अखेर लातूर जिल्ह्यात पावसाची दमदार एन्ट्री; आर्द्रा नक्षत्रात मान्सूनला प्रारंभ
लातूर : गत दाेन आठवड्यांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी सायंकळी लातूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात दमदार एन्ट्री केली आहे.
१५ दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर आर्द्रा नक्षत्रात मान्सूनच्या पावसाने हजेरी आली असून, बळीराजा सुखावला आहे. शनिवारी सायंकाळी लातूरसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वारा अन् मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेक गावातील वीजपुरवठा काळी वेळ खंडित झाला हाेता. परिणामी, पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला.
शनिवारी सकाळपासूनच लातूर जिल्ह्यात माेठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत हाेता. लातूर शहरासह जिल्ह्यातील औसा तालुक्यात अनेक भागात पावसाने हजेरी लावली. तर पेठ, वासनगाव, औसा, निलंगा, कासार शिरसी, उदगीर तालुक्यातही पावसाने जाेरदार बॅटिंग केली आहे. यंदा उन्हाळ्यात तीव्र ऊन असल्याने आबालवृद्धांना पावसाळा कधी सुरू होतो, याकडे लक्ष लागले होते. शेतकऱ्यांनी खरीप हंगामपूर्व शेती मशागतीची कामे आटोपून पावसाच्या प्रतीक्षेत होते. मात्र, हे मृग कोरडा गेल्याने चिंता वाढली होती. दोन दिवसांपूर्वी आर्द्रा नक्षत्रास सुुरुवात झाल्याने सर्वांचे डोळे पावसाकडे लागले होते. दरम्यान, वातावरणात बदल हाेत असल्याने पाऊस येईल, असा अंदाज व्यक्त होत होता. शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह लातूरसह जिल्ह्यातील अनेक भागात मान्सूनला प्रारंभ झाला. परिणामी, चिंताग्रस्त शेतकऱ्यांना चेहऱ्यावर समाधान दिसून आले. या पावसामुळे शेतकऱ्यांची खरिपाच्या पेरणीसाठी लगबग वाढणार आहे.
उदगीर, अहमदपूर, देवणी, निलंगा, रेणापूरमध्ये पाऊस…
उदगीर शहरासह देवणीत जोरदार पाऊस झाला. त्याचबराेबर सताळा (बु.), हत्तीबेट, देवर्जन, वलांडी भागातही पावसाने हजेरी लावली. दरम्यान, उदगिरातील काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला हाेता. रेणापुरात काही वेळ मुसळधार पाऊस झाला. शिरुर अनंतपाळसह तालुक्यातील येरोळ, डिगोळ, निलंगा तालुक्यातील निटूर, ढोबळेवाडी, खडक उमरगा, बसपूर, डांगेवाडी, ताजपूर, शेंद, केळगाव तसेच औराद शहाजानी, अहमदपूर तालुक्यातील अंधाेरी येथेही पाऊस झाला.