ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

समृद्धीवर भीषण बस अपघातात २५ ठार


मृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून नागपूरहून पुण्याकडे येण्यासाठी निघालेल्या खासगी प्रवासी बसचा बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा गावाजवळ शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला.

यात २५ प्रवासी ठार झाले, तर ८ प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत त्यांनी जाहीर केली.

तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य शासनाकडून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यासोबतच केंद्र सरकारनेही २ लाखांची मदत मृतांच्या वारसांसाठी जाहीर केली असून जखमींना ५० हजारांची मदत देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल रमेश बैस यांच्यासह अनेक मान्यवरांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून याप्रकरणी बसचालक दानिश शेखवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका कसा घडला अपघात?
नागपूरहून पुण्याकडे येण्यासाठी निघालेली ही खासगी प्रवासी बस समृद्धी महामार्गावरून जाताना मध्यरात्री दीडच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पहिल्यांदा रस्त्याशेजारील लोखंडी पोलला धडकली. त्यानंतर रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झाली आणि बसने पेट घेतला. बसचा दरवाजा खालच्या बाजूला गेल्याने कोणालाही बाहेर येता आले नाही. काही प्रवासी बसच्या काचा फोडून बाहेर आले, परंतु २५ प्रवाशांचा गाडीमध्येच होरपळून मृत्यू झाला.

स्थानिक नागरिक मदतीसाठी
अपघाताची माहिती मिळताच पिंपळखुटा येथील स्थानिक नागरिक मदतीसाठी पोहचले. मध्यरात्री २ वाजण्याच्या आसपास अग्निशमन दलाच्या गाड्याही पोहचल्या. पोलीसही घटनास्थळावर तात्काळ दाखल झाले होते. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी जळालेल्या बसमधून मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात केली. सकाळी साडेसात वाजेपर्यंत २५ मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलढाणा शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. त्यानंतर सकाळी ८ वाजता फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाचा आढावा घेतला.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घटनास्थळी
अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली, तर जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासकीय निधीतून करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अपघातस्थळाची पाहणी केली. दुपारी एक वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात जखमींची विचारपूस केली.

ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. असे अपघात होऊन चालणार नाहीत. प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे. सगळ्या उपाययोजना करण्यात येतील. प्रत्येकाने नियमांचे पालन केले पाहिजे. काही बाबतीत ते घडताना दिसत नाही. अपघात होऊ नये यासाठी प्रयत्न करणार.
-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे, तर जखमींचा रुगणालयाचा सगळा खर्च राज्य सरकार करणार आहे. या घटनेची अधिक चौकशी करण्यात येणार आहे.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

या भीषण दुर्घटनेनंतर समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य सरकारने तज्ज्ञांच्या सल्ल्याने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.
– अजित पवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *