कोणत्याही रस्त्याने वाहन चालवताना सिग्नल जवळ किंवा रस्त्याच्या कडेला वाहतूक पोलीस कोपऱ्यात उभे असलेले दिसतात. एखाद्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास हे पोलीस मामा लगेच धावून जातात, आणि वाहन चालकांवर तात्काळ कारवाई करतात.
परंतु वाहन चालकावर कारवाई करताना काही गोष्टींचे भान ठेवले पाहिजे, असा अशी टिपणी खुद्द न्यायालयाने केली आहे. त्यामुळे यापुढे वाहतूक पोलिसांना याबाबत काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे. कारण नियमांचे उल्लंघन झाले तरी अशा पद्धतीने दुचाकीची चावी काढण्याचे अधिकार पोलिसांना नाही, असे मुंबई सत्र न्यायालयाने एका प्रकरणात म्हटले आहे.
ही सक्ती देखील करता येत नाही.
वाहतूक पोलिसांना नियमाचे उल्लंघन झाल्यास दंड वसूलीचा अधिकार आहे, मात्र तरीही मुंबई सत्र न्यायालयाने वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी चालकांच्या वाहनांच्या चाव्या काढण्याचा अधिकार वाहतूक पोलिसांना नाही, असे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर ड्रायव्हिंग लायसन्स दाखवल्यानंतर दंड वसूल करण्यासाठी बाइक चालकाला पोलीस ठाण्यात नेण्याची सक्ती देखील पोलिस करू शकत नाहीत. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका आरोपीची निर्दोष मुक्तता करताना न्यायालयाने या संदर्भातील आदेशात हे स्पष्ट केले आहे.
पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता
संशयित आरोपी तथा युवक सागर पाठक हा कुलाबा परिसरात विनाहेल्मेट बाइक चालवत होता. त्यावेळी पोलिस कर्मचाऱ्याने आरोपीवर कारवाई करत दंड भरण्यास सांगितले. मात्र आरोपींने पोलीस कर्मचाऱ्याच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केली होती. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. या अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. तपासानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
दुसरीकडे आपली बाजू मांडतानाआरोपीने न्यायालयात आपल्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले. अतिरिक्त न्यायाधीश एनपी मेहता यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याला लायसन्स दिल्याचे नमूद केले. त्यानंतर आरोपीला पोलीस ठाण्यात नेण्याची गरज नव्हती, असे स्पष्ट करत वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यावर आरोपीने हल्ला केल्याचे कोणतेही ठोस पुरावे समोर आले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली, या प्रकारांना वरून वाहतूक पोलिसांची दंडेलशाही दिसून येते.