सैराट पुनरावृत्ती बहिणीला पळवून नेणाऱ्या व्यक्तीवर भर रस्त्यात कुऱ्हाडीचे वार करून हत्या
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात ‘सैराट’ सिनेमाच्या शेवटासारखी पुनरावृत्ती पाहायला मिळाली असून, बहिणीला पळवून नेणाऱ्या व्यक्तीवर भर रस्त्यात कुऱ्हाडीचे वार करून हत्या (Aurangabad Murder) केल्याची घटना समोर आली आहे.
धक्कादायक म्हणजे आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर जीव गेल्यावर रस्त्यावर जल्लोष देखील केला. या क्रूर घटनेने औरंगाबाद जिल्हा (Aurangabad News Updates) हादरला आहे. बापू खिल्लारे (वय 30 वर्षे) असे मृत युवकाचे नाव असून, हत्या करणारा आरोपी फरार झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी बहिणीला पळवून नेल्याचा राग मनात धरून भावाने आपल्या बहिणीच्या पतीची हत्या केली आहे. औरंगाबाद पुणे महामार्गावरील दहेगाव बंगला जवळ इसारवाडी फाटा येथे भर रस्त्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून ही निर्घृण हत्या करण्यात आली आहे. संतापजनक म्हणजे कुऱ्हाडीने वार केल्यानंतर बहिणीच्या पतीचा जीव गेल्याची आरोपीने खात्री केली आणि त्यानंतर रस्त्यावरच जल्लोष केल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शी नागरिकांनी दिली आहे. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून फरार झाला.
खुनाच्या घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी गेलेल्या दिशेने पोलीस पथके रवाना केली आहे.घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांनी भेट दिलीय. तसेच आरोपीच्या शोधात पथक रवाना करण्यात आले आहे. तसेच बापू खिल्लारे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.