ताज्या बातम्या

गोपाळ गणेश आगरकर: जिवंतपणीच स्वतःची प्रेतयात्रा पाहावी लागलेले समाजसुधारक


लोकांच्या सुखासाठी मी कोणताही त्याग करण्यास तयार आहे,’ असा एक वाक्य ‘उत्तमरामचरिता’चे नायक श्रीराम उच्चरतात. हेच वाक्य ‘आमचे डोंगरीतल्या तुरुंगातील 101 दिवस’ या पुस्तकाच्या सुरुवातीला आणि शेवटी आहे.

गोपाळ गणेश आगरकरांनी हे प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी होते मग आपल्या पुस्तकासाठी हेच वचन का निवडलं असेल? असा एक प्रश्न मनात सहज येतो. पण त्यांच्याबद्दल वाचल्यावर या वाक्याचा अर्थ उलगडतो. त्यांनी हे वाक्य केवळ आपल्या पुस्तकातच लिहिलंच नाही तर आयुष्यभर तेच जगले, याची जाणीव आपसूकच होते.

अवघ्या 39 वर्षांच्या आयुष्यात गोपाळ गणेश आगरकरांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून टाकला आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांना देखील त्यांनी त्यांच्या तळपत्या लेखणीने विचार करायला भाग पाडलं.

आजकालच्या कोणत्याही नेत्याचं भाषण घ्या, त्याची सुरुवात ‘पुरोगामी महाराष्ट्र’ या दोन शब्दांपासूनच होते. अनेक समाजसुधारक आणि विचारवंतांच्या अथक प्रयत्नांमुळे मराठी समाज हा प्रबोधनाच्या वाटेवर आला. त्यापैकी एक गोपाळ गणेश आगरकर होते.

ज्या समाजाच्या उद्धाराची तळमळ त्यांच्या प्रत्येक कृतीतच नाही, तर श्वासाश्वासांत होती त्याच समाजाकडून काढण्यात आलेली प्रेतयात्रा त्यांना जिवंतपणीच पाहावी लागली होती.शाळेत असताना आगरकरांबद्दला मला चार वाक्यं माहित होती. तीच पुन्हा पुन्हा लिहून इतिहासाच्या पेपरमध्ये मार्क पाडून घ्यायचो. साधारणपणे ती चार पाच वाक्य अशी होती.

आगरकर लोकमान्य टिळकांचे मित्र होते. त्यांनी आणि टिळकांनी मिळून न्यू इंग्लिश स्कूल शाळा काढली होती. टिळकांनी सुरू केलेल्या केसरीचे पहिले संपादक आगरकर होते. पण टिळक म्हणायचे की, आधी स्वातंत्र्य पाहिजे सामाजिक सुधारणा नंतर करू पण आगरकर म्हणायचे आधी सुधारणा करू. मग त्यांनी केसरी सोडला आणि ‘सुधारक’ काढलं.’

कित्येक वर्षं माझी हीच धारणा होती की इतिहासामध्ये त्यांचं महत्त्व लोकमान्य टिळकांना विरोध करणं एवढंच होतं. पण पुढे त्यांच्याबद्दल वाचल्यावर लक्षात आलं की जितकं महत्त्व लोकमान्य टिळकांचं स्वातंत्र्यलढ्यात आहे, तितकंच आगरकरांचं महत्त्व समाज प्रबोधनात आहे.

आगरकर हे फक्त समाजसुधारकच नव्हते तर भारतात त्यावेळी निर्माण झालेल्या मोजक्या उदारमतवादी, बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंतांपैकी एक होते.

समाजाच्या भल्यासाठी वाट्टेल ते सोसण्याची तयारी असणारे आगरकर समाजाच्या वाईट चालीरीतीबाबत अत्यंत कठोर शब्दांत आपले विचार प्रकट करत. प्रसंगी त्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत पण ते झुकले नाहीत. त्यांचं ब्रीदवाक्य होतं, ‘इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार’ याच तत्त्वानुसार ते आयुष्यभर वागले.

प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण

गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावात झाला.

लहानपणापासूनच आगरकरांनी निबंध लिहायला आवडत असे. कऱ्हाडला शाळेत असताना एक निबंधाची स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेसाठी आगरकरांनी लिहिलेल्या निबंधाला बक्षीस मिळालं होतं. पण आयोजकांचा विश्वासच बसेना हा निबंध कुणी विद्यार्थ्याने लिहिला आहे. त्यांनी दुसऱ्या विषयावर निबंध लिहण्याची तयारी दर्शवली होती. पुढे आगरकरांनी विपुल लिखाण केलं त्याची बीजं त्यांच्या शालेय जीवनातच होती असं म्हणायला वाव आहे.

आगरकरांच्या घरची परिस्थिती लहानपणासूनच हलाखीची होती. शाळा शिकत असतानाच ते एका कचेरीत ते मुन्सिफाच्या हाताखाली काम करत होते. त्यातून मिळालेल्या पैशातून आपल्या शिक्षणाचा खर्च भागवत. पुढे ते एका डॉक्टरकडे कंपाउंडर झाले पण त्यांच्यावर एकवेळा पोस्टमार्टम पाहण्याची वेळ आली आणि त्यांना ते पाहून चक्कर आली आणि त्यांनी त्या नोकरीला रामराम ठोकला.

कराड, रत्नागिरी, अकोला आणि पुणे या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं. पुण्याला ते पदव्युत्तर शिक्षणासाठी होते. तिथे त्यांना स्कॉलरशिप मिळाली. त्यामुळे त्यांची आर्थिक चणचण कमी झाली.

त्याकाळात त्या शिक्षणावर त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असती पण त्यांचं ध्येय हे समाजकार्य करण्याचंच होतं असं त्यांनी आपल्या आईला लिहिलेल्या पत्रावरून दिसतं. या पत्रात ते म्हणतात,

आई,

तुला वाटत असेल की मोठमोठ्या परीक्षा देऊन झाल्यामुळं आता आपल्या मुलाला चांगली नोकरी लागेल आणि आपले पांग फिटतील, तर असे मोठमोठे मनोरथ तू करू नकोस, कारण मी तुला आत्ताच सांगून टाकतो की विशेष संपत्तीची, विशेष सुखाची हाव न धरता मी फक्त पोटापुरता पैसा मिळवणार आहे. आणि त्यावर समाधान मानून बाकीचा वेळ समाजकार्यासाठी खर्च करणार आहे. दारिद्र्यानं आत्तापर्यंत माझी अनेक वेळा सत्त्वपरीक्षा घेतली आहे. त्यामुळं आता या पुढं जीवनात कितीही अवघड परीक्षा मी देऊ शकेन, अशी खात्री आहे.

पुण्यात डेक्कन कॉलेजमध्ये एम. ए. करतानाच त्यांची ओळख लोकमान्य टिळकांशी झाली. तसेच इथेच त्यांचं वाचन आणि चिंतन वाढलं. यामुळे झालं असं की सिलॅबस असलेले पुस्तकं सोडूनही ते इतर वाचन करू लागले. त्यामुळे त्यांना पहिल्या प्रयत्नात एम. ए. होता आलं नाही.

कॉलेजमधील प्राध्यापकांमुळेच त्यांना तत्कालीन विचारवंत आणि तत्त्वज्ञांबद्दल गोडी वाटू लागली. त्यांच्या आयुष्यावर मिल, बेंथम आणि स्पेन्सर या विचारवंतांचा प्रभाव आहे. या तत्त्वज्ञांच्या लिखाणाची ओळख त्यांना इथेच झाली. त्यांच्या लिखाणातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी भारतीय रुढीग्रस्त समाजावर कोरडे ओढले आणि प्रबोधनाची मशाल प्रज्वलित केली.

फर्ग्युसन कॉलेजला ‘फर्ग्युसन’ हे नाव का दिलं?

वयाच्या 24 व्या वर्षी म्हणजेच 1880 ला त्यांच्या प्रत्यक्ष सामाजिक कार्याला सुरुवात झाली. निबंधमालाकार विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी टिळक आणि आगरकरांना सोबत घेऊन ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. पहिल्या वर्षी या शाळेत केवळ 35 विद्यार्थी होते. तर वर्षाच्या शेवटी ही संख्या 336 वर गेली.

सुरुवातीला शाळेकडे निधीची कमतरता होती तर शाळेचे हे तिन्ही संस्थापकच शाळेच्या भिंती हाताने सारवत असत. पाश्चिमात्य शिक्षण देणारी पुण्यातली पहिली स्वदेशी शाळा असा या शाळेचा लौकिक होता.

पाश्चिमात्य शिक्षणात काही त्रुटी असल्या तरी त्याचा वापर करुन आपण आपले राष्ट्रवादाचे ध्येय गाठू शकतो, असा विश्वास संस्थापकांना होता.

चार वर्षांनी त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि 2 जानेवारी 1885 ला फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन यांचं नाव या कॉलेजला देण्यात आलं होतं.

गव्हर्नरचं नाव असेल तर सरकारकडून देणग्या मिळतील तसेच इतर देणगीदारांनाही देणग्या देताना अडचण येणार नाही, असा विचार करून हे नाव ठेवण्यात आल्याचा उल्लेख डॉ. गजानन जोशींनी लिहिलेल्या भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहद् इतिहासाच्या 10 व्या खंडात आहे.

1919ला सांगलीमध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीने कॉलेज काढलं त्याला त्यांनी विलिंग्डन कॉलेज असं नाव दिलं. त्यावेळी मुंबई प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन हे होते.

‘केसरी’चे पहिले संपादक

1881 ला ‘केसरी’ची स्थापना झाली. राष्ट्रीय विचारांचे दैनिक म्हणून अल्पावधीतच या वृत्तपत्राला लौकिक मिळाला. केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर होते.

आगरकर हे त्यांच्या सुधारणावादी विचारांसाठी प्रसिद्ध आहेत पण केसरीमध्ये असताना त्यांना इतर विषयावरही विपुल लिखाण केल्याचं मत डॉ. अरविंद गणाचारी यांनी आपल्या – ‘गोपाळ गणेश आगरकर, बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक’ या पुस्तकात मांडलं आहे.

‘भारताची वाढती लोकसंख्या आणि उत्पादन व वितरणाशी असलेला संबंध’ या विषयावर लिहिणारे ते देशातील पहिले विचारवंत आहेत. नंतर या विषयावर र. धों. कर्वे यांनी सखोल अभ्यास केला. र. धों. कर्वे स्वतःला ‘सच्चा आगरकरवादी’ यामुळेच म्हणत असत.

‘केसरी’तला राजीनामा आणि सुधारकची स्थापना

आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात आगरकर सत्त्वपरीक्षेबद्दल बोलले होते. जणू भविष्याची त्यांनी कल्पना होती. पण काळ इतकी कठीण परीक्षा घेईल हे कुणाच्याच ध्यानी-मनी नसेल. कसोटीच्या काळातच ते अधिक प्रखरतेने तळपले.

‘ईष्ट ते बोलणार’ या बाण्याची झलक त्यांनी केसरीच्या स्थापना केली त्याच्या एकाच वर्षानंतर कोल्हापूरचे दिवाण बर्वे यांच्या विरोधातला अब्रुनुकसानीचा खटला हरल्यानंतर त्यांना आणि टिळकांना चार महिन्यांचा कारावास झाला होता. तेव्हा आणि त्यानंतर देखील, समाजाच्या हितासाठी आवश्यक ते बोलणारच या गोष्टीवरील त्यांची निष्ठा अढळच राहिली.

पण यावेळी मात्र ते ‘साध्य असेल ते करणार’ या त्यांच्या ब्रीदवाक्याच्या दुसऱ्या भागाची प्रचितीच सर्वांना आणून दिली. ती कसोटी होती म्हणजे ‘संमती वयाचा कायदा.’

संमती वयाचा कायदा काय होता?

मुंबई प्रांताचे काउन्सिलमन बेहराम मलबारी यांनी 1884 मध्ये हे बिल मांडलं होतं व 1891 ला हे बिल मंजूर झालं. सात वर्षांमध्ये यावर अनेक चर्चा आणि वादविवाद घडले याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रावर झाला.

मुलींच्या लग्नाचं वय 10हून वाढवून 12 करावे अशी तरतूद या बिलात होते. या बिलाला सनातनी आणि रुढीवादी लोकांना तीव्र विरोध केला. लोकमान्य टिळक या बिलाच्या विरोधात होते. तर आगरकर या बिलाच्या बाजूने होते.

टिळकांचं म्हणणं होतं की एकदा जर का इंग्रजांच्या मदतीने आपण सामाजिक सुधारणा करुन घेतल्या तर दरवेळी त्यांचा सामाजिक आणि धार्मिक कार्यात हस्तक्षेप वाढेल. लोकमान्य टिळकांच्या राजकीय समर्थकांमध्ये सनातन्यांचीही संख्या भरपूर होती.

