मुंबई : अल्पवयीन मुलींसंदर्भात कोणतेही कृत्य करताना गंभीरपणे विचार करायला लावणारी ही महत्त्वाची घटना आहे. त्याचे कारण एका 32 वर्षीय व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीच्या ओठावर 100 रुपयाची नोट फिरवली. त्यानंतर तो म्हणाला की, तू इतना भाव क्यू खा रही है. त्याचबरोबर तिच्याकडे पाहून लैंगिक भावाचे इशारे करत होता. 2017 मध्ये अल्पवयीन मुलगी ही रात्री आठ वाजता शेजाऱ्यासोबत बाजारात जात होती. तेव्हा आरोपीने तिचा पाठलाग केल्याचे अल्पवयीन मुलीने म्हटले आहे. आरोपीने तिच्यासमोर येऊन तिच्या शरीराला स्पर्श केला. तिच्या ओठांवर शंभर रुपयाची नोट फिरवली. यामुळे ती संकोचली व क्षणभर काय करावे तिला सुचले नाही.
हिंदी फिल्म डायलॉग मारला : आरोपी व्यक्तीने तिच्या ओठांवरून नोट फिरवून तू ऐसा क्यों कर रही है, तू इतना भाव खा रही है,असे म्हटल्याचे देखील या मुलीने सांगितले. या मुलीने त्या व्यक्तीकडे नंतर रागाने पाहिले होते. म्हणूनच त्या व्यक्तीने या पद्धतीचा हिंदी फिल्म डायलॉग मारला. ही घटना घडल्यानंतर तिने आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला होता. तिच्या आईने आरोपीच्या घरी जाऊन त्यांना या संदर्भात विचारणा केली. आरोपीने या मुलीच्या आईलाच उलट शिवीगाळ केली. मुलीच्या आईने यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भातील जबाब नोंदवून त्या अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर पंचनामा पोलिसांकडून केला गेला. ती अल्पवयीन असल्यामुळे तिचा जबाब नोंदवण्यासाठी तिला न्यायदंडाधिकाऱ्यांकडेही नेण्यात आले आणि त्यांच्या समक्ष त्यासंदर्भातली जबाब नोंदवला.
आरोपीच्या विरोधात आरडाओरड : न्यायदंडाधिकाऱ्यांकडेही पुराव्याच्या समर्थनार्थ घटनाक्रम नोंदवण्यात आला. मुलीने या घटनेच्या संदर्भात महत्त्वाचा पुरावा मांडला की, आरोपी कॉलेजला जात असताना तिचा पाठलाग करत होता. तो तिच्याकडे पाहून शिट्ट्या देखील मारायचा. हातवारे देखील करायचा, विविध प्रकारच्या घाण प्रतिक्रिया देखील तिच्या कानापर्यंत जाईल अशा तऱ्हेने बोलायचा. तसेच तिच्या आईला चाकूने भोकसून मारण्याची धमकी देखील आरोपीने दिली होती. त्यामुळे ही बाब स्पष्ट झाली की, मुलीने या आरोपीच्या विरोधात आरडाओरड केली होती. बाजारातले लोकही तिथे गोळा झाले होते. मात्र त्यावेळेला मदतीला कोणी आले नाही.
आरोपीला शिक्षा सुनावली : अल्पवयीन व्यक्तींच्या दिलेल्या पुराव्यातील जबाबचा संदर्भ लावत विशेष न्यायाधीश यांनी नमूद केले की, पीडित आणि आरोपी यांच्यातील पूर्वीचे कोणतेही वैर नाही. त्यामुळे त्याला खोट्या केसमधून अडकवता येईल अशी शक्यता नाही. त्यामुळे विशेष न्यायालयाने या आरोपीला शिक्षा सुनावली. तब्बल एक वर्षाकरिता सश्रम तुरुंगात त्याला घालावावे लागणार. मात्र ही शिक्षा ठोठावताना त्या आरोपीची आई ही त्या आरोपीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. त्याची आई ही कर्करोगाने आजारी आहे. ही देखील बाब न्यायालयाने ध्यानात घेतल्याची सांगितले. मात्र अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी अशी शिक्षा ठोठावणे हे आणि योग्य शिक्षा देऊन अल्पवयीन बालिकेचा हक्क शाबूत राखणे हे न्यायालयाचे कर्तव्य आहे, असे देखील विशेष न्यायाधीश एस सी जाधव यांनी नमूद केले. आरोपीला 14 जुलै 2017 रोजी अटक देखील झाली होती. एप्रिल 2018 मध्ये त्याला जामीन देखील मिळाला होता. मात्र अल्पवयीन बालिकेच्या पालकांनी पाठपुरावा केल्यामुळे तिला न्याय मिळाला.