ताज्या बातम्या

थंडीत संत्री-मोसंबी खा, तंदुरुस्त राहा; रसदार फळं खाण्याचे 7 फायदे


फळांमध्ये असणारे नैसर्गिक फ्रुक्टोज आणि सुक्रोज हे घटक उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर असतात. थंडीच्या दिवसांत बाजारात मुबलक प्रमाणात येणारी संत्री-मोसंबी आवर्जून खायला हवीत (Benifits of Oranges). रसदार आंबट गोड चवीच्या संत्र्यांमुळे आरोग्याच्या बऱ्याच समस्या दूर होण्यास मदत होते. फायबर, लोह, क जीवनसत्त्व यांसारखे अनेक घटक असणाऱ्या संत्री आणि मोसंबी यांच्या सेवनामुळे प्रतिकारशक्ती वाढायला तर मदत होतेच पण पोट साफ होणे, त्वचा नितळ होणे यांसारख्या इतर तक्रारीही दूर होतात. त्यामुळे थंडीत ज्याप्रमाणे मटार, गाजर आणि इतर भाज्या भरपूर येतात, त्याचप्रमाणे फळांचा आणि त्यातही संत्री-मोसंबीचा आहारात समावेश करायला हवा. पाहूयात आरोग्यासाठी संत्री खाण्याचे एकाहून एक भन्नाट फायदे…1. पचनशक्ती सुधारते

थंडीच्या दिवसांत आपल्यातील अनेकांना कोठा जड होण्याची समस्या उद्भवते. पण संत्री हे रसदार फळ असल्याने तसेच त्यामध्ये असणाऱ्या तंतूमय घटकांमुळे तसेच त्यातील फायबरमुळे पोट साफ होण्यास मदत होते.

2. वजन घटण्यास मदत

संत्री-मोसंबी यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्तीच्या खाण्यापासून आपण स्वत:ला रोखू शकतो. तसेच रसदार फळांमुळे तहानही भागली जाते. संत्री-मोसंबी आंबट गोड चवीची असल्याने ती चव बराच काळ तोंडात रेंगाळत राहिल्याने भूक लागत नाही.

3. रक्तदाब नियंत्रित राहण्यास उपयुक्त

आपल्याला हे वाचून आश्चर्य वाटू शकते, पण संत्र्यांतील गुणधर्मामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशांनी नियमित संत्री खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

4. हिमोग्लाबिनची पातळी चांगली राखण्यास मदत

संत्री आणि मोसंबी यांमध्ये व्हिटॅमिन बी पुरेशा प्रमाणात असते. व्हिटॅमिन बी हे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यासाठी अतिशय उपयुक्त असल्याने ज्यांच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता आहे अशांनी आहारात संत्री-मोसंबी यांचा नियमित समावेश करायला हवा.

5. नितळ त्वचेसाठी फायदेशीर

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे त्वचा चमकदार आणि मुलायम राहण्यासाठी संत्री उपयुक्त ठरतात. त्वचेवर डाग, चट्टे असतील तर ते कमी होण्यासही संत्र्याचा अतिशय चांगला फायदा होतो. आहारात संत्र्यांचा समावेश करण्याबरोबरच संत्र्याची पावडर, संत्रीच्या सालांची पावडर यांचा मास्क, फेस पॅक यांमध्ये वापर केलेला आढळतो. 6. प्रतिकारशक्ती वाढण्यास फायदेशीर

संत्र्यामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन सीमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच यातील कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, ए आणि बी व्हिटॅमिन यामुळे प्रतिकाशक्ती वाढते. सध्या वेगवेगळ्या साथी वेगाने वाढत असताना आपली प्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आहारात संत्र्यांचा समावेश करायला हवा.

7. दात आणि हाडांचे आरोग्य सुधारते

लहान मुलांना दात येण्याच्या काळात नियमितपणे संत्री दिल्यास त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. क जीवनसत्त्वामुळे हिरड्यांतून येणारे रक्त थांबते तसेच दात हिरड्यांमध्ये बसण्यास संत्री खाणे फायदेशीर ठरते. याबरोबरच हाडांच्या मजबुतासीठीही संत्री-मोसंबी खाणे उपयुक्त ठरते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *