पंढरपूर तालुक्यात शाळकरी विद्यार्थिनीचा धक्कादयक मृत्यू झाला आहे. अक्षरा जमदाडे ही भोसे येथील यशवंत विद्यालयात इयत्ता 7 वी मध्ये शिकत होती.
ती गुरुवारी 11 वाजण्याच्या सुमारास आपली शाळा सुटल्यानंतर घरी जात होती. भोसे पाटी येथे आल्यानंतर अक्षरा ज्या पीकअपमध्ये बसली होती त्याचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याने त्याचा धक्का बसून अक्षरा ही बाजूने जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या टायर खाली पडली, यामध्ये अक्षराचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे भोसे परिसरावर शोककळा पसरली आहे. रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण आणि वाहनांची होत असलेली प्रचंड गर्दी, यामुळे याठिकाणी नागरिकांना जीव मुठीत घेवून वावरावे लागत आहे. पांढरेवाडी, जाधववाडी, बार्डी, मेंढापूर, करकंब या ठिकाणाहून भोसे येथे शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी येत आहेत, त्यामुळे याठिकाणी कायम स्वरूपी ट्राफिक पोलीस असावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
पाचवी ते दहावी पर्यंतचे वाडी वस्ती किंवा जवळच्या गावातून येणारे जवळपास सर्वच विद्यार्थी दोन-दोन, तीन-तीन जण बसून भरधाव वेगात मोटार सायकलवरून शाळेला येताना दिसत आहेत. अनेकवेळा शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांसह पालकांनाही सूचना दिल्या आहेत परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अशा प्रकारच्या दुर्दैवी प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे.