ताज्या बातम्याधार्मिकमहत्वाचे

अमेरिकेतील विठ्ठल भक्तीची झाली पायाभरणी! न्यू जर्सी येथे रंगला आषाढीचा रिंगण सोहळा!


अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये पपैन्नी पार्क येथे आषाढी वारीनिमित्ताने रिंगण सोहळा मोठ्या थाटात आणि भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दिंडी सोहळ्यात न्यू जर्सी राज्यातील सुमारे 500हून अधिक भाविक लोक पांढऱ्या वेशात, ढोल ताशाच्या गजरात एकत्र जमले.

सुमारे दिवसभर हा सोहळा सुरू होता. अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये मराठी अस्मितेचा भगवा मानाने डौलत होता. तर दिंडीमध्ये मराठी तरुणाई हरिनामाच्या गजरात ताल धरत होती.

रिंगण सोहळा आणि दिंडी निघण्याआधी अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक अतुल भावे यांचे हस्ते पालखीचे पूजन झाले. नंतर आरती व महाप्रसाद झाला. लेझीमच्या पथकाने त्या ठिकाणी सुंदर प्रात्यक्षिके सादर केली. अभंगांच्या माध्यमातून विठ्ठलाचे साक्षात दर्शन घडले. देशातील सर्वच संतांच्या नावे वेगवेगळ्या दिंड्यांनी तेथे आपली उपस्थिती दर्शवली.

अमेरिकेत भारतीय देवदेवतांची खूप देवळे आहेत. मात्र विठ्ठल रुक्मिणीचे न्यू जर्सी मध्ये मंदिर नव्हते. यंदा पंढरपूरहून विशेष स्वरूपात विठ्ठल रखुमाईची मूर्ती मागविण्यात आली आणि तेथे प्राणप्रतिष्ठा झाली. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात धकाधकीच्या जीवनात भावी पिढीपर्यंत भारतीय भक्ती आणि संस्कार पोचविण्याचा निर्धार न्यू जर्सी मधील तीन उद्योजक आनंद चौथाई, प्रवीण पाटील आणि भाऊ कुलकर्णी या तिघांनी केला आहे. त्यांनी हा भावभक्तीचा उपक्रम राबविला. तिन्ही परिवारांच्या पुढाकाराने 21 मे 2023 रोजी विठ्ठल रुक्मिणीची प्राणप्रतिष्ठा झाली. या प्राणप्रतिष्ठेचे पौरोहित्य अमेरिका स्थित सुलभाताई खरे यांनी केले होते.

अमेरिकेतील चित्रा भावे आणि राजश्री कुलकर्णी यांनी आधीच आळंदी ते पंढरपूर वारीचा अनुभव घेतला होता.त्यामुळे अमेरिकेत वारी सुरू करावी अशी संकल्पना पुढे आली आणि त्याला या दिंडीने मूर्त रूप मिळाले. अमेरिकेतील मैदानांमध्ये आणि उद्यानांमध्ये हरीपाठाचा गजर होऊ लागला. 24 जून रोजी ज्ञानोबा तुकाराम… जय हरी विठ्ठल आणि राम कृष्ण हरी नाम संकीर्तनात रिंगण सोहळा झाला.

निरंजन देव यांच्या नेतृत्वाखाली 25 स्वयंसेवक तसेच राजश्री कुलकर्णी आणि त्यांच्या लेझीम पथकाने ,सारिका कदम व त्यांच्या साथीदारांनी ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून रिंगणाचा मनोहारी नयनरम्य सोहळा यशस्वी केला. अमेरिकेतील न्यू जर्सी येथील सहाशेहून अधिक भाविक तेथे सहभागी झाले होते.

अमेरिकेतील मराठी माणसांनी त्यांच्या मुलांवर भारतीय संस्कार करण्यासाठी वारी आणि विठ्ठल मंदिराची प्रतिष्ठापना केल्यामुळे भारतीय संस्कार आणि मूल्ये तेथे जतन करण्यास या माध्यमातून मदत होणार आहे. ज्याप्रमाणे अमेरिकेत मराठी डॉक्टर, अभियंते, तंत्रज्ञ, प्राध्यापक, व्यवस्थापन तज्ञ, व्यावसायिक मराठीचा ठसा उमटवत आहे .त्या पद्धतीनेच मराठी समाजाचे ऋण फेडण्यासाठी अमेरिकेत अशाप्रकारे विठ्ठल भक्तीची वारकरी संप्रदायाची आणि वारीचे मुहूर्त मे ठरवल्याने खूप आनंद झाला असे प्रतिपादन वारीत सहभागी झालेले जामनेर जिल्हा जळगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलचे माजी प्राचार्य जे .डी. पाटील यांनी केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *