सर्वात मोठी बातमी, काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता बनणार आता महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्षनेता?
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत सत्तेत येण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे.तसेच अजित पवार हे महाविकास आघाडीचे बडे नेते होते. ते महाविकास आघाडीची ताकद होते. पण त्यांनीच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत सत्तेत येण्याचा निर्णय घेतल्यामुळे विरोधी पक्षांच्या गोटात खळबळ उडाली आहे. पण तरीही आता विरोध पक्षांनी सत्ताधारी पक्षांचा ‘करो या मरो’ या धर्तीवर सामना करण्याचं ठरवलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता पावसाळी अधिवेशनाआधी विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण असेल याबाबत ठरवणं महत्त्वाचं असणार आहे. विशेष म्हणजे याचबाबत मोठी बातमी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे.
अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. सभागृहात आता काँग्रेस आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे संख्याबळ पाहता काँग्रेसचा विरोधी पक्षनेता, असा अशी भूमिका काँग्रेस नेत्यांची आहे. विशेष म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता तशाच घडामोडी घडणार आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते बनण्याची शक्यता असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे.