जिल्ह्यातील जांभूळ हंगाम आटोपला असून हंगामाच्या अखेरीसदेखील जांभळाला प्रतिकिलो १०० रुपये दर उत्पादकांना मिळाला असून पावसाचे आगमन लांबल्यामुळे उशिराने आलेले उत्पादनदेखील उत्पादकांना मिळाले. त्यामुळे या वर्षीच्या हंगामाची सुरुवात आणि शेवटदेखील गोड झाल्यामुळे उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
जिल्ह्यात यावर्षी पहिल्या टप्प्यातील जांभूळ हंगामाला मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात झाली. सुरुवातीला शेतकऱ्यांना प्रतिकिलो ७० ते ८० रुपयांपर्यंत दर मिळाला. हा दर एप्रिलपर्यंत कायम होता. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून जांभळाच्या दरात काही अंशी सुधारणा होण्यास सुरुवात झाली.
टप्प्याटप्प्याने त्यामध्ये सुधारणा होत एप्रिल अखेरीस चांगल्या दर्जाच्या जांभळाला प्रतिकिलो १०० रुपये दर मिळाला. दुसऱ्या टप्प्यातील जांभूळ १० मे नंतर परिपक्व व्हायला सुरुवात झाली. या हंगामावर काहीसे पावसाचे सावट होते. परंतु पावसाचे आगमन लांबल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात संपूर्ण उत्पादन आले.
६ ते ७ जुनपर्यंत जांभूळ हंगाम सुरू राहीला. अंतिम टप्प्यातील जांभळाला तितकासा दर मिळत नाही परंतु अंतिम टप्प्यातील उत्पादनाला उत्पादनापेक्षा अधिक मागणी असल्यामुळे १०० रुपये दर मिळाला. जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी या तालुक्यांतील काही गावांमध्ये जांभळाचे उत्पादन घेतले जाते. या भागांत मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. मागणीनुसार मुंबई, पुणे, कोल्हापूर या भागांत जांभूळ पाठविले जाते. वाहतुकीसाठी अलीकडे खासगी बसचादेखील वापर केला जातो. याशिवाय प्रक्रिया उद्योजकांकडूनदेखील चांगली मागणी जांभूळ उत्पादनाला आहे.