आगरकर तेव्हा ‘केसरी’चे संपादक होते. आगरकरांच्या मनात इंग्रजांबद्दल सहानुभूती नव्हती. ते देखील प्रखर राष्ट्रवादी होते. ते म्हणायचे ‘इंग्रजांना आज ना उद्या आपण हाकलूनच लावणारच आहोत पण सामाजिक सुधारणांसाठी ते जाण्याची वाट पाहायचे काही कारण नाही.’

उलट ते म्हणत ‘जर असं कुणी म्हणत असेल की सामाजिक सुधारणा या आमच्या आम्ही करू तर त्या लोकांनी हे दाखवून द्यावं की आतापर्यंत त्यांनी कोणत्या सुधारणा घडवून आणल्या.’

केसरीमध्ये पुढील तीन वर्षं हा वाद चालला. बिलाच्या समर्थनात जर त्यांनी काही लिहिलं तर ‘केसरी’च्या संचालक मंडळीमध्ये नेहमी वाद निर्माण होत असत. त्यामुळे आगरकरांनी लिहिलेली मतं ही केसरीचे नाहीत असं दाखवण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखांवर ‘लिहून आलेला मजकूर’ असं लिहिलं जाऊ लागलं.

अशा स्थितीत त्यांची कोंडी होऊ लागली आणि शेवटी 1887 ला त्यांनी ‘केसरी’चा राजीनामा दिला. मधल्या काळात टिळक आणि आगरकरांचे संबंध विकोपाला गेले. टिळकांनी देखील डेक्कन एज्युकेशन सोसायटीतून काढता पाय घेतला.

1888 मध्ये आगरकरांनी ‘सुधारक’ काढला. सुधारक काढण्यामागचा आपला हेतू ते सांगतात की लोककल्याणासाठी प्रसंगी कटूपणा घेतला तरी चालतो.

कोणत्याही संस्कृतीमध्ये लोकमताला किंमत असते. एका ठराविक मर्यादेपर्यंत ती असण्यासही काही हरकत नाही पण जर समाज रुढी आणि परंपरेला चिकटून त्यांची भलामण करत असेल तर सुधारणा कधीही होणार नाही, असं त्यांना वाटत असे.

आगरकर तेव्हा ‘केसरी’चे संपादक होते. आगरकरांच्या मनात इंग्रजांबद्दल सहानुभूती नव्हती. ते देखील प्रखर राष्ट्रवादी होते. ते म्हणायचे ‘इंग्रजांना आज ना उद्या आपण हाकलूनच लावणारच आहोत पण सामाजिक सुधारणांसाठी ते जाण्याची वाट पाहायचे काही कारण नाही.’

उलट ते म्हणत ‘जर असं कुणी म्हणत असेल की सामाजिक सुधारणा या आमच्या आम्ही करू तर त्या लोकांनी हे दाखवून द्यावं की आतापर्यंत त्यांनी कोणत्या सुधारणा घडवून आणल्या.’

केसरीमध्ये पुढील तीन वर्षं हा वाद चालला. बिलाच्या समर्थनात जर त्यांनी काही लिहिलं तर ‘केसरी’च्या संचालक मंडळीमध्ये नेहमी वाद निर्माण होत असत. त्यामुळे आगरकरांनी लिहिलेली मतं ही केसरीचे नाहीत असं दाखवण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखांवर ‘लिहून आलेला मजकूर’ असं लिहिलं जाऊ लागलं.

अशा स्थितीत त्यांची कोंडी होऊ लागली आणि शेवटी 1887 ला त्यांनी ‘केसरी’चा राजीनामा दिला. मधल्या काळात टिळक आणि आगरकरांचे संबंध विकोपाला गेले. टिळकांनी देखील डेक्कन एज्युकेशन सोसायटीतून काढता पाय घेतला.

1888 मध्ये आगरकरांनी ‘सुधारक’ काढला. सुधारक काढण्यामागचा आपला हेतू ते सांगतात की लोककल्याणासाठी प्रसंगी कटूपणा घेतला तरी चालतो.

