंदे यांनी आपल्या लेखनातून समाजसुधारणेचे विचार मांडले. त्यांनी ‘उपासना’ या मासिकातून व ‘सुबोधचंद्रिका’ या साप्ताहिकातून लेखन केले. बहिष्कृत भारत (संशोधनात्मक प्रबंध), भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्र्न – या लेखनाच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्यतेचा प्रश्र्न समाजासमोर मांडला. हॉलंडच्या धार्मिक परिषदेत सादर केलेला ‘हिंदुस्थानातील उदार धर्म’ हा त्यांचा प्रबंध त्या काळी गाजला होता. त्यांनी ‘आठवणी आणि अनुभव’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तकही लिहिले आहे. १९३४ च्या बडोदा येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानही त्यांनी भूषविले.
एक सत्याग्रही म्हणून ते स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होते. उपरोक्त संस्थांसह त्यांनी राष्ट्रीय मराठा संघ, समता सैनिक दल, बहुजन समाज पक्ष या संस्था-संघटनांच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय कार्य केले. मुरळीची प्रथा, अस्पृश्यांना मंदिर प्रवेश, होळी उत्सवातील बीभत्स प्रकार या सर्वच समस्यांबाबत त्यांनी लक्षणीय कार्य केले. शेतकर्यांच्या समस्याही त्यांनी अभ्यासल्या, त्यासाठी शेतकर्यांच्या संघटनाचाही त्यांनी प्रयत्न केला.
अस्पृश्यांच्या उद्धाराचे, विकासाचे कार्य करायलाच हवे, अस्पृश्यांमध्ये आत्मविश्र्वास निर्माण करायलाच हवा, त्याचबरोबर सवर्णांच्या मनातील अस्पृश्यतेची भावना नष्ट करणेही तितकेच महत्त्वाचे आहे या विचाराचा त्यांनी नेहमी पुरस्कार केला.
आपल्या हयातभर प्रामुख्याने अस्पृश्योद्धारासाठी झटणार्या महर्षी शिंदे यांचे २ जानेवारी, १९४४ रोजी निधन झाले.