ताज्या बातम्या

चहाच्या मळ्यातले दार्जिलिंग


शिवालिक पर्वतमालेच्या रांगेत वसलेले दार्जिलिंग हे लघु हिमालयात वसलेले सर्वांगसुंदर डोंगराळ नगर. समुद्र सपाटीपासून जवळपास सात हजार फुट उंचीवर असलेले दार्जिलिंग म्हणजे पश्चिम बंगालचा प्राकृतिक सौंदर्याने नटलेला मुकुटमणि..! सिक्किमच्या पेलिंगपासून दार्जिलिंगकडे येताना या हिमालयीन रांगेतल्या अनेक लहान सहान गावातून आणि “तिस्ता” नदीमधून वाट काढावी लागते. “मल्ली” हे या नदी जवळच्या नावाचे गाव आहे.‘मल्ली’ हे गाव प.बंगाल आणि सिक्किमची सीमारेषा आहे. दार्जिलिंगला मुळ भाषेत ‘दोरजिलिंग’ म्हणतात..! हा तिबेटी शब्द असून ‘दोरजी’ म्हणजे बज्र…! ‘युद्धात जिंकलेले शस्त्र’ आणि ‘लिंग’ म्हणजे स्थान..! म्हणजेच “शस्त्रभूमी”..! कुणी कल्पनाही करणार नाही की दार्जिलिंग सारखी सुंदर नैसर्गिक पहाडी भूमी ही कधी काळी ‘शस्त्र भूमी’ आणि युद्ध भूमी होती ..! पण दुर्दैवाने हे विदारक सत्य आहे. इंग्रज, नेपाळ, भुतान यांची १८४० ते १८५० च्या दशकात ही युद्धभूमी होती.. दार्जिलिंगचा इतिहास हा नेपाळ, सिक्किम, भुतान आणि बंगाल यांच्या इतिहाससोबत जुळलेला आहे. सर्व स्थळे एकमेकांना लागून आहेत. यांची स्मारके आजही बघायला मिळतात. सतराव्या अठराव्या शतकात दार्जिलिंग हा सिक्किमचा भाग होता.पण त्यानंतरच्या साम्राज्य विस्तारात कधी हा प्रांत नेपाळच्या ताब्यात तर कधी भूतानच्या ताब्यात गेला. नंतर परत दार्जिलिंगला सिक्किमने जिंकले. पण इंग्रज आणि नेपाळच्या युद्धात हरल्यानंतर १८१७ मध्ये नेपाळने दार्जिलिंग ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीला सोपविले आणि इंग्रजांनी विकासाची गंगा येथे आणली.हिमालयीन रेल्वे, चहाचा उद्योग, कारखाना,चित्रपटात दिसणार्याव अनेक शिक्षण संस्था आणि रस्त्यांचे विस्तृत जाळे यांचा यात प्रामुख्याने समावेश होतो.

सिक्किम आणि दार्जिलिंग यांना विभागणाऱ्या ‘तिस्ता’ नदीच्या प्रवाहात नौकेतून पाऊण तासाचे ‘राफ्टींग’ करणे हा एक चित्तथरारक अनुभव आहे..! नौका पाण्याखाली गेल्यावर अंगावरून वेगाने जाणारा पाण्याचा प्रवाह थरार उत्पन्न करतो..! हा थरार अनुभवल्या नंतरच आपण दार्जिलिंगच्या मार्गाला लागतो. अनेक हिरवे चहाचे मळे मार्गात दिसायला लागतात.पहाडांवर अनेक स्तरीय चहाच्या वनस्पतीची डोंगरातली शेती मनाला प्रसन्नता प्रदान करते.अनेक कामगार महिला या मळ्यात पाठीवर बांबुच्या लांब टोपल्या घेऊन चहाची पाने खुडताना दिसतात. असे सुंदर ‘टी गार्डन’ जागोजागी बघायला मिळतात. चहाच्या मळ्यातले नगर हीच दार्जिलिंगची मुळ ओळख आहे. संपूर्ण दार्जिलिंग चहाच्या मळ्यांनी बहरलेले आहे.सोबतच स्थानिक संस्कृती, परंपरा, केशभुषा, वेशभुषा, भाषेची तिबेटी, नेपाळी बोली यांची अतिशय जवळून ओळख होते.

येथे सर्वत्र लहान लहान रस्त्यांचे जाळे तयार झालेले आहे. याच जाळ्यात वसलेले आहे दार्जिलिंगचे ‘हिमालयीन माऊंटनीयरिंग इन्स्टिट्यूट’. हे दार्जिलिंगचे फार मोठे आकर्षण आहे.एका उंच डोंगरावरच्या विस्तृत जागेत या अद्भुत संस्थेची स्थापना ४ नोव्हेंबर १९५४ ला करण्यात आली आणि सोबतच गिर्यारोहणाचे एक सुंदर संग्रहालयसुद्धा स्थापन केले. पहिल्यांदा माऊंट एव्हरेस्ट सर करणारे ‘तेंनझिंग नोरगे’ आणि ‘एडमंड हिलरी’ यांनी ही संस्था स्थापन करण्यात प्रामुख्याने पुढाकार घेतला.

“तेंनझिंग नोरगे’ आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे या संस्थेचे संथापक आहेत. गेल्या पासष्ट वर्षामध्ये पंचेचाळीस हजारच्या वर विद्यार्थी संस्थेने तयार केले या व्यतिरिक्त अडीच हजार विदेशी गिर्यारोहक तयार केले. गिर्यारोहणाची एक वेगळी दुनिया आणि त्यातील तांत्रिकता येथे बघायला मिळाली.

हे सर्व बघून झाल्यावर या संस्थेला लागूनच ‘पद्मजा नायडु हिमालयन जैविक उद्यान माउंटेंनिग संस्थेच्या डाव्या बाजूला आहे.
हे उद्यान बर्फाळलेले ‘तेंडुआ’ आणि लाल पांडाच्या प्रजजना करिता प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सायबेरियन वाघ आणि तिबेटच्या शेळ्या मेंढया बघायला मिळतात. हे सुंदर खुल्या जागेतले प्राणी संग्रहालय आहे. पद्मजा नायडू या सरोजिनी नायडू यांच्या कन्या आहेत. या राजकारणी आणि स्वातंत्र्य संग्राम सैनिक होत्या. ३ नोव्हेंबर १९५६ ते १ जुन १९६७ या काळात त्यांनी प. बंगालच्या पाचव्या राज्यपाल म्हणून त्यांनी कार्य केले. हे प्राणी संग्रहालय काहीशा दरीतल्या भागात असून दार्जिलिंग आणि प.बंगालचे अनेक दुर्मिळ प्राणी विशाल पिंजर्याात बंद आहेत. या ठिकाणचे मुख्य आकर्षण आहे ‘लाल पांडा’. हा प्राणी मांजरीसारखा असून उंच झाडावर राहतो. हा प.बंगालचा ‘राष्ट्रीय प्राणी’ आहे.

चहाचा विशाल कारखाना हा मळ्यामध्ये स्थित आहे. चहाची संपूर्ण यांत्रिक प्रक्रिया येथे बघायला मिळते. विविध प्रकारचा चहा. एका काळात दार्जिलिंग हे फक्त मसाल्याकरिता प्रसिद्ध होते. दार्जिलिंगचा चहा हा विश्वस्तरावर वर प्रसिद्ध आहे. भारतात नव्वद टक्के हे लोक आसामचा चहा पितात दार्जिलिंगचा नाही…! उच्च प्रतीचा चहा जगभरात निर्यात होतो. चहाचे अनेक उच्च्स्तरिय प्रकार असून चोवीस हजार रुपये किलोपर्यंतचा चहासुद्धा उपलब्ध आहेत. सहा प्रकारच्या चहाची चव आम्हाला देण्यात आली. डॉ. कॅम्पाबेल हे १८३० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे निरीक्षक असताना आपल्या बागेत त्यांनी पहिल्यांदा चहाचे बीज लावले. चहाच्या शेतीला १८५६ पासूनच प्रारंभ झाला. बानेरस बंधु यांनी १८८० मध्ये चहाचे रोपटे लावले चहाचे पहिले बीज हे ‘चायनीज झाडीतले’होते आणि ते कुमाऊच्या प्रदेशातून आणले होते. आज दार्जिलिंगमध्ये नव्वदच्या वर चहाची उद्याने आणि मळे आहेत. येथील माती, हिमालयातली वाहती हवा, धुके, आणि पाणी हे वातावरण चहाच्या झाडांकरिता पोषक ठरले आणि उच्च प्रतीच्या गुणवत्तेचा ‘दार्जिलिंगचा चहा’ जगभरात प्रसिद्ध झाला.

रात्री तीन वाजता उठून कुडकुडत्या थंडीत ‘टायगर हिल्स’ हा प्रवास करणे हा एक अतिशय रोमांचक अनुभव आहे. या ठिकाणावरून माऊंट एवरेस्ट आणि कांचनगंगा हे शिखर आणि त्यावर पडणारा उगवत्या सुर्याचा तांबडा प्रकाश बघायला मिळतो. हे एक अद्भुत दृष्य आहे. निसर्गाची किमया आहे. रात्री दोन वाजता उठून येथील स्थानिक गरीब महिला वर्ग चहा आणि कॉफीचे थरमास आणि केटल्या घेऊन निघतात आणि थंडीत शेकडो पर्यटकांच्या चहा पाण्याची सोय करतात.

दार्जिलिंगच्या डोंगराच्या गल्लीबोळातून धावणारी सत्तर किलोमीटरची ‘हिमालयीन रेल्वे’ निर्माण करणे हा इंग्रजांच्या कल्पकतेच अद्भुत नमुना आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात याची निर्मिती झाली. रेल्वेच्या ‘इंजिंनियरिंग’च्या क्षेत्रातला हा एक आश्चर्यकारक नमूना आहे. आडव्या तिडव्या आणि वर्तुळाकाळ वाटेने अनेक डोंगरावर ‘रेलखंडाची’ निर्मिती करण्यात आली आणि दळणवळणाकरिता ही रेल्वे धावायला लागली. कुठेही दिसणार नाही असे या शहरामधे रस्त्यांवर या रेल्वेचे रूळ आहेत. एकाच वेळेस रस्त्यावरची वाहतूक आणि बाजूला रेल्वे धावत असते. सारेचे कल्पनेच्या पलीकडचे चित्र येथे बघायला मिळते.युनेस्कोने ‘जागतिक वारसा हक्कात’ सुद्धा याची दाखल घेतली आहे. या रेल्वे खंडाचा सर्वात सुंदर भाग हा ‘बताशिया लुप’ आहे. या ठिकाणी या रेल्वे खंडाचा आठचा आकार तयार होतो. ‘गोरखा युद्धं स्मारकाच्या’ भोवत ही ‘टॉय ट्रेन’ फिरुन पुढे जाते. राजेश खन्ना, शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित झालेले आराधना चित्रपटातील ‘मेरे सपनोकी रानी कब आयेगी तु ?’ हे गाणे याच ‘बताशिया लुप’ला चित्रित झालेले आहे.

जपानी मंदिर, बौद्ध मठ, मॉनेस्ट्री, स्तुप,भूतीया वस्ती आणि तिबेटी रेफ्युजी कॅम्प अशा अनेक ठिकाणची या ‘चहाच्या मळ्यातील दार्जिलिंग’मध्ये बहार आहे ..!


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *