ज्यांची पत्नी म्हणाली, आम्हाला गोळ्या घाल्या, तेच मुश्रीफ भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले; उद्धव ठाकरेंचा बोचरा बाण
शिवसेनेनंतर राष्ट्रवादी सुद्धा फोडण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला. मुख्यमंत्री असताना मी घरात बसलो होतो, पण मी घरफोडी केली नाही, असा हल्लाबोल त्यांनी भाजपवर केला.उद्धव ठाकरे यांनी अमरावतीमध्ये फोडाफोडीच्या राजकारणावरून भाजपवर सडकून टीका केली. त्याचबरोबर शासन आपल्या दारी कार्यक्रमावरून भाजपवर हल्ला चढवला. ते म्हणाले की, घरफोडे तुम्ही आहात. मी घरात बसून जे काम केलं, ते तुम्हाला घर फोडूनही करता येत नाही. त्यामुळे दारोदारी जावं लागत आहे. सरकार आपल्या दारी म्हणता, पण तुम्हाला कोणी दारातही उभं करत नाही. मग अंगणवाडी सेविकांना बोलवता, पोलिसांना साध्या कपड्यात बसवता.
तेच मुश्रीफ भाजपसोबत गेले; उद्धव ठाकरेंचा बोचरा बाण
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडाळी केल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून ईडीच्या रडारवर आणि अटकेची टांगती तलवार असलेल्या हसन मुश्रीफ यांनीही बंडखोरी करत कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. ईडीच्या छापेमारीने त्रस्त झालेल्या मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा यांनी आम्हालाच एकदाच येऊन गोळ्या घालून जा, अशी हताश होऊन प्रतिक्रिया दिली होती. यावेळी त्यांना अश्रुही अनावर झाले होते. नेमका हाच धागा पकडत ठाकरे यांनी मुश्रीफांवर बोचरा बाण सोडला. उद्धव ठाकरेंनी अमरावतीमधील सभेत या प्रसंगाची आठवण करून देत तेच मुश्रीफ भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेत जाऊन बसल्याची प्रतिक्रिया दिली.
70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला तेच सोबत घेतले
जगभरातील एक नंबरचे पंतप्रधान असतानाही पक्ष का फोडता? शिवसेना फोडली, चोरली आज राष्ट्रवादी चोरताय. भाजपवर ही वेळ का आली? असा सवालही त्यांनी केला. सत्तेची मस्ती असल्याने मनात भीती आहे, आपण निवडून येऊ शकत नाही म्हणून समोर कोणी ठेवायचं नाही, पक्ष फोडून सोबत घ्यायचं राजकारण सुरू असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. ज्यांच्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला तेच सोबत घेतले.
दरम्यान, हसन मुश्रीफांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा कायम आहे. 22 ऑगस्टच्या पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे तपास यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मार्च महिन्यात अपेक्षित असलेला तपास अहवाल पुढील सुनावणीपूर्वी सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच तपास अधिकाऱ्यांना कोर्टापुढे हजर राहण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. कोल्हापुरातील मुरगुड पोलीस ठाण्यात मुश्रीफ यांच्याविरोधात 23 फेब्रुवारी रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुश्रीफांच्या तिन्ही मुलांनाही 19 जुलैपर्यंत अटकेपासूनचा दिलासा कायम आहे. मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांविरोधात ईडी मनी लाँड्रींग प्रकरणी चौकशी करत आहे. या प्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी हसन मुश्रीफांची मुलं जावेद, आबिद आणि नाविद यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे.मणसाला या