जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठाचा वापर केला जातो. जेवण अळणी झाल्यास ते बेचव लागते. पदार्थांच्या चवीवर त्याचा थेट परिणाम होताना दिसतो. मात्र, मीठाचा अधिक वापर शरीरासाठी घातक ठरु शकतो.
खरंतर एखादा पदार्थ बनवण्यासाठी चिमुटभर मीठाचीच गरज असते. मात्र, काहीजणांना खारट खाण्याची इतकी सवय झालेली असते की जेवणाच्या पानातही त्यांना मीठ लागते. मात्र, कोणतीही गोष्ट प्रमाणात खाल्ल्यास त्याचे फायदे होतात. दिवसभरात मीठ किती खावे यायेही प्रमाण आहे. अतिप्रमाणात मीठ खाल्ल्याने त्याचा शरिरावर परिणाम होताना दिसतो. तसे, संकेतही आपलं शरीर आपल्याला देत असते. तर, जाणून घेऊया अतिप्रमाणात मीठ खाल्ल्याने काय होते.
शरीरात मीठाचे प्रमाण जास्त झाल्यास त्याचा इतर अवयवांवर परिणाम होतो. कारण मीठात मोठ्या प्रमाणात सोडियम आणि पोटॅशियम असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, आपण जेवणात वापरत असलेल्या मीठामध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते. तर, त्याच्या तुलनेत पोटॅशियमचे प्रमाण कमी असते. त्यामुळं लोकांना रक्तदाबाचा आजार जडू शकतो.
उच्च रक्तदाबः शरीरात सोडियमची मात्रा जास्त झाल्यास उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. रक्तदाबातील हा बदल किडनीद्वारे होतो. जास्त मीठ खाल्ल्याने मूत्रपिंडांना द्रव उत्सर्जित करणे कठीण होते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो.
ब्लोटिंगः मीठाचे अतिसेवन केल्याने तुम्हाला शरीर सूजल्यासारखे वाटू शकते. यालाच ब्लोटिंग असेही म्हणतात. जेवल्यानंतर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त फुगल्यासारखे वाटते. किडनीमध्ये काही प्रमाणात सोडियम आढळते. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही जास्त सोडियमचे सेवन करता तेव्हा किडनीला जास्त पाणी साठवून ठेवावे लागते. जेव्हा शरीरात मिठाचे प्रमाण जास्त असते तेव्हा पाणी जास्त प्रमाणात जमा होते. या स्थितीला फ्लुइड रिटेंशन असं म्हणतात.
घसा सुखणेः अतिप्रमाणात मीठ असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमचे तोंड सुकते. ज्यामुळं तुम्हाला सतत पाणी प्यावेसे वाटते.
झोपमोड होणेः झोपण्यापूर्वी जर तुम्ही सोडियमयुक्त पदार्थांचे सेवन केले असेल तुम्हाला लवकर झोप न येणे, सतत जाग येणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो.
मळमळणेः अतिप्रमाणात मीठाचे सेवन केल्यास पोटात असंतुलन निर्माण होऊ शकते. असा त्रास होऊ नये असे वाटत असेल तर जेवणातील मीठाचे प्रमाण नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. तसेच, तुमचे शरीर हायड्रेटेड रहावे यासाठी दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिणेही गरजेचे आहे.