तुर्कस्तानमध्ये पाचवा भूकंप, मृतांचा आकडा 5 हजारांच्या पुढे, 21 हजार जखमी, मृतदेह काढण्याचे काम सुरुच
तुर्कस्तान आणि शेजारील सीरियामध्ये सोमवारी झालेल्या 7.8 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपात 5,000 हून अधिक लोक ठार आणि हजारो जखमी झाले. तुर्कस्तानचे भारतातील राजदूत फिरात सुनेल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत भारताने भूकंपग्रस्त देशाला पाठवलेल्या मदतीबद्दल आभार मानले.
भारतासाठी माझ्याकडे एकच शब्द आहे आहे. संकटकाळी जो मदतीला धावतो तोच खरा मित्र असे म्हणत त्यांनी आभार मानले आहेत.
तुर्कस्तानमधील परिस्थितीबद्दल माहिती देताना सुनेल म्हणाले की, ‘प्रथम 7.7 आणि नंतर 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. तेव्हापासून आतापर्यंत भूकंपाचे 300 हून अधिक धक्के बसले आहेत. या आपत्तीत 21 हजारांहून अधिक लोक जखमी झाले असून परिसरातील तीन विमानतळांचेही नुकसान झाले आहे. यासोबतच या परिस्थितीला सामोरे जाणे सोपे नसल्याचेही ते म्हणाले. 14 हजारांहून अधिक अधिकारी आणि 5 हजाराहून अधिक लष्करी जवान मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.
तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत. सोमवारी एकापाठोपाठ तीन शक्तिशाली भूकंप आल्यानंतर आतापर्यंत 100 हून अधिक आफ्टरशॉक बसले आहेत. दरम्यान, तुर्कीच्या पूर्व भागात पाचव्यांदा जोरदार भूकंप झाला. भूकंपानंतर तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आतापर्यंत 5000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.