कोणत्याही संस्कृतीमध्ये लोकमताला किंमत असते. एका ठराविक मर्यादेपर्यंत ती असण्यासही काही हरकत नाही पण जर समाज रुढी आणि परंपरेला चिकटून त्यांची भलामण करत असेल तर सुधारणा कधीही होणार नाही, असं त्यांना वाटत असे.

त्यांच्या या भूमिकेमुळे अनेक लोक त्यांचे वैरी होतील याची कल्पना त्यांना होती. त्यांच्या दबावाला आपण बळी पडणार नाहीत हे देखील त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणतात ‘अशांच्या पर्वतप्राय झुंडीच्या झुंडी तुटून पडल्या तरी जो खरा विचारी आहे, ज्याला लोककल्याणाची खरी कळकळ आहे, सत्य बोलणे आणि सत्यास धरून चालणे यातचं ज्याचे समाधान आहे, अशाने वरच्यासारख्या क्षुद्र लोकांच्या अवकृपेला, रागाला किंवा उपाहास्यतेला यत्किंचित न भिता आपल्या मनास योग्य वाटेल ते लिहावे, बोलावे व सांगावे.’

शारीरिक यातना सहन करताना समाजकार्य

केसरीतून वेगळं झाल्यावर त्यांचा संचालकांशी असलेला दैनंदिन संघर्ष तर मिटला होता पण त्यांच्या जीवनातील संघर्ष यत्किंचितही कमी झाला नाही. कारण केसरीमधून बाहेर पडताना प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही कर्ज आले होते. ते फेडण्यात त्यांची बरीच ऊर्जा खर्च झाली.

सुधारक साप्ताहिकाच्या वर्गणीतून हा खर्च निघण्यासारखा नव्हता त्यांना उलट सुधारक चालवण्यासाठी त्यांना आपल्या पदरचेच पैसे मोडावे लागत. 1892 ला ते फर्ग्युसनचे प्राचार्य झाले. पण घर आणि समाजकार्य दोन्ही सांभाळताना त्यांना अपरिमित कष्ट सोवावे लागले.

सातत्याचे परिश्रमाने त्यांचे शरीर लवकर थकले. त्यात त्यांना दम्याचा विकार होता. या दगदगीमुळे त्यांनी वयाच्या 39 व्या वर्षी म्हणजेच 17 जून 1895 ला जगाचा निरोप घेतला.

आगरकरांच्या आधी देखील सामाजिक सुधारणांचे अनेक प्रयत्न झाले. प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज, आर्य समाज निर्माण झाले होते. धार्मिक गोष्टी पूर्णपणे न सोडता त्यात सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न त्यांच्या आधी झाले होते.

पण सामाजिक सुधारणा घडवण्यासाठी त्याच धर्माचा आधार घेऊन त्यातच अडकून पडण्याची आगरकरांची इच्छा नव्हती. देशातल्या अठरापगड जाती आणि समाजात आणखी एक जात वाढवणं त्यांना श्रेयस्कर वाटलं नाही. त्यामुळेच त्यांना रुढीवाद्यांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं.

आगरकरांच्या समाजसुधारणेचं महत्त्व विषद करताना डॉ. गजानन जोशी लिहितात, “ब्राह्मणांचे वर्चस्व ब्राह्मणेतरांवर कित्येक शतके चालत होतं व त्याची चीड नेहमीच ब्राह्मणेतरांना येत होती. पण आगरकर स्वतः ब्राह्मण असूनही धर्माच्या नावाखाली ब्राह्मणांनी शतकानुशतके गरीब व अन्य लोकांवर चालवलेले अत्याचार व अन्याय आगरकरांनी स्वतःच वेशीवर टांगले. पण हे त्यांनी केवळ भावनाविवश होऊन न करता काही तात्त्विक दृष्टीने केले.”

संदर्भ

1. निबंधसंग्रह – गोपाळ गणेश आगरकरांचे सुधारकमध्ये प्रसिद्ध झालेले निबंध – प्रकाशक – शिराळकर आणि कंपनी

2. गोपाळ गणेश आगरकर, बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक – डॉ. अरविंद गणाचारी

3. भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहद् इतिहास, खंड -10 वा – डॉ. गजानन जोशी

4. समाजसुधारक, सकाळ प्रकाशन – सदानंद मोरे

6. रेनेसाँ स्टेट- द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्र – गिरिश कुबेर

7. मराठी विश्वकोश


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *